आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड लसीसंदर्भातील गैरसमज आणि वस्तुस्थिती
Posted On:
16 JUN 2021 2:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 जून 2021
कोवॅक्सिन लस तयार करताना वापरलेल्या संयुगाबाबत काही समाज माध्यमांवर पोस्ट्स आहेत, जिथे असे सूचित केले गेले आहे की कोवॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश (सिरम) समाविष्ट आहे.
या पोस्टमध्ये तथ्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले आहे आणि दिशाभूल करण्यात आली आहे.
नवजात वासराच्या रक्तातील अंश केवळ व्हेरो पेशी तयार करण्यासाठी / वाढीसाठी वापरला जातो. विविध प्रकारचे बोवाइन आणि अन्य प्राण्यांमधील रक्ताचे अंश हे व्हेरो पेशींच्या वाढीसाठी मानक संवर्धक घटक मानले जातात. व्हेरो पेशींचा उपयोग पेशींचे जीवन स्थिरावण्यासाठी केला जातो, ज्याची लस तयार करण्यात मदत होत असते. हे तंत्रज्ञान दशकांपासून पोलिओ, रेबिज आणि एन्फ्लूएन्झा लसींमध्ये वापरण्यात आले आहे.
नवजात वासराच्या रक्तातील अंश व्हेरो पेशींमध्ये वापरल्यानंतर तो त्यातून काढून टाकण्यासाठी व्हेरो पेशींच्या वाढीनंतर, त्या पेशी पाण्याने, रसायनांचा वापर करून धुतल्या जातात (त्यांना तांत्रिकदृष्ट्या बफर म्हणूनही ओळखले जाते). त्यानंतर, विषाणू वाढीसाठी या व्हेरो पेशींना कोरोना विषाणूची लागण केली जाते.
विषाणू वाढीच्या प्रक्रियेमध्ये व्हेरो पेशी पूर्णतः नष्ट केल्या जातात. त्यानंतर हा वाढलेला विषाणू नष्ट (निष्क्रिय) केला जातो आणि त्याचे शुद्धीकरण देखील केले जाते. त्यानंतर हा निष्क्रिय केलेला विषाणू अंतिम लस तयार करण्यासाठी वापरला जातो, आणि लसीच्या अंतिम घडणीत वासराच्या द्रवाचा वापर केला जात नाही.
म्हणूनच, अंतिम लसीमध्ये (कोवॅक्सिन) नवजात वासराच्या रक्तातील अंश (सिरम) मुळीच नसतो आणि वासराच्या रक्तातील अंश हा लसीच्या अंतिम उत्पादनाचा घटकही नसतो.
* * *
Jaydevi PS/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1727502)
Visitor Counter : 287