आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविडबाधित आईने बाळाला स्तनपान करावे मात्र स्तनपान करत नसताना बाळापासून सहा फुटाचे अंतर राखावे - डॉ. मंजू पुरी, प्रसुती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख, लेडी हार्डींज वैदयकीय महाविद्यालय, नवी दिल्ली


आई आणि अर्भकाच्या हितासाठी, कोविडमुक्त झाल्यावर त्यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीची आमची आग्रही शिफारस - डॉ. मंजू पुरी

Posted On: 26 JUL 2021 6:25PM by PIB Mumbai

 

गरोदर मातेला कोविड प्रतिबंधक लस देणे आणि कोविड-19 पासून स्वतःचे तसेच बाळाचे रक्षण आईने कसे करावे याबाबत नुकत्याच घेतलेल्या निर्णयाबाबत डॉ. मंजू पुरी, प्रसुती आणि स्त्रीरोग विभागप्रमुख, लेडी हार्डींज वैदयकीय महाविद्यालय, नवी दिल्ली यांनी चर्चा केली. 

 

गरोदरपणातही कोविड प्रतिबंधक लस घ्यायला आता मंजूरी मिळाली आहे. ही कशी लाभदायक ठरेल?

पहिल्या लाटेच्या तुलनेत कोविड-19च्या दुसऱ्या लाटेत अनेक गरोदर मातांना लागण झाली. कोविडने गंभीर स्वरुप घेतले तर गरोदरपणात गुंतागुंत वाढू शकते. विशेषत: शेवटच्या तिमाहीत. यावेळी गर्भाशयाचा आकार वाढलेला असतो, त्याचा फुफ्फुसाच्या भात्यावर दाब पडतो. प्राणवायू संपृक्ततेबाबत जुळवून घेण्याच्या महिलेच्या क्षमतेवर ताण येतो. यामुळे रक्तातील प्राणवायू अचानक कमी होऊन आई आणि बाळ दोघांच्या जीवाला धोका संभवतो.

गरोदर मातांचे गंभीर आजारापासून रक्षण करण्यात लस मदत करते. लसीकरण झालेल्या आईमुळे गर्भालाही काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते. लसीकरणा नंतर आईच्या शरीरात तयार झालेले अँटीबॉडीज् ( प्रतिपिंडे)  विकसित होत असलेल्या गर्भालाही रक्ताद्वारे मिळतात.  स्तनदा मातांच्या बाबतीत बाळाला दुधातून प्रतिपिंडे मिळतात.

 

लसीकरणामुळे स्त्रीयांना व्यंधत्व येते असा काहींचा समज आहे, हे खरं आहे का?

समाज माध्यमांवर  पसरवल्या जाणाऱ्या या निव्वळ अफवा आहेत. विषाणू पेक्षा ही चुकीची माहिती अधिक घातक आहे. कोविड-19 प्रतिबंधक लस तुलनेने नवीन असल्या तरी त्या वेळोवेळी अद्यावत चाचण्या करुन तयार केल्या आहेत.

खरंतर, गरोदरपणात आई आणि तिच्या होणाऱ्या बाळाला विविध आजारापासून वाचवण्यासाठी आपण हेपेटायटिस बी, थंडीताप, डांग्या खोकला प्रतिबंधक लसी देतोच की. दुसरीकडे सुरक्षेबाबत पूर्ण खातरजमा झाल्यावरच आपल्या नियामकांनी गरोदरपणात लस द्यायला  मंजूरी दिली आहे. लसीकरणामुळे व्यंधत्व येते हे सिद्ध करणारा कोणताही अभ्यास किंवा वैज्ञानिक आकडेवारी उपलब्ध नाही.

 

गरोदरपणात स्वतःला आणि बाळाला कोविड होण्यापासून वाचवण्यासाठी आईने काय खबरदारी घ्यावी?

गरोदरपण आणि बाळाचा जन्म याला आपल्या समाजात विशेष महत्व आहे. त्याला साजरे केले जाते. मात्र महामारीच्या या काळात खुलेपणाने वावरल्यास आई आणि बाळाला संसर्ग होऊ शकतो. गरोदर मातेने घरी असले तरी मास्क /  मुखपट्टी वापरावी आणि घरातल्या इतर सदस्यांपासून सुरक्षित अंतर राखावे अशी शिफारस आम्ही करतो. तर, गरोदरपणात महिलेले कोविड संबंधित सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी म्हणजे बाळाच्या जन्मानंतर संसर्ग तसेच संबंधित गुंतागुतीपासून त्यांचे रक्षण करता येईल.

 

गरोदर बाईला कोविड-19 ची लक्षणे आढळली तर तिने काय करावे?

कोविडची लक्षणे आढळली तर सगळ्यात आधी, लवकरात लवकर चाचणी केली पाहिजे. म्हणजे लवकर निदान करता येईलमग आजाराला चांगल्या प्रकारे हाताळता येईल.

कोविडचे व्यवस्थापन गरोदरपण आणि सर्वसामान्यांमधे जवळपास सारखेच आहे, पण ते डॉक्टरांच्याच मार्गदर्शनाखाली झाले पाहिजे. महिलेने स्वतःचे विलगीकरण केले पाहिजे, द्रवपदार्थ जास्त प्रमाणात घेतले पाहिजेत, दर चार ते सहा तासाने तापमान आणि प्राणवायूची पातळी तपासला हवी, पॅरासिटेमॉल घेऊनही ताप कमी होत नसेल तर डॉक्टरांशी संपर्क करणे गरजेचे आहे. प्राणवायूची पातळी खालावत असेल, उतरता कल दाखवत असेल, उदाहरणच द्यायचे तर सकाळी पातळी 98 असेल, संध्याकाळी 97 आणि पुढल्या दिवशी घसरतच असेल तर तिने डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

या शिवाय मधूमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा असे आजार असणाऱ्या महिलांनी याकाळात अधिक सावधानता बाळगावी. त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. आई आणि बाळाच्या(गर्भाच्या)हितासाठी, कोविडमुक्त झाल्यावर त्यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीची आम्ही आग्रही शिफारस करतो.

