रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने वलसाड येथील समर्पित मालवाहू मार्गिकेवरील उड्डाणपूल अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत केला पूर्ण
मुंबई दिल्ली या प्रचंड वाहतूक असलेल्या महामार्गावर वलसाड शहरात गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन करत पूल बांधणे हे सर्वात मोठे आव्हान
Posted On:
22 JUN 2021 4:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2021
भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील सार्वजनिक कंपनी, डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (DFCCIL) ने पश्चिम समर्पित मालवाहू मार्गिकेवर गुजरातमधील वलसाड रोड येथील उड्डाणपुलाच्या तोडणी आणि पुनर्बांधणीचे काम अवघ्या 20 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.
गुजरात राज्याच्या विविध संस्था आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय साधत, मुंबई-दिल्ली या प्रचंड वाहतुकीच्या महामार्गावरील हा उड्डाण पूल, 20 दिवसांचे वाहतूक व्यवस्थापन करत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला. 2 जून पासून या मार्गावर ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला होता.
पार्श्वभूमी :
पश्चिम समर्पित मार्गिकेवरील, वैतरणा-सचिन भागात, वलसाड गावात जाण्यासाठीच्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असे. मात्र या भागातल्या अनेक मर्यादा आणि रेल्वेरूळ टाकण्याच्या कामामुळे इथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु करणे आव्हानात्मक होते. या मार्गिकेवर, अत्याधुनिक पद्धतीने नवे रूळ टाकण्याचे काम सुरु असून उड्डाण पुलाच्या कामामुळे हे काम बाधित होण्याची शक्यता होती.
तोडगा :
या समस्यांवर तोडगा शोधून प्रकल्प पूर्ण करण्याचे काम या चमूने स्वीकारले. समस्या निवारणासाठी अनेक बैठकांमधून चर्चा-सल्लामसलत झाल्यावर एक अभिनव तोडगा शोधून काढण्यात आला. या उड्डाणपुलाच्या मुखाशी आधीच तयार केलेले 16 बाय 10 मीटर आकाराचे प्रीकास्ट बॉक्स लावण्यात आले. त्यातही वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गजबजलेल्या अशा या रस्त्यावरची वाहतूक थांबवून हे काम करणे सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे, हे पूर्ण काम केवळ 20 दिवसात संपवण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले, आणि त्याची अंमलबजावणी देखील करण्यात आली.
या मोठ्या भागाचे प्री कास्टिंग करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली होती. लॉकडाऊन आणि कोविडचे निर्बंध असतांनाही वरिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखालील 150 जणांच्या चमूने, अहोरात्र काम करून कास्टिंगचे काम वेळेत पूर्ण केले. या काळात वलसाडच्या जिल्हा प्रशासनाने वाहतूक ब्लॉक घेण्यास मदत केली.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729408)
Visitor Counter : 213