संरक्षण मंत्रालय

लष्करातील कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त सैनिकांना टेलिमेडिसिन सेवा देण्यासाठी संरक्षणमंत्री  राजनाथ सिंह यांच्या हस्ते 'सेहत'  ओपीडी पोर्टलचा प्रारंभ

Posted On: 27 MAY 2021 5:11PM by PIB Mumbai

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 27 मे 2021 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्विसेस ई - हेल्थ असिस्टंस अँड टेलीकन्सल्टेशन   (सेहत )ओपीडी पोर्टल सुरू केले. लष्करातील कर्मचारी, सेवानिवृत्त सैनिक  आणि  त्यांच्या कुटुंबियांना टेलिमेडिसिन सेवा देण्यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यासाठी  https://sehatopd.in/.  या  संकेतस्थळावर   नोंदणी करून  सेवांचा लाभ घेता येईल. सेहत ओपीडी पोर्टलचे हे अंतिम संस्करण असून त्यात अद्ययावत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.   ऑगस्ट 2020 मध्ये या पोर्टलचे  चाचणी संस्करण सक्रिय करण्यात आले होते. सेवेतील  डॉक्टरांकडून  बीटा व्हर्जनवर आधीच 6,500 हून अधिक वैद्यकीय सल्ले देण्यात आले आहेत.

आजच्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांनी लष्कर  व्यवहार विभाग (डीएमए), सशस्त्र बल  वैद्यकीय सेवा (एएफएमएस), एकात्मिक संरक्षण कर्मचारी (आयडीएस), सेन्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ आर्टिफिशिअल कंप्युटिंग  (सी-डॅक ) मोहाली आणि पोर्टलच्या विकसनात सहभागी इतर संस्थांचे कौतुक केले. या उपक्रमाच्या माध्यमातून 'डिजिटल इंडिया' आणि 'ई-गव्हर्नन्स' प्रति सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित होत असल्याचे ते म्हणाले.  आपल्या देशातील नागरिकांना अधिक चांगल्या, जलद आणि पारदर्शक सुविधा पुरवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो, असे त्यांनी अधोरेखित केले. देश कोविड - 19 साथीशी लढा देत असताना सेहत ओपीडी पोर्टल नाविन्यतेचे उत्तम उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले.  हे पोर्टल रुग्णालयांवरील भार कमी करण्यात मदत करेल आणि या पोर्टलच्या माध्यमातून रूग्णांना सुलभ व प्रभावी पद्धतीने संपर्कविरहित सल्ला मिळणे शक्य होईल, असे ते म्हणाले.

एएफएमएसने या पोर्टलवर तज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवण्याचा आणि  कर्मचार्‍यांच्या घरी औषधसेवा देण्याचा विचार करावा, असे आवाहन संरक्षणमंत्र्यांनी  केले. ते अधिक सोयीचे होईलअसे ते म्हणाले.  सेवांच्या सुधारित वितरणासाठी लाभार्थ्यांकडून नियमित अभिप्राय घ्यावा, असे राजनाथ सिंह यांनी सुचवले.

कोविड -19 च्या दुसऱ्या लाटेविरोधातील लढ्यात  संरक्षण संशोधन आणि  विकास संस्था  (डीआरडीओ) आणि सशस्त्र सैन्याने दिलेल्या योगदानाचे राजनाथ सिंह  कौतुक केले. दिल्ली, लखनौ, गांधीनगर आणि वाराणसीसह देशभरात अनेक ठिकाणी डीआरडीओकडून  कोविड रुग्णालये आणि ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे उभारण्यात आली.  तसेच विषाणूविरूद्ध लढण्यासाठी 2-डीजी औषधाच्या विकसनाचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कोविड रुग्णालयात  वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ तैनात केल्याबद्दल तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या आव्हानाला  प्रभावीपणे सामोरे जात असल्याबद्दल त्यांनी एएफएमएसचे कौतुक केले.  देशात आणि परदेशात  ऑक्सिजन तसेच इतर  वैद्यकीय उपकरणांची  वेळीच वाहतूक करण्यासाठी  अथक परिश्रम घेणाऱ्या भारतीय हवाई दल  आणि भारतीय नौदलाचे राजनाथ सिंह यांनी कौतुक केले. कोविड - 19  विरूद्धचा लढा  जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत कार्य सुरूच ठेवण्याचे आणि   समर्पित प्रयत्नांचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

***

M.Pange/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1722174) Visitor Counter : 260