पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन
Posted On:
29 JUL 2021 6:53PM by PIB Mumbai
नमस्कार! माझ्यासोबत कार्यक्रमात सहभागी झालेले माझे सगळे सहकारी, राज्यांचे माननीय राज्यपाल, सर्व सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य सरकारांचे मंत्री, उपस्थित शिक्षण तज्ञ, शिक्षक, सर्व पालक आणि माझ्या प्रिय तरुण मित्रांनो!
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व देशबांधवांना आणि विशेषतः सर्व विद्यार्थ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. गेल्या एक वर्षात देशातील तुम्ही सर्व मान्यवर, शिक्षक, मुख्याध्यापक, धोरणकर्त्यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अपार कष्ट घेतले आहेत. या कोरोना काळात देखील लाखो नागरिक, शिक्षक, राज्य सरकारे, स्वायत्त संस्था यांच्याकडून सूचना मागवून कृती दल बनवून टप्प्या टप्प्याने नवीन शैक्षणिक धोरण राबले जात आहे. गेल्या एक वर्षात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित अनेक मोठे निर्णय घेतले गेले आहेत. आज याच शृंखलेत अनेक नव्या योजना, नवे उपक्रम सुरु करण्याचे सौभाग्य मला मिळाले आहे.
मित्रांनो,
ही महत्वाची संधी अशा वेळी आली आहे, जेंव्हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. थोड्याच दिवसांनी 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षात पदार्पण करणार आहोत. एकप्रकारे, नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव समारंभाचा महत्वाचा भाग बनली आहे. इतक्या मोठ्या उत्सवादरम्यान ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’ अंतर्गत सुरु झालेल्या योजना ‘नव्या भारताच्या निर्मितीत’ मोठं योगदान देणार आहेत. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण जे संकल्प सोडून साजरे करत आहोत, त्या दिशेने आपल्याला आजची नवी पिढीच घेऊन जाणार आहे. आज आपण युवकांना कसे शिक्षण देत आहोत, कुठली दिशा दाखवत आहोत, यावर भविष्यातली आपली प्रगती कशी असेल, आपण कुठली शिखरे सर करू शकु, हे अवलंबून आहे. म्हणूनच, भारताचे नवे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ राष्ट्र निर्माणाच्या महायज्ञात महत्वाची भूमिका बजावणार आहे, असे मी मानतो. म्हणूनच देशाने शैक्षणिक धोरण इतके आधुनिक, भविष्यासाठी तयार असलेले बनवले आहे. आज या कार्यक्रमात सहभागी झालेले बहुतांश मान्यवरांना, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे बारकावे माहित आहेत, मात्र हे किती मोठे अभियान आहे, याची जाणीव सतत करत राहायचीच आहे.
मित्रांनो,
देशभरातील आमचे अनेक युवा विद्यार्थी आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत. जर या विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना आपण त्यांची स्वप्ने, त्यांच्या आकांक्षाविषयी विचारले तर आपल्याला जाणवेल की प्रत्येक युवकाच्या मनात एक नावीन्य आहे, एक नवी ऊर्जा आहे. आमचा युवक परिवर्तनासाठी पूर्णपणे सज्ज आहे. त्याला आता अधिक प्रतीक्षा करायची नाही. आपण सर्वांनी बघितले आहे, कोरोनाकाळात कशी आमच्या शिक्षणव्यवस्थेसमोर मोठमोठी आव्हाने होती. विद्यार्थ्यांच्या जीवन जगण्याची, शिक्षणाची तऱ्हाच बदलली. पद्धती बदलल्या. मात्र, देशातल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत वेगाने या बदलाला स्वीकारले, अंगीकारले. ऑनलाईन शिक्षण आता मुलांच्या अंगवळणी पडले आहे. शिक्षण मंत्रालयाने देखील त्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. मंत्रालयाने दीक्षा प्लॅटफॉर्म सुरु केला, स्वयं पोर्टलवर अभ्यासक्रम सुरु केला आणि आपले विद्यार्थी देखील पूर्ण जोशात, या बदलात सहभागी झाले आहेत. मला असे सांगण्यात आले आहे की, गेल्या एका वर्षात या पोर्टलला 2300 कोटींपेक्षा जास्त हिट्स मिळाले आहेत. यातूनच हे पोर्टल किती उपयुक्त ठरले आहे, हे सिद्ध होते. आज देखील दररोज सुमारे पांच कोटी हिट्स यावर येत आहेत.
