आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारतीय सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टीयम (INSACOG)शी संबंधित प्रश्नोत्तरे

Posted On: 07 JUL 2021 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 जुलै 2021

 

प्र.- INSACOG म्हणजे काय?

उ.- INSACOG अर्थात द इंडिअन सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टीयम हा भारत सरकारने 30 डिसेंबर 2020 ला स्थापन केलेला जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांचा राष्ट्रीय पातळीवरील बहु-संस्था संघ आहे.  सुरुवातीला या संघात 10 प्रयोगशाळांचा समावेश होता. मात्र आता, INSACOG अंतर्गत कार्य करणाऱ्या प्रयोगशाळांची व्याप्ती वाढविण्यात आली असून सध्या या संघामध्ये 28 प्रयोगशाळांचा समावेश केलेला आहे. या प्रयोगशाळा सार्स- को व्ही-2 या विषाणूच्या जनुकीय उत्परिवर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी संशोधनाचे काम करतात. 

 

प्र.- INSACOG चे उद्दिष्ट काय आहे?

उ.- सार्स- को व्ही-2 विषाणू ज्याला सर्वसामान्य भाषेत कोविड-19 विषाणू म्हटले जाते त्याच्या संसर्गाने जागतिक पातळीवर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला अभूतपूर्व असा धोका निर्माण केला. सार्स- को व्ही-2 विषाणूच्या प्रसाराचा प्रकार आणि त्यात होणारी उत्क्रांती, या विषाणू मध्ये होणारे उत्परिवर्तन आणि त्यातून निर्माण होणारी विविध रूपे यांना संपूर्णपणे समजून घेण्यासाठी या विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा सखोल अभ्यास आणि जनुकीय माहितीचे विश्लेषण होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशभरात सापडलेल्या विविध रूपांतील  सार्स-को व्ही-2 विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा अभ्यास करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार तसेच उत्क्रांती कशी होते याबाबतचे आपले ज्ञान वाढविण्यासाठी INSACOG ची स्थापना करण्यात आली. INSACOG मध्ये कार्यरत प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांचे विश्लेषण आणि क्रमनिर्धारण निश्चित करण्यातून या विषाणूच्या जनुकीय लिपीमध्ये झालेले कोणतेही बदल, किंवा विषाणूमधील उत्परिवर्तन नेमके लक्षात येऊ शकते.

INSACOG ची विशेष उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

  • देशात सापडणाऱ्या विषाणूंच्या नमुन्यांपैकी दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC) यांची अचूक स्थिती निश्चित करणे.
  • विविध जनुकीय रूपांची माहिती लवकर मिळण्यासाठी संरक्षणात्मक तपासणी तसेच संसर्गवाढ तपासणी यंत्रणा निर्माण करणे आणि सर्वसामान्य जनतेकडून परिणामकारकतेने आरोग्यविषयक प्रतिसाद मिळण्यासाठी मदत करणे.
  • मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरविण्याऱ्या घटनांदरम्यान तसेच ज्या भागात नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण आणि या रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे अशा भागातून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये जनुकीय उत्परिवर्तन झालेल्या रूपांची उपस्थिती निश्चित करणे.   

 

प्र.- सार्स-को व्ही-2 विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचे संशोधन भारतात कधी सुरु झाले?

उ.- भारतात 2020 साली सार्स-को व्ही-2 विषाणूच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचे संशोधन सुरु झाले. सुरुवातीला, युनायटेड किंगडम, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये कोविडने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ दिसून आल्यामुळे या देशांतून भारतात आलेल्या किंवा प्रवासादरम्यान या देशांमार्गे भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये (NIV)आणि भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या (ICMR) प्रयोगशाळांमध्ये केले जात होते. रुग्णसंख्येत   अचानक वाढ दिसून आलेल्या राज्यांमधील RTPCR चाचणीत बाधित आढळलेल्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण निश्चित करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जात होते.शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन मंडळ, केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच स्वतंत्र संस्थांच्या प्रयत्नांनंतर या कामाचा विस्तार करण्यात आला.

