उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण ही जनचळवळ होण्यासाठी लसीच्या सुरक्षिततेबाबत जनतेला माहिती देण्याचे उपराष्ट्रपतींचे वैद्यक जगताला आवाहन


कोविड -19 विरुद्ध लसीकरण ही सर्वात प्रभावी ढाल : उपराष्ट्रपती

उपराष्ट्रपतींकडून 'लसीकरण भारत कार्यक्रमाचा' आरंभ

Posted On: 24 AUG 2021 4:00PM by PIB Mumbai

 

कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाबाबतची  सुरक्षितता आणि महत्त्व याबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी विशेष जागरूकता मोहीम राबवावी, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी वैद्यकीय क्षेत्राला आणि विशेषतः भारतीय वैद्यकीय संघटनेला आज केले.

गिव्ह इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने कर्नाटक सरकारच्या शाश्वत उद्दिष्ट  समन्वय केंद्राच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या लसीकरण भारत कार्यक्रमाचेउद्घाटन करताना उपराष्ट्रपती म्हणाले, लसीकरण करण्यासाठी काही भागांमध्ये संकोच असल्याचे दिसून येते आहे. जे लसीकरणाविषयी  अजूनही शंका घेत आहेत त्यांना  शिक्षित करणे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला जन-आंदोलनअसे स्वरूप देण्याचे आवाहन करत, सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात प्रत्येकाचे लसीकरण झाल्याचे सुनिश्चित करावेअशी आग्रही सूचना त्यांनी केली. लसीकरणाबाबतची टाळाटाळ  दूर करण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी माध्यमांनाही केले.

लसीकरण ही कोविड -19 विरोधातील  सर्वात प्रभावी ढाल आहे  याकडे लक्ष वेधून उपराष्ट्रपती म्हणाले की, लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही आणि रोगाची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.म्हणजेच  विषाणूचा  संसर्ग झाला तरी, आजाराची लक्षणे सौम्य राहतील  असे ते पुढे म्हणाले.

लोकांच्या सहकार्याशिवाय कोरोनाविरूद्धची लढाई जिंकता येणार नाही यावर भर देत श्री नायडू यांनी सर्वांना मास्क लावा, वारंवार हात धुवा, सुरक्षित अंतर पाळा आणि शिस्तबद्ध आणि निरोगी जीवनशैली ठेवण्याचे आवाहन केले.

अधिकाधिक लोकांचे कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी एकत्रितपणे काम केल्याबद्दल भारत सरकार आणि सर्व राज्यांची त्यांनी प्रशंसा केली, देशात आतापर्यंत 58 कोटी लसीच्या मात्रा  दिल्याबद्दल  त्यांनी आनंद व्यक्त केला.

सरकारच्या प्रयत्नांना सहाय्य करणाऱ्या गिव्ह  इंडिया फाउंडेशनची त्यांनी प्रशंसा केली.

कर्नाटकचे राज्यपाल  थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री,.  बसवराज बोम्मई यावेळी उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1748534) Visitor Counter : 243