नौवहन मंत्रालय

नाविकांच्या लसीकरणाला सरकार प्राधान्य देणार


लसीकरणासाठी नाविकांचा समावेश प्राधान्य सूचीमध्ये करणाऱ्या राज्यांचे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आभार मानले

Posted On: 05 JUN 2021 4:43PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, नौवहन  व जलमार्ग राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि रसायने व खते  राज्यमंत्री मनसुख  मांडविया यांनी नाविकांच्या लसीकरणाचा  आढावा घेतला. लसीकरणाअभावी नाविक क्षेत्र बाधित होता कामा नये, असे सांगून जहाजावर आपल्या निर्धारित कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी नाविकांचे लसीकरण होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करायला हवे, यावर  मांडविया यांनी भर दिला.

जागतिक  नाविक क्षेत्रात  भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नाविकांच्या कामाचे स्वरूप पाहतालसीकरण मोहिमेत त्यांना  'प्राधान्य' देण्याची मागणी बर्‍याच क्षेत्रातून   केली जात आहे. लसीकरणासाठी नाविकांना  प्राधान्य देण्यासाठी बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने  आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी  समन्वय साधला.

मंत्रालयाच्या अलीकडील हस्तक्षेपामुळे प्रमुख  बंदरांनी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट, कोचीन पोर्ट ट्रस्ट, चेन्नई पोर्ट ट्रस्ट, विशाखापट्टणम पोर्ट ट्रस्ट, कोलकाता पोर्ट ट्रस्ट आणि तूतीकोरिन पोर्ट ट्रस्ट या सहा प्रमुख बंदरांनी आपल्या बंदर रुग्णालयात नाविकांचे लसीकरण सुरू केले  आहे. शिवाय, केरळमध्ये एका   खाजगी रुग्णालयातही नाविकांच्या  लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.

मेरीटाईम असोसिएशन ऑफ शिपओनर्स शिपमॅनेजर्स अँड एजंट्स (MASSA) , फॉरिन ओनर्स रिप्रेझेंटेटिव्हज अँड शिप मॅनेजर्स असोसिएशन( FOSMA ) आणि नॅशनल युनिअन ऑफ सीफेअरर्स ऑफ इंडिया (NUSI ) सारख्या नाविक संघटनांनी लसीकरणासाठी यशस्वीरित्या विशेष शिबिरे आयोजित केली आहेत.

याखेरीज मंत्रालय राज्य सरकारांनी त्यांच्या प्राधान्य सूचीमध्ये नाविकांना समाविष्ट करावे  यासाठी प्रयत्न करत आहे. केरळ, तामिळनाडू आणि गोवा यांनी यापूर्वीच  असा समावेश केला आहे.

खलाशांना  लसीकरणाची सुविधा पुरवण्यात भारत सरकार  कोणतीही कसर ठेवणार नाही.

***

S.Patil/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1724759) Visitor Counter : 180