पर्यटन मंत्रालय

इब्सा (इंडिया, ब्राझील आणि साऊथ आफ्रिका) देशांच्या पर्यटन मंत्र्यांच्या आभासी परिषदेचे भारताकडून आयोजन


पर्यटन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाला चालना देणे आवश्यक: जी किशन रेड्डी

Posted On: 13 AUG 2021 5:40PM by PIB Mumbai

 

ठळक वैशिष्ट्ये

इब्सा- म्हणजेच भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका- या देशांच्या संघटनेच्या पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत कोविड-19 च्या पर्यटन व्यवसायवर पडलेल्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी, परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या महत्वावर भर.

सर्व सदस्य देशांची आपापल्या देशात विविध पर्यटनविषयक उप्रकम राबवण्यास सहमती

भारताने इब्सा म्हणजेच, भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या पर्यटन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. 12 ऑगस्ट रोजी झालेल्या  या बैठकीत, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, ब्राझीलचे पर्यटन मंत्री गील्सन मकादिओ नेटो आणि दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन उपमंत्री फिश आमोस मल्हेला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

या संघटनेच्या सदस्य देशांमध्ये पर्यटन सहकार्याला चालना देण्यासाठी भारताने ही परिषद आयोजित केली होती.

या आभासी बैठकीत बोलतांना पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यानी, भारतात सुरु असलेल्या जलद आणि आक्रमक लसीकरण मोहिमेविषयी माहिती दिली. भारतात आतापर्यंत 500 दशलक्ष पेक्षा जास्त लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, लसिकारणात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचला आहे, असे त्यांनी सांगितले.तसेच, पर्यटन क्षेत्राला पुनरुज्जीवित करण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करत, रेड्डी यांनी,परदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी भारतातील पर्यटन उद्योग सज्ज केला जाऊ शकतो, असे यावेळी सांगितले.

कोविड-19 महामारीचा पर्यटन क्षेत्रावर झालेला दुष्प्रभाव कमी करण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील सहकार्य अधिक वाढवण्याची गरज आहे, असे, इब्साच्या पर्यटन मंत्र्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत मान्य केले . पर्यटन क्षेत्रात सहकार्य करून, इब्सा सदस्य देशांमधील संपूर्ण क्षमतांचा वापर करण्याचा निश्चय सर्व सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.  

या बैठकीतील एक महत्वाचा पैलू म्हणजे, इब्सा सदस्य देशांच्या पर्यटन मंत्र्यांनी नंतर संयुक्त निवेदन जारी केले, ज्यात पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी सहकार्य करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच आपापल्या देशात विविध पर्यटनविषयक उपक्रम राबवण्यावरही सर्व नेत्यांमध्ये सहमती झाली.

इब्सा ही त्रि-सदस्यीय, विकासात्मक संघटना असून भारत, ब्राझील आणिदक्षिण आफ्रिका यांच्यात विविध विषयांवर सहकार्य आणि परस्पर आदानप्रदानाला या संघटनेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. सर्व सदस्य देशांच्या आर्थिक विकासासाठी तसेच पर्यटनाला चालाना देण्यासाठी परस्पर संबंध अधिक दृढ करणे, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे.

***

Jaydevi PS/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1745502) Visitor Counter : 225