सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि तस्करीविरोधी दिनाचे औचित्य साधत, नशा मुक्त भारत अभियानासाठीच्या विशेष संकेतस्थळाचे  थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते उद्घाटन


कोणत्याही परिस्थितीत अमली पदार्थ तस्करी आणि विक्रीसारखे गैरप्रकार समूळ नष्ट करण्यासाठी भारत कटिबद्ध : थावरचंद गेहलोत

Posted On: 26 JUN 2021 8:41PM by PIB Mumbai

 

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री, थावरचंद गेहलोत, यांच्या हस्ते आज, नशामुक्त भारत अभियानासाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तसेच तस्करीविरोधी दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री कृष्णन पाल गुजर, रामदास आठवले आणि रतनलाल कटारिया सहभागी झाले होते. जगाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठीचे प्रयत्न अधिक बळकट करण्यासाठी आणि हे उद्दिष्ट साध्य  करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी जगभरात हा दिवस दिवस पाळला जातो. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, अंमली पदार्थांचा वापर कमी करण्यासाठीची नोडल संस्था म्हणून कार्यरत असून, त्यासाठी मंत्रालयातर्फे विविध उपक्रम राबवले जातात.

 

यंदा, आंतरराष्ट्रीय अंमलीपदार्थ तसेच तस्करीविरोधी दिनाचे औचित्य साधत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सहा दिवसीय नशामुक्त भारत शिखर परिषद आयोजित केली होती. आज या परिषदेच्या समारोपप्रसंगी या अभियानासाठी मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचे ई-उद्घाटन करण्यात आले.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय सर्वसमावेशक सर्वेक्षणानुसार, भारतात, आज 6 कोटींपेक्षा अधिक लोक या अमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात सापडले असून, त्यामध्ये 10-17 वर्षे या वयोगटातील मुलांची संख्या अधिक आहे, असे गेहलोत यांनी यावेळी सांगितले. नशामुक्त भारत अभियानाची नोडल संस्था या नात्याने,अंमलीपदार्थांचा वापर आणि दुष्परिणाम याविषयी जनजागृती करण्यासाठी मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. देशभरात, यासाठी काम करणाऱ्या 500 पेक्षा अधिक सामाजिक संस्थांना मंत्रालयाने NAPDDR योजनेअंतर्गत अर्थसहाय्य केले आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, या घातक व्यसनांपासून मुक्त होण्याचे उद्दिष्ट केवळ लोकसहभागाद्वारेच साध्य होऊ शकते, असे सांगत, सर्वसामान्य नागरिकांनीही नशामुक्त भारत अभियानाचा भाग व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्याने अनेक आयुष्ये उध्वस्त झालीत, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. त्यामुळेच या व्यसनाचे भीषण दुष्परिणाम लोकांसमोर आणणे अत्यंत आवश्यक असून, अंमली पदार्थांची तस्करी आपण पूर्णपणे थांबवायला हवी, असे आठवले यावेळी म्हणाले. नशामुक्त भारताचे उद्दिष्ट आपण साध्य करायलाच हवे, असे सांगत, यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय अत्यंत गांभीर्याने काम करत आहे, असेही आठवले यांनी सांगितले.

रतन लाल कटारिया, यांनी यावेळी बोलतांना, आपण, अंमली पदार्थमुक्त समाज निर्माण करण्याची शपथ घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले, तर नशा मुक्त भारत अभियानाचा उद्देश केवळ अंमली पदार्थांचे सेवन बंद करणे हाच नाही, तर या व्यसनात अडकलेल्यांचे पुनर्वसन करणे हाही आहे, असे कृष्ण पाल गुजर यांनी सांगितले. आम्ही हे उद्दिष्ट अत्यंत ध्येयनिष्ठेने साध्य करण्यासाठी वाटचाल करत आहोत, असे ते म्हणाले.

नशामुक्त भारत अभियानाच्या संकेतस्थळाचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. या संकेतस्थळावर या अभियानाची आणि त्या अंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अमली पदार्थांची मागणी कमी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या संस्थाची माहितीही संकेतस्थळावर आहे. तसेच यावेळी गेहलोत यांच्या हस्ते, नशामुक्त भारत परिषदेच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या पत्रिकेत, परिषदेत आठवडाभर घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती आहे. तसेच, नशा मुक्त भारत अभियानाच्या प्रचारासाठी तयार आकारण्यात आलेल्या विशेष लघुपटाचे प्रकाशनही यावेळी झाले.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1730585) Visitor Counter : 557