ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत, मे महिन्यात 55 कोटी आणि जून महिन्यात 2.6 कोटी लाभार्थ्याना मोफत अन्नधान्याचे वाटप – श्री पांडेय
Posted On:
03 JUN 2021 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
केंद्रीय अन्नधान्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव, सुधांशू पांडेय यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना- भाग तीन आणि ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेच्या प्रगतीविषयी माहिती दिली.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंमलबजावणीविषयी बोलतांना ते म्हणाले की आतापर्यंत, या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत, 63.67 लाख मेट्रिक टन (मे आणि जून महिन्यासाठी नियोजित एकूण अन्नधान्यापैकी 80% टक्के) अन्नधान्याची उचल राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी अन्न आणि सार्वजनिक विभागाकडून केली आहे. 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी सुमारे 28 लाख मेट्रिक टन अन्नधान्य अन्न सुरक्षा योजनेच्या 55 कोटी लाभार्थ्यांना मे 2021 मध्ये वितरीत केले आहे. तसेच राज्यांनी सुमारे 1.3 लाख मेट्रिक टन अन्नधान्य जून महिन्यात याच योजनेच्या सुमारे 2.6 कोटी लाभार्थ्यांना वितरीत केले आहे . कोविड नियमांचे पूर्ण पालन करत ही वितरण प्रक्रिया झाली, असेही त्यांनी सांगितले.
त्याशिवाय, आज म्हणजे तीन जून 2021 पर्यंत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत, अनुक्रमे 90% आणि 12 % लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्यासाठीचे अन्नधान्य वितरीत करण्यात आले आहे. यासाठी, अन्न अनुदानस्वरूपात मे आणि जून महिन्यात 13,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंमलबजावणीसाठी, आतापर्यंत मे आणि जून महिन्यात, 9,200 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग सातत्याने या योजनेचा आढावा घेत असून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे या योजनेची विविध माध्यमांद्वारे अधिकाधिक प्रसिद्धी करण्याबाबत पाठपुरावाही करत आहे, अशी माहिती पांडेय यांनी यावेळी दिली.
M.Chopade/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724220)
Visitor Counter : 188