वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी विशेष बैठकीच्या सत्रात हिंद-प्रशांत प्रदेशातील देशांच्या व्यापार मंत्र्यांना केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
07 JUL 2021 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2021
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, रेल्वे, ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज हिंद-प्रशांत प्रदेशातील व्यापारी समुदायाला या भागातील विकास, व्यापार आणि प्रगतीला उत्तेजन देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केले. “सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा विकसित करताना” या विषयावर हिंद-प्रशांत प्रदेशातील देशांच्या व्यापार मंत्र्यांसोबत झालेल्या भारतीय उद्योग महासंघाच्या (CII) विशेष बैठकीत बीजभाषण करताना ते म्हणाले की, भारताच्या आतापर्यंतच्या उद्योगविषयक कामगिरीमुळे येत्या काळात भारत हा आपला सर्वात नैसर्गिक आणि सर्वात विश्वसनीय सहयोगी असेल हा विश्वास आपल्या मित्र देशांमध्ये निर्माण होईल.
गोयल म्हणाले की जेव्हा आपण सामायिक समृद्धीबद्दल चर्चा करतो तेव्हा “सामायिक समृद्धी मिळविणे हे सामायिक वचनबद्धतेशिवाय अशक्य आहे” हे आपण लक्षात ठेवायला हवे. या वचनबद्धतेमध्ये आव्हाने, संधी आणि धोक्यांसोबतच लाभदेखील सर्वांनी सामायिकपणे वाटून घेणे अपेक्षित आहे असे ते म्हणाले.
महामारीमुळे ज्या त्रासदायक स्थितीला सर्वांनाच तोंड द्यावे लागले त्या स्थितीलादेखील एक चंदेरी किनार आहे- एकमेकांना मदत करण्यासाठी सर्व देशांमध्ये बंधुभावाची भावना वाढीस लागलेली आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ह्या बंधुभावाच्या चैतन्याने एक असा भक्कम पाया उभारला आहे की ज्यावर आशादायक भागीदारी उभारण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
वैश्विकीकरणाच्या या जगात, नवे आर्थिक गुरुत्वकेंद्र म्हणून हिंद-प्रशांत प्रदेशाचे वर्णन करत, केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2015 मध्ये हिंद-प्रशांत प्रदेशाविषयीची त्यांची संकल्पना एकाच शब्दात स्पष्ट केली होती, ‘सागर’ म्हणजे संपूर्ण प्रदेशात सुरक्षितता आणि विकास. पंतप्रधानांच्या या संकल्पनेला या प्रदेशातील सर्व देशांनी मार्गदर्शक तत्व म्हणून अनुसरले पाहिजे कारण सुरक्षित आणि स्थिर स्वरूपातील हिंद-प्रशांत प्रदेश म्हणजेच सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीचे वातावरण होय असे गोयल म्हणाले.
हिंद-प्रशांत प्रदेशामधील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारविषयक करार झाले आहेत, त्यामुळे गेल्या काही काळात अनेक करांचे दर कमी झाले आहेत असे त्यांनी सांगितले. मात्र, कर बाह्य बंधनांमुळे या प्रदेशात, व्यापारात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत असे ते पुढे म्हणाले. व्यापारात सुलभता आणल्यामुळे वस्तूंच्या सीमापार आदानप्रदानात सुगमता येऊ शकते.
स्वच्छ तंत्रज्ञान (Clean Tech), पर्यटन, माल वाहतूक, शाश्वत शेती, स्टार्ट अप्स, आरोग्यसेवा, शिक्षण आणि जीवन विज्ञान या क्षेत्रांमध्ये आपण आयात-निर्यात भागीदारी वाढवू शकतो असे गोयल यांनी सांगितले. त्यांनी या प्रदेशातील विविध देशांमधील कंपन्यांना भारतात उत्पादन क्षेत्रात भक्कम पाया निर्माण करण्यासाठी आणि परस्परांच्या पुरवठा साखळ्यांमध्ये सहभागाला गती देण्यासाठी आमंत्रित केले.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1733454)
आगंतुक पटल : 220