पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केले कोविन जागतिक परिषदेला संबोधित, कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री असल्याचे प्रतिपादन
कोणत्याही आणि सर्व देशांना उपलब्ध होण्यासाठी कोविन मंच ओपन सोर्स : पंतप्रधान
200 दशलक्ष वापरकर्ते असणारे आरोग्यसेतु हे अॅप डेव्हलपर्ससाठी सहजगत्या उपलब्ध : पंतप्रधान
गेल्या शंभर वर्षात अश्या तऱ्हेची महामारी जगाने पाहिलेली नाही आणि अश्या आव्हानाचा सामना शक्तीशाली देशांनाही एकट्याने करता येणे अशक्य होते : पंतप्रधान
आपल्याला एकत्रितपणे काम करायला आणि मार्गक्रमणा करायला हवी : पंतप्रधान
लसीकरण धोरण नियोजनात भारताने केला डिजिटल दृष्टीकोनाचा स्वीकार: पंतप्रधान
लसीकरणाचा सुरक्षित आणि विश्वासपात्र पुरावा लोकांना आपले लसीकरण केव्हा, कोठे व कोणाकडून झाले हे सिद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरेल : पंतप्रधान
लस वापराचा माग काढणे व नासाडी टाळणे हे हेतू डिजिटल दृष्टीकोनातून साध्य होतील: पंतप्रधान
आपण ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या दृष्टीकोनातून मार्गक्रमणा केल्यास माणूसकी नक्कीच महामारीवर मात करेल : पंतप्रधान
Posted On:
05 JUL 2021 3:18PM by PIB Mumbai
कोविन मंच म्हणजे कोविड-19 शी दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री आहे, अश्या शब्दात कोविन मंचाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविन जागतिक परिषदेला संबोधित करताना केले.
पंतप्रधानांनी सुरूवातीला सर्व देशांमधील या महामारीला बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या शंभर वर्षात अश्या तऱ्हेची महामारी जगाने पाहिलेली नाही आणि अश्या तऱ्हेच्या आव्हानाचा सामना शक्तीशाली देशांनाही एकट्याने करता येणे अशक्य होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. माणुसकी आणि माणसाच्या भल्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायला आणि मार्गक्रमणा करायला हवी हा या महामारीने शिकवलेला मोठाच धडा आहे, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. आपल्याला एकमेकांकडून शिकणे तसेच आपल्याला सापडलेली योग्य दिशा दुसऱ्याला दाखवणे भाग आहे असेही त्यांनी सांगितले.
अनुभव, कौशल्य आणि संसाधने यांचे जागतिक पातळीवर सामायिकीकरण करण्याप्रती भारत कटीबद्ध असल्याचे सांगताना मोदी यांनी जागतिक संदर्भातून शिकण्याबाबत भारत पुढे असल्याचेही सांगितले. महामारीशी लढताना तंत्रज्ञानाची मदत महत्वपूर्ण ठरल्याबद्दल विशद करताना पंतप्रधान मोदी यांनी सॉफ्टवेअर हे एक असे क्षेत्र आहे की जेथे संसाधनांची कमतरता नाही असे सांगितले. म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण शक्य झाल्याबरोबर भारताने आपले कोविड ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग म्हणजेच संसर्गाचा माग काढणारे आणि संसर्ग शोधणारे तंत्रज्ञान ओपन सोर्स केल्याचे ते म्हणाले. 200 दशलक्ष वापरकर्ते असणारे आरोग्यसेतु हे अॅप डेव्हलपर्ससाठी सहजगत्या उपलब्ध असल्याचे सांगितले. भारतात वापर होत असल्याने त्याचा वेग आणि दर्जा याबाबतची चाचणी प्रत्यक्षच झाल्याचेही सांगत त्यांनी त्याबाबत जगाला आश्वस्त केले.
लसीकरणाला महत्व देत भारताने नियोजनात पुर्णपणे डिजिटल दृष्टीकोन स्विकारण्याचा निर्णय घेतला असेही ते म्हणाले. त्यामुळे लसीकरण झाल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टीने लोकांची सोय झाली व त्यामुळे कोविडोत्तर ग्लोबल जगात सहजता येईल. हा सुरक्षित, रक्षण करणारा आणि विश्वासपात्र पुरावा वापरून लोकांना आपले लसीकरण केन्हा कसे आणि कोणाकडून झाले हे खात्रीशीरपणे सांगता येईल. लसींच्या वापराचा माग आणि कमीत कमी नुकसान यासाठी डिजिटल दृष्टीकोन मदत करतो असेही ते म्हणाले.
संपूर्ण जग एक असल्याच्या भारतीय तत्वज्ञानाला अनुसरुन कोविन मंच ओपन सोर्स ठेवला आहे आणि लवकरच ते कोणत्याही तसेच सर्व देशांमध्ये उपलब्ध होईल असेही ते म्हणाले.
आजची परिषद ही, या मंचाची जागतीक व्यासपीठावरून ओळख करून देण्यासाठीचे पहिले पाऊल आहे असे आग्रही प्रतिपादन करताना पंतप्रधान मोदी यांनी कोविनमार्फत काही दिवसांपूर्वीच एका दिवसात 9 दशलक्ष लोकांना व याप्रकारे आतापर्यंत 350 दशलक्ष लसीकरण मात्रा दिल्या गेल्याचे सांगितले. याशिवाय लसीकरणाचा पुरावा म्हणून कोणताही नाशिवंत कागद जवळ बाळगण्याची गरज नाही तर तो डिजिटल प्रकारे तयार होतो असे सांगितले. कोविनसाठी इच्छुक असणाऱ्या देशांना आवश्यक असणारे बदल कोविनमध्ये करता येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आपण ‘एक पृथ्वी एक आरोग्य’ या दृष्टीकोनातून मार्गक्रमणा केल्यास माणूसकी नक्कीच महामारीवर मात करेल असे त्यांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले.
***
Jaydevi PS/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732851)
Visitor Counter : 480
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam