युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

भारोत्तोलक मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले, टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे पहिले पदक

Posted On: 24 JUL 2021 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

ठळक घडामोडी :

  • टोक्यो इथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आज  भारताच्या मीराबाई चानूने एकूण  202 किलो वजन उचलले असून यात स्नॅच प्रकारात  87 किलो व क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो वजन तिने उचलले.
  • ऑलिंपिकमध्ये  पदक जिंकून सुरुवात झाल्याबद्दल   पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  आनंद व्यक्त केला आणि चानूच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले.
  • देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असे  मीराबाई चानू यांचे अभिनंदन करताना क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी म्हटले आहे.

भारोत्तोलक मीराबाई चानूने आज महिलांच्या 49 किलो गटात  रौप्यपदक जिंकून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला  पहिले पदक मिळवून दिले.  मीराबाईने  एकूण 202 किलो वजनउचलले, ज्यात स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो होते. मूळच्या माणिपूरच्या 26 वर्षीय मीराबाईने  2018 मध्ये पाठीला झालेल्या दुखपतीनंतर खूप काळजी घेत आपला सराव केला .  पहिले पदक मिळवून देत संपूर्ण देशाच्या कौतुकास पात्र ठरलेल्या   मीराबाईचे तिच्या यशाबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रीडामंत्री  अनुराग ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.  देशाच्या कानाकोपऱ्यातून तिचे अभिनंदन होत आहे.

ऑलिंपिकमध्ये  पदक जिंकून सुरुवात झाल्याबद्दल   पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी  आनंद व्यक्त केला आणि चानूच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन केले. टोकियो  2020च्या अशा सुखद सुरुवातीचा आनंद शब्दातीत आहे ! मीराबाई चानूच्या  दिमाखदार  कामगिरीने संपूर्ण देश आनंदात आहे. भारोत्तोलनात   रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. तिचे यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहे , असे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी चीअर 4 इंडिया या हॅशटॅगद्वारे ट्विट केले.

135 कोटी  भारतीयांच्या चेहऱ्यावर हसू फुलवल्याबद्दल पंतप्रधान मोदी  आणि संपूर्ण देशाच्या वतीने आभार मानत असल्याचे, क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर  यांनी मीराबाई चानूचे  अभिनंदन करताना म्हटले आहे.  पहिला दिवस, पहिले पदकदेशाच्या शिरपेचात आपण  मानाचा तुरा खोवलात .

मीराने आपल्या गावा जवळच इम्फाळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ( SAI) केंद्रात प्रशिक्षण सुरू केले. गेल्या पाच वर्षांत मीराबाई चानू  फार तर पाच दिवस माणिपूरमधल्या आपल्या घरी राहिली असेल.  2018 मध्ये तिच्या पाठीच्या  दुखापतीवरील उपचारासाठी  मुंबईचा प्रवास वगळता संपूर्ण काळ ती नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था, पटियाला इथल्या  तिच्या प्रशिक्षण तळावर राहिली आहे. 2017 मध्ये तिला टार्गेट  ऑलिम्पिक पोडियम योजनेत सहभागी करून घेण्यात  आले.

या योजनेअंतर्गत ती अमेरिकेतल्या  सेंट लुईस इथे गेली . तिथे  प्रख्यात फिजिकल थेरपिस्ट   प्रशिक्षक डॉ. अरॉन  होर्चिग यांनी तिला तिच्या खांद्यांमधून आणि पाठीतून  येणाऱ्या कळांना अटकाव घालण्याचे  तंत्र सुधारण्यास मदत केली .  याचा उपयोग तिला   एप्रिल 2021 मध्ये ताशकंद  येथे झालेल्या आशियाई भारोत्तोलन  अजिंक्यपद स्पर्धेत क्लीन अँड जर्क प्रकारात जागतिक विक्रम प्रस्थापित करताना  झाला .

अमेरिका  भारतीय प्रवाशांना येण्यास बंदी घालणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही तासातच  मीराला सेंट लुईस येथे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील वाढत्या कोविड १९ रुग्णांच्या संख्येमुळे अमेरिका भारतीय प्रवाशांसाठी उड्डाणे बंद करण्याच्या एक दिवस आधी 1 मे रोजी मीरा विमानात बसली होती .

यापूर्वी ऑक्टोबर 2020 आणि डिसेंबर 2020 मध्ये डॉ. अरॉन  होर्चिग यांच्याकडे उपचार आणि प्रशिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली होती.

 

 Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738647) Visitor Counter : 201