उपराष्ट्रपती कार्यालय

आपण आपल्या भाषांचे जतन केले तरच संस्कृती आणि परंपरांचे रक्षण होऊ शकेल: उपराष्ट्रपती


“भाषा संस्कृतीला अधिक समृद्ध करते आणि संस्कृती समाजाला”

धोकादायक स्थितीत असलेल्या भारतीय भाषांबाबत उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता, या भाषा जतन करण्यासाठी ठोस कृती आणि एकत्रित प्रयत्नांची व्यक्त केली गरज

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्यायला हवे; प्रशासन आणि न्यायालयीन व्यवहारात स्थानिक भाषा माध्यम म्हणून वापरायला हवी- उपराष्ट्रपती

निसर्गसंवर्धन भारताच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक: उपराष्ट्रपती

सिंगापूरच्या श्री सांस्कृतिक कलासारधी च्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात, उपराष्ट्रपती नायडू यांचे संबोधन

Posted On: 03 JUL 2021 4:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जुलै 2021

एखाद्या भाषेची धोकादायक स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी, आपल्या संस्कृतीचे रक्षण करायचे असेल, तर आपल्या भाषांचे जतन करायला हवे यावर, भर दिला. भाषा कोणत्याही संस्कृतीची जीवनवाहिनी असते, भाषा संस्कृतीला बळकट करते, आणि संस्कृती समाजाला. असे उद्गार उपराष्ट्रपतींनी काढले.

दर दोन आठवड्यात, जगातील एक भाषा अस्तंगत होत असते, या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाचा हवाला देत, उपराष्ट्रपती म्हणाले की, सध्या 196 भारतीय भाषा सध्या धोकादायक स्थितीत आहेत. ही स्थिती बदलून, या भाषा जतन करण्यासाठी ठोस कृती आणि एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असे सांगत, सगळे भारतीय एकत्र होऊन आपल्या भाषांचे जतन करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सिंगापूर येथील सांस्कृतिक संघटना, श्री सांस्कृतिक कलासारधीने आयोजित केलेल्या, ‘आंतरजातीय सांस्कृतिक संमेलन-2021’ या वर्धापन दिन कार्यक्रमाला उपराष्ट्रपतींनी आभासी स्वरूपात संबोधित केले.

अनिवासी, परदेशस्थ भारतीय आपल्या संस्कृतीचे दूत आहेत, असे सांगत, भारतीय मूल्ये आणि परंपरा जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. आपली प्राचीन मूल्ये जगभर घेऊन जाण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

आपल्या भाषा जतन करण्यावर विशेष भर देत, नायडू म्हणाले की प्राथमिक आणि माध्यमिक स्तरापर्यंत तरी, आपण मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे. आपल्या तंत्रशिक्षणातही, हळूहळू भाषेचा वापर वाढवावा, असा सल्ला त्यांनी दिला. प्रशासन आणि न्यायाललीन कामकाजातही त्या प्रदेशातील स्थानिक भाषेचाच वापर करावा, अशी सूचना त्यांनी केली. प्रत्येकाला आपल्या भाषेचा अभिमान असावा, आणि आपण मातृभाषेतच, आपल्या कुटुंब आणि समुदायाशी संवाद साधायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

युनेस्कोनुसार, संस्कृतीची व्याख्या, म्हणजे केवळ कला आणि साहित्य नाही, तर आपली जीवनशैली, एकत्र जगण्याची पद्धत, मूल्यव्यवस्था आणि परंपरा याही संस्कृतीचाच भाग असतात. भारतीय संस्कृतीचा जागतिक मानवतावादी आणि निसर्गाविषयीचा दृष्टीकोन एकमेवाद्वितीय आहे, असे नायडू म्हणाले. निसर्गसंवर्धन हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. आपल्या परंपरांमध्ये वृक्ष, नद्या, वन्यजीव आणि पशुंची पूजा सांगितली आहे. तसेच, भारतीय मूल्ये संपूर्ण विश्वाला एकच कुटुंब मानतात. ‘एकमेकांसोबत जागा आणि एकमेकांची काळजी घ्या’ असा संदेश देणारे आपले भारतीय तत्वज्ञान आपण कधीही विसरता कामा नये, असे नायडू म्हणाले.

कोविड-19 मुळे लोकांमधील मानसिक ताणतणाव वाढले आहेत, अशावेळी आध्यात्मिक उपायांनी ते कमी करता येऊ शकेल, असे उपराष्ट्रपती म्हणाले. समाजातील हा ताणतणाव कमी करण्यासाठी धर्म आणि अध्यात्मिक गुरुंनी लोकांपर्यंत पोचायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारत हे अनेक भाषा आणि संस्कृतींचे घर आहे, असे नमूद करत, नायडू यांनी आपल्या विविधतेतील एकता या संस्कृतीवर भर दिला. या संस्कृतीनेच आपल्याला घट्ट बांधून ठेवले आहे, असे ते म्हणाले. भाषेतील विविधता या महान संस्कृतीचा पाया असून, आपली सांस्कृतिक मूल्ये आपण आपल्या भाषा, संगीत, कला, क्रीडा आणि उत्सव यातूनच व्यक्त करत असतो. राजकीय सीमा बदलू शकतात, मात्र आपल्या मातृभाषा आणि आपली मुळे कधीही बदलत नाहीत.  असे सांगत, म्हणूनच आपण भाषा जतन केल्या पाहिजेत असे नायडू म्हणाले.

आपण आपल्या भाषा आणि परंपरांचे जतन करणे तर महत्वाचे आहेच, शिवाय, इतर भाषा आणि संस्कृतींचा सन्मान ठेवणेही तेवढेच महत्वाचे आहे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.

 

S.Tupe/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732502) Visitor Counter : 574