संरक्षण मंत्रालय

संरक्षण सचिवांच्या हस्ते डी जी एन सीसी मोबाईल प्रशिक्षण ॲप 2.0 चे उद्‌घाटन

Posted On: 28 MAY 2021 4:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 मे 2021

संरक्षण सचिव डॉ अजय कुमार, यांच्या हस्ते महासंचालक राष्ट्रीय  छात्रसेना (एनसीसी) मोबाईल प्रशिक्षण ॲपच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज नवी दिल्लीत उद्‌घाटन झाले. या ॲपमुळे कोविड महामारीच्या परिस्थितीत राष्ट्रीय छात्र सेनेला देशभर ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरे घेण्यास मदत होणार आहे. या ॲपवर एनसीसी शी संबंधित सर्व मूलभूत माहिती आणि प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व साहित्य (अभ्यासक्रम, सारांश, प्रशिक्षणाचे विडीओ, वारंवार विचारले जाणारे प्रश्न) अशा सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. यातून एनसीसी कॅडेट्सना प्रशिक्षण साहित्य सहज उपलब्ध होऊ शकेल आणि महामारीच्या काळातही ते प्रशिक्षण घेऊ शकतील.

एनसीसी कॅडेट्सनी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करत, आपले ऑनलाईन प्रशिक्षण सुरु ठेवले आहे, याबद्दल संरक्षण सचिवांनी त्यांचे कौतुक केले. एनसीसी प्रशिक्षण ॲप 2.0 कॅडेट्सना डिजिटल प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे, ज्यामुळे कोविड-19 मुळे शारीरिक अंतर आणि इतर  निर्बंध असतांनाही ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतील. हे ॲप वापरुन ते ऑनलाईन प्रशिक्षण घेऊ शकतात आणि त्याचे प्रमाणपत्रही त्यांना मिळेल जेणेकरुन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी सचिवांनी दिली. विशेषतः सर्व एनसीसी संचालनालयात, विविध प्रकारच्या सिम्युलेटर्स (आभासी स्वरूपात प्रात्यक्षिक करणारे उपकरण) बसवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच एनसीसी कॅडेट्स ना उपग्रह छायाचित्रे आणि जीआयएस-आधारित मॅपिंग च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली. एनसीसी कॅडेट्स ना त्यांच्या गणवेशासाठी थेट लाभ हस्तांतरणातून लवकरच निधी दिला जाईल, असेही डॉ अजय कुमार यांनी सांगितले.

एनसीसी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल तरुण कुमार आईच म्हणाले, कोविडच्या पहिल्या लाटेच्या काळात एनसीसी विद्यार्थ्यांना, प्रशिक्षण देण्यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर काळाची गरज होती. त्यादृष्टीने डी जी एनसीसी मोबाईल ॲप 1.0 चे उद्‌घाटन, 27 ऑगस्ट 2020 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले होते.

आता हे दुसरे ॲप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध असेल, अशी माहिती आईच यांनी दिली. ॲपवर दिशादर्शनासाठी काही नवी पाने जोडण्यात आली आहेत. तसेच अभ्यासक्रमाचा सारांश आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील समाविष्ट करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

त्याशिवाय, हे ऑनलाईन वर्ग अधिक उत्तम आणि रोचक करण्यासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण विषयक  130 व्हिडीओ देखील त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. यात प्रश्न विचारण्याचा पर्याय देत, ॲप संवादी राहील अशी सोय करण्यात आली आहे.हे ॲप वापरतांना, विद्यार्थी या प्रशिक्षणाविषयचे प्रश्न त्यावर विचारू शकतात.तज्ञ प्रशिक्षकांचे पैनेल त्या प्रश्नांची उत्तरे देईल.

सर्व 17 एनसीसी महासंचालनालयाचे अधिकारी आणि छात्र या आभासी उद्‌घाटन सोहळ्याला उपस्थित होते.

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1722475) Visitor Counter : 279