ऊर्जा मंत्रालय
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर के सिंग यांनी हवामान बदलाच्या संदर्भात ऊर्जा संक्रमण आणि ऊर्जा कार्यक्षमता उपायांचा घेतला आढावा
Posted On:
17 JUN 2021 9:18AM by PIB Mumbai
केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि अक्षय ऊर्जा विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आर के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत, देशातील विविध ऊर्जा कार्यक्षमता कार्यक्रम आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हाती घेण्यात आलेले विविध उपक्रम तसेच उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही बैठक झाली.
या उच्चस्तरीय बैठकीचा उद्देश, देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व क्षेत्रांमधील ऊर्जा क्षमतेशी निगडीत कार्यांचा आढावा घेणे हा होता. त्यातही, कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर विशेष भर देण्यात आला होता.
वाहतूक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच ऊर्जाप्रकल्पांसारख्या उच्च उत्सर्जन करणाऱ्या क्षेत्रांकडे विशेष लक्ष दिले जावे, असे निर्देश, सिंग यांनी यावेळी दिली. ‘रोशनी’ (ROSHANEE) या ऊर्जा मंत्रालयाच्या अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांविषयीही या बैठकीत चर्चा झाली. या अभियानाअंतर्गत, देशभरात ऊर्जा संवर्धनविषयक उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे.
देशातील सर्व उर्जा कार्यक्षमता अभियानांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जावी, असे निर्देश सिंग यांनी या बैठकीत दिले. तसेच, ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता विभागाची संस्थात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. ऊर्जा कार्यक्षमतेच्या प्रयत्नांची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यांतील उर्जाक्षेत्रातील यंत्रणाही अधिक कार्यक्षम आणि सुदृढ करण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.
त्याशिवाय, खालील कार्यवाही करण्यावर सिंग यांनी या बैठकीत भर दिला:
• अर्थव्यवस्थेचे प्रागतिक विद्युतीकरण: यासाठीची संभाव्य क्षेत्रे निश्चित करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा विकसित केला जाईल.;
• हरित विद्युतीकरण – यासाठी अक्षय ऊर्जानिर्मितीला प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे.
• ऊर्जा कार्यक्षमता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याविषयीच्या तंत्रज्ञानाबाबत आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित मंत्रालयांच्या सदस्यांचा एक गट/समिती स्थापन करणे;
• ऊर्जा कार्यक्षमता विभागाची संघटनात्मक संरचना अधिक दृढ करणे.
या उच्चस्तरीय बैठकीत, ऊर्जा, पर्यावरण आणि हवामान बदल, अक्षय आणि नवीनतम ऊर्जा, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार, परराष्ट्र , कोळसा, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, व्यय विभाग, अवजड उद्योगाचे अधिकारी, नीती आयोगासह विविध सरकारी संस्थांचे अधिक उपस्थित होते.
ऊर्जा कार्यक्षमता विभागाच्या महासंचालकांनी यावेळी हवामान बदल आणि भारताच्या राष्ट्रीय विकास परिषदेची उद्दिष्टे तसेच रोशनी अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमांविषयी सादरीकरण केले. *
***
Jaidevi PS/RA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727861)
Visitor Counter : 204