रेल्वे मंत्रालय

खराब हवामान आणि चक्रीवादळाचा सामना करत पूर्वेकडील राज्यांतून 12 ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी वैद्यकीय वापरासाठीचा 969 मेट्रिक टन ऑक्सिजन आणत देशाला केली मदत


ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी वैद्यकीय वापरासाठीच्या 17945 मेट्रिक टनांहून अधिक द्रवरूप ऑक्सिजनचा केला पुरवठा

272 हून जास्त ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण करत 1080 टँकर्सच्या वाहतुकीतून 15 राज्यांना केली मदत केली

Posted On: 26 MAY 2021 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मे 2021

 

मार्गात येणारे सर्व अडथळे पार करत आणि समस्यांवर नव्या पद्धतीने मात करत भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करून त्यांना दिलासा देण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. आतापर्यंत, रेल्वे विभागाने देशभरातील विविध राज्यांना 1080 टँकर्समधून वैद्यकीय वापरासाठीच्या 17945 मेट्रिक टनांहून अधिक द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.

आतापर्यंत 272 हून जास्त ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी त्यांचा प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना मदत केली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे.

काल रात्री 12 वाजेपर्यंत सुरु असलेल्या विविध कार्यानंतर, वैद्यकीय वापरासाठीचा 969 मेट्रिक टन ