उपराष्ट्रपती कार्यालय

दहशतवाद्यांची भयावह कटकारस्थाने उधळून लावण्यासाठी बुद्धिमत्ता उपाय शोधण्याचे उपराष्ट्रपतींचे संशोधक समुदाय आणि आयआयटींना आवाहन

कमी उंचीवरून उडणाऱ्या ड्रोनच्या वापराचा संदर्भ देत दहशतवादाच्या विरोधासाठी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा आयआयटींना उपराष्ट्रपतींचा सल्ला

आयआयटी मद्रास येथे भारतातील पहिल्या थ्रीडी प्रिंटेड हाऊस केंद्राला उपराष्ट्रपतींनी दिली भेट

Posted On: 30 JUN 2021 3:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2021

 

देशाच्या हिताला बाधा पोहोचविणारी दहशतवाद्यांची भयावह कटकारस्थाने उधळून लावण्यासाठी, बुद्धिमत्ता उपाय शोधण्याचे आवाहन भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी आज संशोधन समुदाय आणि आयआयटी सारख्या संस्थांना केले.

आयआयटी मद्रास येथे भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट हाऊस केंद्राला भेट दिल्यानंतर उपराष्ट्रपती बोलत होते. दहशतवाद हा मानवजातीचा शत्रू असल्याचे नमूद करत  दहशतवाद्यांकडून वापरण्यात येणाऱ्या कमी उंचीवरून उडणाऱ्या आणि लष्कराच्या रडारला न सापडणाऱ्या ड्रोनचा त्यांनी संदर्भ दिला.

आयआयटीसारख्या संस्थांनी दहशतवादाच्या विरोधासाठी या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा आणि दहशतवादाचा प्रतिकार करण्यासाठी उपाय शोधण्याचा सल्ला त्यांनी दिला.

तत्पूर्वी, नायडू यांनी आयआयटी मद्रास आणि त्वास्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्स या स्टार्ट अपच्या संयुक्त सहकार्याने - भारताच्या पहिल्या थ्रीडी प्रिंट हाऊसच्या प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी या प्रकल्पाच्या चमूची प्रशंसा केला.

तंत्रज्ञानाच्या विकासात्मक प्रगतीवर जोर देत, उपराष्ट्रपतींनी उदयोन्मुख तंत्रज्ञान वाढविण्यासाठी आणि व्यावसायिक व्यवहार्यता साध्य करण्यासाठी ‘उद्योग-संस्था’ भागीदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

नायडू म्हणाले की, थ्रीडी प्रिंटिंग आणि रोबोटिक्स सारख्या स्मार्ट तंत्रज्ञानाचा मेळ असलेला हा प्रकल्प चौथ्या औद्योगिक क्रांतीचे संभाव्य फायदे दर्शवितो यात पारंपरिक उत्पादन पद्धती बदलण्याची क्षमता आहे.

उच्च शिक्षणाविषयी बोलताना, नायडू यांनी सल्ला दिला की, उच्च शिक्षण संस्थानी वर्ग कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टीने समग्र दृष्टीकोन ठेवून विद्यार्थ्यांना जगातील वास्तविक आव्हानांवर मात करण्यासाठी तयार करावे.

राष्ट्रीय प्राधान्यक्रम आणि स्थानिक प्रासंगिकता लक्षात घेऊन आयआयटींनी आपल्या देशात तांत्रिक हस्तक्षेपासाठी लक्ष केंद्रित केलेली क्षेत्र निश्चित करण्याच्याच गरजेवर नायडू यांनी भर दिला.

उपराष्ट्रपतींनी नवोन्मेषला प्रोत्साहन दिल्याबद्दल आणि अत्याधुनिक संशोधन केंद्राद्वारे व्हायब्रंट स्टार्टअप व्यवस्थेच्या संवर्धनाबद्दल आयआयटी मद्रासचे कौतुकही केले. त्यांनी त्वास्ता मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन्सच्या चमूचीही प्रशंसा केली. तामिळनाडूचे महसूल मंत्री, एस. रामचंद्रन, आयआयटी मद्रासचे संचालक डॉ. भास्कर राममूर्ती, अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख, तसेच त्वास्ता  मॅन्युफॅक्चरिंग सोल्यूशन्सचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 

* * *

S.Tupe/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1731446) Visitor Counter : 67