मित्रांनो,
21 व्या शतकातील हा तरुण आज आपल्या व्यवस्था, आपले जग स्वतःच्या मर्जीवर आणि समर्थ्यावर बनवू इच्छितो आहे. म्हणूनच त्याला संधी हवी आहे, स्वातंत्र्य हवे आहे. जुन्या बंधनांपासून मुक्तता हवी आहे. आपण बघा, आज छोट्या छोट्या गावांमध्ये, वस्त्यांमधून येणारे युवक काय काय विलक्षण कामे करत आहेत. याच दुरवरच्या प्रदेशातून आणि अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले हे तरुण टोक्यो ऑलिंपिक मध्ये देशाचा ध्वज दिमाखात उंच करत आहेत. भारताला नवी ओळख देत आहेत. असेच कोट्यवधी युवक आज वेगवेगळ्या क्षेत्रात असामान्य कार्य करत आहेत. असाधारण उद्दिष्टाचा पाया रचत आहेत. कोणी कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात, प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम घडवत नव्या कलाप्रकारांना जन्म देत आहेत. कोणी रोबोटिक्स क्षेत्रात कधी केवळ विज्ञानाच्या दंतकथा समजल्या जाणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत.
कोणी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मानवी क्षमताना नव्या उंचीवर पोहोचवत आहे, तर कोणी मशीन लर्निंग क्षेत्रात नवे मैलांचे दगड गाठण्याची तयारी करत आहे, म्हणजेच, प्रत्येक क्षेत्रात, भारताचे युवक आपले झेंडे गाडत पुढे वाटचाल करत आहेत. हेच युवा, भारतातील स्टार्ट अप व्यवस्थेत क्रांतिकरक परिवर्तन करत आहेत. चौथ्या औद्योगिक क्रांतीत भारताचे नेतृत्व करण्यासाठी हे युवा सज्ज आहेत, आणि डिजिटल इंडियाला नवी गती देत आहेत.
आपण कल्पना करा, या युवा पिढीला जेव्हा त्यांच्या स्वप्नांच्या अनुरुप वातावरण मिळेल, त्यावेळी त्यांची शक्ति किती वाढू शकेल? आणि म्हणूनच, नवे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ युवकांना ही ग्वाही देते की संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, त्यांच्या उमेद-आकांक्षासोबत आहे, ज्या कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रमाचा आज शुभारंभ झाला आहे, तो देखील आपल्याला भविष्योन्मुख बनवेल, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणीत अर्थव्यवस्थेचे नवे मार्ग खुले करेल. शिक्षणात ही डिजिटल क्रांती, संपूर्ण देशाला एकत्र आणेल. गांवे-शहर सर्व समानतेने डिजिटल शिक्षणाशी जोडले जावे, त्याचीही काळजी घेण्यात आली आहे . राष्ट्रीय डिजिटल शिक्षण संरचना म्हणजेच NDEAR, आणि राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान मंच- NETF या दिशेने संपूर्ण देशासाठी डिजिटल आणि तंत्रज्ञानाचा आराखडा उपलब्ध करुन देण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत. तरुण मन ज्या दिशेने विचार करेल, ज्या मोकळ्या आकाशात भराऱ्या घेऊ पाहील, ते करण्याची संधी त्याला या नव्या शैक्षणिक धोरणामुळे मिळेल.
मित्रांनो,
गेल्या एका वर्षात आपण हे ही अनुभवले असले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला कोणत्याही प्रकारच्या दबावापासून मुक्त ठेवण्यात आले आहे. जो विमुक्तपणा, धोरणात्मक पातळीवर आहे, तोच विद्यार्थ्याना
मिळणाऱ्या पर्यायातही आहे. आता विद्यार्थ्यानी किती काळ अभ्यास करावा, किती अभ्यास करावा, हे केवळ शिक्षणमंडळे किंवा विद्यापीठे ठरवणार नाहीत. या निर्णयात विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. विविध ठिकाणी प्रवेश घेण्याची किंवा एखादा अभ्यासक्रम सोडण्याची जी व्यवस्था आता सुरु झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्याना एकाच वर्गात आणि एकाच अभ्यासक्रमात अडकून राहण्याच्या बंधनातून मुक्त करण्यात आले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 'अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट' या प्रणालीमुळे या दिशेने विद्यार्थ्यांसाठी क्रांतिकारी बदल घडणार आहे. आता प्रत्येक युवक आपल्या आवडीनुसार, आपल्या सोयीनुसार कधीही एक शाखा निवडू शकेल , सोडू शकेल. आता कोणताही अभ्यासक्रम निवडताना ही भीती असणार नाही की जर जर आपला निर्णय चुकला तर काय होईल? त्याचप्रमाणे , '‘अध्ययनाच्या पातळीचे विश्लेषण करण्यासाठी संरचनात्मक मूल्यमापन’ ' अर्थात 'सफल' च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आकलनाची देखील वैज्ञानिक व्यवस्था सुरु झाली आहे. ही व्यवस्था येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना परीक्षांच्या भीतीपासून मुक्ती देईल. जेव्हा ही भीती युवा मनातून निघून जाईल तेव्हा नवनवीन कौशल्ये शिकण्याचे साहस आणि नवनवीन नावीन्यपूर्ण संशोधनाचे नवे पर्व सुरु होईल, अमाप संधी निर्माण होतील. म्हणूनच मी पुन्हा सांगेन की आज नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत हे जे नवीन कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत त्यांच्यात भारताचे भाग्य पालटण्याचे सामर्थ्य आहे.
