वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या पन्नास हजारांवर पोहोचली
केवळ 180 दिवसात 10,000 स्टार्टअप्सचा समावेश
623 जिल्ह्यात मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची व्याप्ती
2020-2021 मध्ये मान्यताप्राप्त स्टार्टअप्सद्वारे सुमारे 1.7 लाख रोजगारनिर्मिती
स्टार्टअप इंडिया - नवीन उंची गाठत, नवोन्मेषात भारताला जागतिक स्तरावर बनवत आहे अग्रणी
Posted On:
03 JUN 2021 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
स्टार्ट अप इंडिया हा भारत सरकारचा एक पथदर्शी उपक्रम असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारी, 2016 रोजी या उपक्रमाचा प्रारंभ केला. स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि भारतामध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलता यासाठी एक सक्षम आणि सर्वसमावेशक व्यवस्था तयार करण्याबाबतचा हा उपक्रम आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी) स्टार्टअप उपक्रमासाठी नोडल विभाग म्हणून काम करतो.
3 जून 2021 पर्यंत, डीपीआयआयटीकडून स्टार्टअप म्हणून 50,000 स्टार्टअप्सना मान्यता प्राप्त झाली, त्यापैकी 1 एप्रिल 2020 पासून 19,896 स्टार्टअप्सना मान्यता मिळाली.
स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू झाल्यानंतर आता 623 जिल्ह्यात मान्यता प्राप्त स्टार्टअप्सची व्याप्ती आहे. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात किमान एक स्टार्टअप आहे. स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी विशिष्ट स्टार्टअप धोरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये सर्वाधिक स्टार्टअप्स आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, या उपक्रमाच्या सुरूवातीला पहिल्या 10,000 स्टार्टअप्सना मान्यता मिळून या उपक्रमात समावेश होण्यासाठी 808 दिवस लागले होते त्या तुलनेत नुकतेच 10,000 स्टार्टअप्ससाठी केवळ 180 दिवस लागले. या उपक्रमाच्या पहिल्या वर्षात 2016-2017 मध्ये 743 स्टार्टअप्सना मान्यता मिळाली, यात आता वेगाने वाढ होऊन 2020-2021 मध्ये वर्षभरात 16,000 पेक्षा जास्त स्टार्टअप्स मान्यताप्राप्त झाले आहेत.
उद्योजकांकडे आता विविध कायदे, नियम, वित्तीय आणि मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत, यामुळे स्टार्टअपसाठी अधिक पोषक वातावरण वाढीस लागत आहे.
मान्यताप्राप्त स्टार्टअप्सने रोजगार निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, प्रत्येक स्टार्टअपमध्ये सरासरी 11 कर्मचार्यांसह 48,093 स्टार्टअपद्वारे 5,49,842 रोजगाराची नोंद झाली आहे. एकट्या 2020-21 वर्षाच्या कालावधीत मान्यताप्राप्त स्टार्टअप्सद्वारे सुमारे 1.7 लाख रोजगारनिर्मिती झाली.
'अन्न प्रक्रिया', 'उत्पादन विकास','अनुप्रयोग विकास', 'माहिती तंत्रज्ञान सल्लागार' आणि 'व्यवसाय पाठबळ सेवा' ही जास्तीत जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स असलेली क्षेत्र आहेत. 45% स्टार्टअप्सचे नेतृत्व महिला उद्योजकांकडे आहे. हा कल अधिकाधिक महिला उद्योजकांना त्यांच्या कल्पना स्टार्टअपमध्ये परिवर्तीत करण्यास प्रेरित करेल.
आपल्या स्टार्टअप अर्थव्यवस्थेसाठी ओळखले जाणारे मुख्य स्तंभ मजबूत करण्याच्या दृष्टीने, डीपीआयआयटीच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. 10,000 रुपये ठेवीची निधी योजना आणि 945 कोटी रुपये इतका नियतव्यय असलेल्या नुकत्याच सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना (एसआयएसएफएस) च्या माध्यमातून स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करुन देण्याच्या संधींमध्ये वाढ झाली आहे.
राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार, राज्य मानांकन आराखडा, जागतिक व्हीसी परिषद, प्रारंभ : स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय परिषद यांसारखे अनेक कार्यक्रम उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे आखले आणि अंमलात आणले जातात. यामुळे विविध भागीदारांना समावेशाची संधी प्राप्त करून देणारे पोषक वातावरण उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या योगदानाला मान्यता मिळते आणि त्यांनी केलेले काम समोर येते.
भारतीय स्टार्टअप व्यवस्थेला अधिक उंचीवर पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याच्या दृष्टीने , या व्यवस्थेत विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग अनेक भागधारकांसह काम करत राहील
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1724106)
Visitor Counter : 2447