रसायन आणि खते मंत्रालय
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरील विक्रीतून मिळणाऱ्या व्यापारी नफ्यावर सरकारने घातली मर्यादा
70% पर्यंत व्यापारी नफा कमवायला परवानगी
एनपीपीए एका आठवड्यात कॉन्सन्ट्रेटर्सच्या सुधारित कमाल किरकोळ किमतीबाबत माहिती देईल
Posted On:
04 JUN 2021 2:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2021
कोविड-19 महामारीमुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स च्या एमआरपी अर्थात कमाल किरकोळ किमतीमध्ये नजीकच्या काळात जी अस्थिरता दिसून आली ती लक्षात घेऊन केंद्र सरकारने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स च्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मिळविलेल्या माहितीनुसार सध्या या साधनांच्या विक्री व्यवहारात वितरक 198% पर्यंत नफा कमावित असल्याचे निदर्शनास आले आहे.
औषध मूल्य नियंत्रण आदेश 2013 च्या 19 व्या परिच्छेदानुसार मिळालेल्या विशेष क्षमतांचा व्यापक जनहितासाठी उपयोग करून घेत एनपीपीए अर्थात राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स च्या विक्री व्यवहारात वितरकांनी कॉन्सन्ट्रेटर्सच्या किमतीवर जास्तीतजास्त 70% पर्यंत व्यापारी नफा मिळविण्याची मर्यादा घालून दिली आहे. यापूर्वी, कर्करोगावरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किंमतीवर मर्यादा घालण्यात एनपीपीएने यश मिळविले होते. सूचित केलेल्या व्यापारी नफ्याच्या मर्यादेनुसार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे उत्पादक तसेच आयातदार यांनी या साधनांच्या सुधारित किंमती येत्या तीन दिवसांत कळवाव्यात असे आदेश एनपीपीएने दिले आहेत. त्यानंतर एका आठवड्याच्या कालावधीत एनपीपीए या सुधारित कमाल किरकोळ किंमतीची माहिती सार्वजनिक मंचाद्वारे जनतेला देणार आहे.
या साधनांच्या उत्पादकांनी जाहीर केलेल्या किंमतीची यादी प्रत्येक किरकोळ दुकानदार, विक्रेता, रुग्णालय आणि संस्था यांनी त्यांच्या व्यावसयिक परिसरात सुस्पष्टपणे दिसून येईल अशा प्रकारे लावावी जेणेकरून या संदर्भात माहिती हवी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती सहजतेने उपलब्ध होईल. व्यापारी नफ्यावरील सरकारी निर्बंध न जुमानता सुधारित कमाल किरकोळ किंमती लागू न करणाऱ्या उत्पादक कंपन्या तसेच आयातदारांना अत्यावश्यक वस्तु कायदा 1955 तसेच औषध मूल्य नियंत्रण आदेश 2013 मधील तरतुदींनुसार त्यांनी आकारलेली अतिरिक्त शुल्काची रक्कम, त्यावरील 15% व्याज आणि 100% पर्यंत दंड भरावा लागेल. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची काळ्या बाजारातील विक्री रोखण्यासाठी कोणताही उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेता कोणत्याही ग्राहकाला सुधारित कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जास्त दराने या साधनांची विक्री करत नाही हे सुनिश्चित करण्यासाठी या आदेशाच्या कडक अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी राज्य औषध नियंत्रकांवर सोपविण्यात आली आहे.
हे आदेश 30 नोव्हेंबर2021पासून लागू होणार असून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल.
देशात कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे कोविड बाधितांच्या संख्येत झालेल्या तीव्र वाढीमुळे वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. महामारीच्या काळात गरजूंना ऑक्सिजन तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा अखंडित पुरवठा होईल हे सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स हे किमतींवर सरकारी नियंत्रण नसलेल्या औषधांच्या प्रकारातील साधन आहे आणि ते सध्या सीडीएससीओ अर्थात केंद्रीय औषध प्रमाणन संघटनेच्या ऐच्छिक परवाना चौकटीमध्ये समाविष्ट आहे. सध्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या किंमतीचे औषध मूल्य नियंत्रण आदेश 2013 मधील तरतुदींनुसार परीक्षण केले जात आहे.
* * *
Jaydevi PS/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724385)
Visitor Counter : 223