 

गर्भातल्या बाळाला आईमुळे कोविड-19 ची लागण होऊ शकते का?

असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आढळलेला नाही. गर्भाशयात बाळाचे संरक्षण करणारा प्लॅसेंटा अवयव आकार घेतो असे आमच्या अभ्यासात आढळून आले. काही नवजात बालकांना संसर्ग झाल्याचे आढळले पण तो आईच्या गर्भात झाला की जन्माला आल्यावर लगेच झाला याची स्पष्टता नाही.

 

आपल्या नवजात बालकाचे कोविड-19 पासून रक्षण करण्यासाठी कोरोनाग्रस्त आईने कोणती काळजी घ्यावी?

आईने बाळाला स्तनपान करावे मात्र स्तनपान करत नसताना बाळापासून सहा फुटाचे अंतर राखावे असा आमचा सल्ला आहे. चाचणीत कोरोना नाही हे स्पष्ट झालेली व्यक्तीही नवजात बालकाची काळजी घेण्यात मदत करु शकते. नवजात बालकाला स्तनपान करण्याआधी तिने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. मुखपट्टी, चेहरा संरक्षक अशा काळजीवाहू साधनांचा वापर करायलाच हवा.

आसपासच्या परिसराचे वारंवार निर्जंतुकीकरण करायला हवे. बाळाची काळजी घ्यायला दुसरे कोणी नसेल तर आईने सतत मुखपट्टी वापरावी आणि शक्य होईल तितके बाळापासून सुरक्षित अंतर राखावे. आई आणि बाळाने हवेशीर खोलीत राहावे.

 

प्रसुतीपश्चात नैराश्य आणि अस्वस्थता महिलांमधे सर्वसामान्य आहे. महामारीच्या काळात महिलांमधे मानसिक आरोग्य प्रश्न वाढल्याचे तुमच्या निदर्शनाला आले आहे का?

अगदीच, या काळात गरोदरपण आणि बाळ जन्माला आल्यानंतर महिलांमधे मानसिक आरोग्य बाबतच्या समस्या वाढल्याचे दिसून आले. याकाळात महिलांमधे मानसिक आणि हॉर्मोनल स्वरुपाचे खूप बदल होत असतात. याचा सामना करण्याची कौशल्य क्षमता उणावलेली असते अशात तिला सामाजिक पाठिंब्याची निकड असते.अशावेळी समाजाचा पाठिंबा मिळाला नाही तर तिला एकटेपणा, असहाय्यता आणि नैराश्याचा सामना करावा लागू शकतो. कोणाही साठी 15 दिवसांचे विलगीकरण अवघडच पण गर्भवती आणि बाळंत झालेल्या महिलेसाठी आणखीच जास्त. तेव्हा याकाळात महिलांना सातत्याने पाठिंबा मिळत राहिल याची खातरजमा करायला हवी. कुटुंबाने व्हिडिओकॉलच्या माध्यमातून संपर्कात राहायला हवे. तिच्या मनोवस्थेत काही बदल होताहेत का? हे पाहायला हवे.  नैराश्याची लक्षणे दिसली तर  वैद्यकीय मदत करायला हवी.

गर्भवती महिलांना आम्ही नेहमी दोन सोपे प्रश्न विचारतो, एक म्हणजे नेहमीच्या दिनश्चर्येत तिला कमी किंवा अजिबातच रस वाटत नाही का? आणि दुसरा, गेल्या दोन आठवड्यात कारणाशिवाय तिला दु:खी किंवा रडावेसे वाटते का? याची उत्तरे "होय" असतील तर मग तिला मानसोपचारतज्ञाची गरज आहे. याकाळात महिलेच्या वागण्यात काही बदल होतोय का याकडे डॉक्टर आणि घरातल्यांनी काळजीपूर्वक पाहायला हवे.

 

तुमच्या महिला रुग्णांना काय सल्ला द्यायला आवडेल?

सुरक्षित राहा, पुरेशी खबरदारी घ्या आणि कोविडला प्रतिबंध करणारे वर्तन अंगिकारा असे आम्ही त्यांना सांगतो. उपलब्ध होईल तेव्हा लस घ्या. अनेकांना भेटणं, गर्दी टाळा.

ताप, घसा खवखवणे, वास किंवा चव न जाणवणे किंवा कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात येणे यासारखी लक्षणे आढळली तर त्यांनी तातडीने वैदयकीय मदत घ्यावी. निदान करुन घेण्यात दिरंगाई करुन नये आणि आपल्या मनाने उपचार करु नयेत.

सर्वात शेवटचे, आम्ही देखील सर्व गरोदर महिलांना गरोदरपण आणि प्रसुतीपश्चात काळासाठी विविध गर्भनिरोधक पद्धतीबाबत समुपदेशन करतो. बाळ जन्माला आल्या नंतर किंवा सिझेरीयन नंतर लगेच बसवता येईल अशा अंतरगर्भाशय उपकरण (सीयुटी) ची माहीती दिली जाते. यामुळे रुग्णालयात अनावश्यक येणे आणि अनियोजित गरोदरपणाचा धोका टाळता येतो.

***

Jaydevi PS /V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739168) Visitor Counter : 1153