रेल्वे मंत्रालय
भारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वे मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज असणे आवश्यक - पीयूष गोयल
पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या मान्सूनसाठीच्या तयारीचा घेतला आढावा
Posted On:
10 JUN 2021 9:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जून 2021
रेल्वे तसेच वाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, भारतातील आणि विशेषत: मुंबईतील रेल्वे मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज असणे आवश्यक आहे. पावसाळ्याच्या हंगामासाठीच्या सर्व आपत्कालीन उपाययोजनांबाबत मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सज्जतेचा आणि रणनीतीचा आढावा घेताना ते बोलत होते.
असुरक्षित भागांची सद्यस्थिती आणि गाड्यांच्या सुरळीत कार्यान्वयनासाठीच्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला.
श्री गोयल म्हणाले की, पावसाळा सुरू होताच मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे वचनबद्ध आहे.
उपनगरीय रेल्वेच्या सज्जतेचा आढावा घेताना, पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी रेल्वेच्या तांत्रिक आणि नागरी कामांच्या उपक्रमांच्या कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईसारख्या संस्थांशी भागीदारी करण्याचा सल्ला त्यांनी रेल्वेला दिला.
ते म्हणाले की, रेल्वे सेवा सुरळीत आणि अखंडितपणे सुरू राहील हे सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेषी उपक्रम आणि परिश्रम एकत्र केले गेले पाहिजेत.
याची दखल घ्यावी लागेल की, कोविड महामारीच्या दरम्यानही, मुंबईत खास सुधारित रेल्वे डब्यांसह 3 कचरा साफ करणाऱ्या 'मक स्पेशल' गाड्या तैनात करून उपनगरी विभागातील 2,10,000 घन मीटर क्षेत्रातील घाण / कचरा / जमिनीच्या साफसफाईसाठी रेल्वेने मोठी कसरत केली आहे.
गेल्या पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवलेली ठिकाणे शोधण्यात आली आणि प्रत्येक ठिकाणांसाठी अनुकूल उपाययोजना तयार करण्यात आल्या. उदा. वांद्रे, अंधेरी, माहीम, ग्रँट रोड, गोरेगाव.
पावसाची प्रत्यक्ष वेळेची आणि अचूक माहिती मिळावी या दृष्टीने स्वयंचलित पाऊस परिमाण (एआरजी) भारतीय हवामान विभागाच्या सहकार्याने चार ठिकाणी तर पश्चिम रेल्वेद्वारे स्वतंत्रपणे दहा ठिकाणी स्थापित केले आहेत.
सांडपाणी आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी पाण्याच्या आतील पंपांसह रेल्वेमार्ग आणि डेपोवर पुरविण्यात आलेल्या पंपांची संख्या 33% वाढली आहे.
बोरीवली विरार विभागातील नाल्याच्या साफसफाईची पाहणी आणि देखरेखीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता आणि नाल्याची खोलवर साफसफाई करण्यासाठी शोषयंत्रे / गाळ काढणारी यंत्रे वापरण्यात आली.
कमीत कमी पाणी साचेल या दृष्टीने, नाला बांधताना नवीन मायक्रो टनेलिंग पद्धतीचा अवलंब केला गेला.
या बैठकीला रेल्वे मंडळ आणि मुंबईचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726095)
Visitor Counter : 153