मित्रांनो ,
तुम्ही-आम्ही गेल्या अनेक दशकांपासून अशी परिस्थिती पाहिली आहे जेव्हा असे समजले जायचे की उत्तम शिक्षणासाठी परदेशातच जावे लागेल. मात्र उत्तम शिक्षणासाठी परदेशातून विद्यार्थी भारतात येतील, सर्वोत्तम संस्था भारताकडे आकर्षित होतील याकडे आता आम्ही लक्ष देत आहोत. देशातील दीडशेहून अधिक विद्यापीठांमध्ये परराष्ट्र व्यवहार कार्यालय स्थापन करण्यात आली आहेत ही माहिती उत्साह वाढवणारी आहे. भारताच्या उच्च शिक्षण संस्थानी आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन आणि शिक्षणात आणखी प्रगती करावी यासाठी आज नवीन मार्गदर्शक तत्वे देखील जारी करण्यात आली आहेत.
मित्रांनो ,
आज निर्माण होत असलेल्या संधी साकार करण्यासाठी आपल्या युवकांना यापुढे जगाच्या एक पाऊल पुढे रहावे लागेल, पुढचा विचार करावा लागेल. आरोग्य असेल, संरक्षण असेल, पायाभूत विकास असेल, तंत्रज्ञान असेल, देशाला प्रत्येक बाबतीत सक्षम आणि आत्मनिर्भर व्हावेच लागेल. 'आत्मनिर्भर भारत' चा हा मार्ग कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाच्या मार्गाने जातो, ज्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विशेष लक्ष देण्यात आले आहे. मला आनंद आहे की एका वर्षात 1200 हून अधिक उच्च शिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकासाशी संबंधित शेकडो नव्या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे.
मित्रांनो ,
शिक्षणाबाबत पूज्य बापू महात्मा गांधी म्हणायचे - "राष्ट्रीय शिक्षण खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होण्यासाठी राष्ट्रीय परिस्थिती प्रतिबिंबित करायला हवी. "
बापूंचा हा दूरदर्शी विचार साकारण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये, मातृभाषांमध्ये शिक्षण देण्याचा विचार एनईपीमध्ये मांडण्यात आला आहे. आता उच्च शिक्षणात 'शिक्षणासाठी' स्थानिक भाषा हा देखील एक पर्याय असेल. मला आनंद आहे की 8 राज्यांतील 14 अभियांत्रिकी महाविद्यालये, 5 भारतीय भाषा- हिंदी, तामिळ,तेलुगु, मराठी बंगाली या 5 भारतीय भाषांमधून अभियांत्रिकी शिक्षण सुरु करणार आहेत. अभियांत्रिकी शिक्षणातील अभ्यासक्रम 11 विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित करणारे एक साधन देखील विकसित करण्यात आले आहे. प्रादेशिक भाषांमध्ये आपले शिक्षण सुरु करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मला विशेष अभिनंदन करायचे आहे. याचा सर्वात जास्त लाभ देशातल्या गरीब , गावे -खेड्यांमध्ये राहणाऱ्या मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना, दलित-मागास आणि आदिवासी बंधू भगिनींना होईल. या कुटुंबातून आलेल्या मुलांना सर्वात जास्त भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागत होता, सर्वात जास्त नुकसान याच कुटुंबांमधील हुशार मुलांना सोसावे लागत होते. मातृभाषेत शिक्षणामुळे गरीब मुलांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांचे सामर्थ्य आणि प्रतिभेला न्याय मिळेल.
