वस्त्रोद्योग मंत्रालय

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला


दर्शना विक्रम जरदोश यांनीदेखील केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 08 JUL 2021 6:24PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार तसेच अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबीन इराणी यांच्याकडून वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. दर्शना विक्रम जरदोश यांनीदेखील आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला.

नवीन मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, पीयूष गोयल यांनी नव्या कार्यक्षेत्राची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. याआधीच्या वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांचे कौतुक करताना गोयल म्हणाले की इराणी यांनी वस्त्रोद्योग मंत्री म्हणून मोठ्या प्रमाणावर उत्तम कार्य केले आहे, त्यामुळे गेल्या काही काळात या मंत्रालयाचा विस्तार अनेक पटीने वाढला आहे. वस्त्रोद्योग क्षेत्र आणखी मजबूत व्हावे आणि या क्षेत्राने अर्थव्यवस्थेला अधिक पाठबळ द्यावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा आहे असे त्यांनी सांगितले. गोयल यांनी पुढे सांगितले की, वाणिज्य, उद्योग आणि वस्त्रोद्योग या क्षेत्रांमध्ये जास्त प्रमाणात ताळमेळ असावा हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे आणि म्हणूनच कदाचित, त्यांनी या मंत्रालयाचा कार्यभार देखील माझ्याकडे सोपविला आहे.

गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योग हे रोजगार संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने मोठे क्षेत्र आहे, म्हणूनच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांना, विशेषतः महिलांना उत्पन्न मिळविण्यासाठी मोठे पाठबळ देण्याचा प्रयत्न करण्यासाठी केंद्र सरकारला  या क्षेत्राच्या माध्यमातून ही खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात आणखी सुधारणा घडवून आणणे आणि  निर्यातीला प्रोत्साहन देणे शक्य होईल याची सुनिश्चिती करून घेणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी दिली. या क्षेत्रात विकासाला मोठा वाव आहे याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.

गोयल पुढे म्हणाले की, केंद्र सरकारला ब्रँड इंडियाला प्रोत्साहन देण्याची इच्छा आहे आणि ब्रँड इंडियाची उभारणी करण्यात यापूर्वी ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली ती भारतीय वस्त्रे यासाठी पुन्हा एकदा महत्त्वाची भूमिका पार पाडतील. गोयल यांनी मंत्रालयाच्या नवनिर्वाचित राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोश यांचे स्वागत देखील केले आणि त्या आधारस्तंभाची भूमिका उत्तमपणे पार पाडतील आणि या क्षेत्राच्या विकासाला हातभार लावतील असा विश्वास व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्यमंत्री दर्शना विक्रम जरदोश म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फार मोठी संधी दिली आहे आणि पंतप्रधान मोदी यांची नेतृत्वात आणि कॅबिनेट मंत्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून त्या वस्त्रोद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देऊन विकासाला मदत करतील आणि या क्षेत्राला मेक इन इंडियाअभियानातील महत्त्वाच्या क्षेत्राचे स्थान मिळवून देतील.

***

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1733796) Visitor Counter : 190