या विषाणूच्या अत्यंत वेगाने पसरणाऱ्या अल्फा(B.1.1.7), बीटा(B.1.351)  आणि गॅमा (P.1) या जागतिक चिंताजनक रूपांचा प्रसार रोखण्यावर भारताने सुरुवातीला लक्ष केंद्रित केले होते. या रूपांच्या प्रवेशाचा INSACOG ने बारकाईने मागोवा घेतला. परिणामी, INSACOG च्या प्रयोगशाळांतील संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण विश्लेषणामुळे कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या उत्परिवर्तनांचा देखील शोध लावता आला.

 

प्र.- भारतात सार्स-को व्ही-2 विषाणूच्या तपासणीसाठी कोणते धोरण आखण्यात आले आहे?

उ.- सुरुवातीला, आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांनी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या समाजातील व्यक्तींनी या विषाणूंचे स्वतःसोबत वहन केले त्यातील RTPCR चाचणीत बाधित आढळलेल्या एकूण प्रवाशांपैकी 3-5% प्रवाशांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण निश्चित करण्यावर भारतातील जनुकीय तपासणी  प्रक्रियेचा भर होता.

त्यानंतर, एप्रिल 2021 मध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना संरक्षणात्मक तपासणी धोरणाची माहिती कळविण्यात आली. या धोरणाअंतर्गत, एखाद्या प्रदेशातील भौगोलिक प्रसाराचे पुरेसे प्रतिनिधित्व करणारी विविध संरक्षणात्मक ठिकाणे निश्चित करून प्रत्येक ठिकाणचे RTPCR चाचणीनंतर निश्चितपणे बाधित असलेले नमुने संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण समजण्यासाठी पाठविले जातात. निश्चित केलेल्या ठिकाणांवरून प्रादेशिक जनुकीय क्रमनिर्धारण  निश्चिती केंद्रांकडे(RGSLs) नियमितपणे नमुने पाठविण्यासाठीची प्रमाणित कार्यान्वयन पद्धती(SOP) राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांना कळविण्यात आली आहे. राज्यांसाठी जोडून देण्यात आलेल्या INSACOG RGSLs ची यादीदेखील राज्यांना कळविण्यात आलेली आहे. संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण निश्चितीसाठीच्या प्रक्रियेमध्ये  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांशी समन्वय साधण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची समर्पित स्वरुपात नेमणूक देखील करण्यात आली आहे.  

  1. संरक्षणात्मक तपासणी (सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी): हे देशभरात सतत सुरु असणारे तपासणी कार्य आहे. प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेश यांच्यात जिथून संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण निश्चितीसाठी नमुने पाठवले जाणार ती संरक्षणात्मक ठिकाणे (RT-PCR तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा आणि तृतीय श्रेणीतील आरोग्य सेवा केंद्रे यांच्यासह)
  2. संसर्गवाढ तपासणी (कोविड-19 बाधित समूह असलेले किंवा रुग्णसंख्येत अचानक वाढ दिसून येणारे जिल्हे यांच्यासाठी): ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ दिसून आली आहे अशा जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक संख्येतील नमुने (राज्य तपासणी अधिकारी /केंद्र तपासणी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या नमुन्यांसाठीच्या धोरणानुसार) गोळा केले जातात आणि RGSLs कडे पाठविले जातात.

 

प्र.- INSACOG प्रयोगशाळांकडे नमुने पाठ्विण्यासाठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धत (SOP) काय आहे?