मित्रांनो ,
प्रारंभिक शिक्षणात देखील मातृभाषेला प्रोत्साहित करण्याचे काम सुरु झाले आहे. आज जो 'विद्या प्रवेश' कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे, त्याचीही यात खूप मोठी भूमिका आहे. प्ले स्कूलची जी संकल्पना आतापर्यंत केवळ मोठया शहरांपुरती मर्यादित आहे, 'विद्या प्रवेश' च्या माध्यमातून ती आता दुर्गम भागातील शाळांपर्यंत पोहचेल, गावागावांमध्ये जाईल. हा कार्यक्रम आगामी काळात सार्वत्रिक कार्यक्रम म्हणून लागू होईल आणि राज्ये देखील आपापल्या गरजांनुसार त्याची अंमलबजावणी करतील. म्हणजेच देशातील कुठल्याही भागात मुले श्रीमंत असो व गरीब , त्यांचे शिक्षण हसतखेळत होईल, सहज होईल या दिशेने हा प्रयत्न आहे. आणि सुरुवात हसतखेळत झाली की पुढे यशाचा मार्ग देखील सहज साध्य होईल.
मित्रांनो ,
आज आणखी एक काम झाले आहे जे माझ्या जिव्हाळ्याचे आहे, खूप संवेदनशील आहे. आज देशात 3 लाखांपेक्षा अधिक मुले अशी आहेत ज्यांना शिक्षणासाठी सांकेतिक भाषेची गरज भासते. हे लक्षात घेऊन भारतीय सांकेतिक भाषेला देखील प्रथमच भाषा विषयाचा दर्जा देण्यात आला आहे. आता विद्यार्थी एक भाषा म्हणून ती शिकू शकतील. या निर्णयामुळे भारतीय सांकेतिक भाषेला चालना मिळेल आणि आपल्या दिव्यांग मित्रांना खूप मदत होईल.
मित्रांनो ,
तुम्हाला माहितच आहे की कोणत्याही विद्यार्थ्याच्या संपूर्ण शिक्षणात , त्याच्या आयुष्यात त्याचे शिक्षक हे खूप मोठी प्रेरणा असतात. आपल्याकडे तर म्हटलेच आहे -
गुरौ न प्राप्यते यत् तत्,
न अन्य अत्रापि लभ्यते।
अर्थात, जे गुरूकडून प्राप्त होऊ शकत नाही ते कुठेच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजेच असे काही नाही जे एक उत्तम गुरु, उत्तम शिक्षक मिळाल्यानंतर दुर्लभ असेल. म्हणूनच राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आखणीपासून अंमलबजावणी पर्यंत प्रत्येक टप्प्यात आपले शिक्षक सक्रियपणे या अभियानाचा भाग आहेत. आज सुरु करण्यात आलेला ‘निष्ठा' 2.0 हा कार्यक्रम देखील याच दिशेने एक महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील शिक्षकांना आधुनिक गरजांनुसार प्रशिक्षण देखील मिळेल आणि ते विभागाकडे आपल्या सूचना देखील पाठवू शकतील. माझी तुम्हा सर्व शिक्षकांना, शिक्षण
तज्ञांना विनंती आहे की या प्रयत्नांमध्ये सक्रिय भाग घ्या, जास्तीत जास्त योगदान द्या. तुम्हा सर्वांना शिक्षण क्षेत्रातला एवढा अनुभव आहे, गाढा अनुभव आहे, म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुमचे प्रयत्न राष्ट्राला खूप पुढे घेऊन जातील. मला वाटते की सध्याच्या काळात आपण ज्या भूमिकेत आहोत , आपण भाग्यवान आहोत कारण एवढ्या मोठ्या बदलांचे आपण साक्षीदार बनत आहोत , या बदलांमध्ये सक्रिय भूमिका पार पाडत आहोत. देशाचे भविष्य घडवण्याची, भविष्याची रूपरेषा आपल्या हाताने आखायची ही सोनेरी संधी तुमच्या आयुष्यात आली आहे. मला विश्वास आहे की यापुढील काळात जसजशी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची वैशिष्ट्ये प्रत्यक्षात साकारतील , आपल्या देशाला एका नव्या युगाचा साक्षात्कार होईल. जसजसे आपण आपल्या युवा पिढीला एका आधुनिक आणि राष्ट्रीय शिक्षण व्यवस्थेशी जोडत जाऊ , देश स्वातंत्र्याचे अमृत संकल्प सिद्धीस नेत जाईल. याच शुभेच्छांसह मी माझे भाषण थांबवतो. तुम्ही सगळे तंदुरुस्त रहा, आणि नव्या ऊर्जेने पुढे जात रहा. खूप खूप धन्यवाद।
***
MC/RA/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740614)
Visitor Counter : 538
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam