आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड 19  लसीकरण : गैरसमज आणि तथ्ये


केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी कोविड लसीच्या कमतरतेच्या मुद्द्यावर ट्विट्सद्वारे भाष्य केले

गैरव्यवस्थापन टाळण्याच्या उद्देशाने लसीकरण मोहिमेचे  प्रभावीपणे आगाऊ नियोजन सुनिश्चित करण्यासाठी "राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लस उपलब्धतेबाबत आगाऊ  माहिती दिली जाते"

बेजबाबदार विधानांद्वारे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला

Posted On: 14 JUL 2021 6:15PM by PIB Mumbai

 

देशात कोविड लसींच्या मात्रांची कमतरता व मंदावलेली उपलब्धता याबाबत काही राज्ये व राजकीय प्रतिनिधींनी अनेक विधाने केली आहेत. आज ट्वीटच्या मालिकेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी हे आरोप आणि गैरसमज खोडून काढताना म्हटले आहे की अशी विधाने तथ्यावर आधारित नसून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा यामागे उद्देश आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले की पुरावा आणि वस्तुस्थितीच्या आधारे प्रचलित परिस्थितीचे विश्लेषण करून सध्याची परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. सरकारी आणि खासगी रुग्णालयांद्वारे लसीकरण सक्षम करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जून 2021 मध्ये राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना 11.46 कोटी लसींच्या मात्रा उपलब्ध करुन दिल्या होत्या. जुलै महिन्यात ही उपलब्धता 13.50  कोटी मात्रांपर्यंत वाढवण्यात आली असे ते म्हणाले.

उत्पादकांशी झालेल्या चर्चेच्या आधारे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 19 जून 2021 रोजी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना जुलै महिन्यात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येणा-या लसीच्या मात्रांची माहिती दिली होती. त्यानंतर, 27 जून आणि 13 जुलै रोजी राज्यांना देखील जुलै 2021 च्या पहिल्या आणि दुसऱ्या पंधरवड्यासाठी दररोज लसींच्या उपलब्धतेबद्दल आगाऊ  माहिती कळवण्यात आली होती. राज्यांना लसींच्या मात्रांची वेळ आणि संख्या याची माहिती असावी आणि त्यानुसार राज्य/जिल्हा पातळीवर लसीकरण मोहिमेचे अधिक चांगल्या आणि प्रभावी पद्धतीने नियोजन करणे शक्य होईल यासाठी हे करण्यात आले. राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना कोविड लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून देशातील लोकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की लस उपलब्धतेबाबत राज्यांना अगोदर माहिती देऊनही लसीकरण लाभार्थ्यांची गैरसोय आणि लांबच लांब  रांगा दिसत आहेत, त्यामुळे खरी समस्या कोणती आणि या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे हे स्पष्ट दिसत आहे. मनसुख मांडवीय यांनी असाही सल्ला दिला की माध्यमांमधून लोकांना चुकीची माहिती देऊन भीती निर्माण करणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कारण शासन प्रक्रियेपासून त्यांनी स्वतःला इतके दूर केले आहे की त्यांना लसींच्या उपलब्धतेबाबत दिलेली आगाऊ माहिती देखील माहित नाही.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735508) Visitor Counter : 166