उ.- INSACOG प्रयोगशाळांकडे नमुने पाठ्विण्यास्ठी प्रमाणित कार्यान्वयन पद्धत आणि जनुकीय क्रमनिर्धारण विश्लेषणावर आधारित पुढील प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. विविध जिल्हे किंवा संरक्षणात्मक ठिकाणांहून प्रादेशिक जनुकीय क्रमनिर्धारण प्रयोगशाळांकडे (RGSLs)पाठविण्यात येणाऱ्या नमुन्यांचा संग्रह आणि वाहतूक यासाठी एकात्मिक रोग तपासणी कार्यक्रमाची यंत्रणा काम करते. विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC), धोकादायक दखलपात्र रूपे आणि उत्परिवर्तन झालेली इतर रूपे यांची ओळख पटविणे आणि जनुकीय क्रमनिर्धारण निश्चित करणे यासाठी RGSLs जबाबदार असतात. विषाणूंची दखलपात्र रूपे  (VoI) आणि चिंताजनक रूपे (VoC) यांच्याबाबतची माहिती एकात्मिक रोग तपासणी कार्यक्रमाच्या(IDSP) केंद्रीय तपासणी विभागाकडे सादर केली जाते जेणेकरून राज्य तपासणी अधिकाऱ्याशी समन्वय साधून या नमुन्यांतील वैद्यकीय-साथ रोग संबंध स्थापित करता येऊ शकेल.
  2. INSACOG ला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शास्त्रीय आणि वैद्यकीय सल्लागार गटाशी(SCAG) चर्चा केल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की सार्वजनिक आरोग्य विषयाशी संबंध असू शकेल अशा जनुकीय उत्परिवर्तनाची निश्चिती झाल्यानंतर RGSL ते SCAG  कडे सादर करेल. विषाणूच्या महत्त्वाच्या आणि धोकादायक रूपांविषयी तसेच इतर उत्परिवर्तनाविषयी SCAG मध्ये चर्चा होईल आणि गरज वाटली तर अधिक तपासणीसाठी ते नमुने केंद्रीय तपासणी विभागाकडे पाठविले जातील.
  3. IDSP ने निश्चित केलेले जनुकीय क्रमनिर्धारण विश्लेषण आणि वैद्यकीय-साथ रोग संबंध यांची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, ICMR, DBT, CSIR आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांना कळविली जाईल, या माहितीच्या आधारे संबंधित विभागांना सार्वजनिक आरोग्य उपाययोजना ठरविणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास मदत होईल.
  4. विषाणूची नवीन उत्परिवर्तित रूपे, चिंताजनक रूपे यांचे प्रयोगशाळेत संवर्धन केले जाते, त्यांचा जनुकीय अभ्यास हाती घेऊन लसीची या रूपांच्या बाबतीत परिणामकारकता आणि या रूपांचे प्रतिकारशक्तीला चकवा देण्याचे गुणधर्म याबाबत अधिक माहिती मिळवता येते.

 

प्र.- विषाणूच्या चिंताजनक रुपांची / उत्परिवर्तन यांची  सध्याची स्थिती काय आहे?

उ.- भारतातील 35 राज्यांमधील 174 जिल्ह्यांमध्ये विषाणूची चिंताजनक रूपे (VOC)आढळली आहेत. सर्वात जास्त VOC महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि गुजरात या राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये सापडली आहेत.भारतातील सामान्य जनतेच्या नमुन्यांमध्ये विषाणूची अल्फा,बीटा,गॅमा आणि डेल्टा ही सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक रूपे आढळून आली आहेत.

विषाणूचे B.1.617 हे उत्परिवर्तन सर्वात प्रथम महाराष्ट्रात सापडले आणि ते राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्गग्रस्तांच्या संख्येत असामान्य प्रमाणात वाढ होण्यास कारणीभूत झाले. आता हे रूप देशाच्या अनेक राज्यांमध्ये सापडले आहे.

 

प्र.- विषाणूचे डेल्टा प्लस हे उत्परिवर्तन काय आहे?

उ.- B.1.617.2.1 (AY.1) किंवा सर्वसामान्यपणे डेल्टा प्लस उत्परिवर्तन म्हणजे डेल्टा रुपामध्ये अतिरिक्त उत्परिवर्तन घडून निर्माण झालेले विषाणूचे आणखी एक रूप आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733399) Visitor Counter : 443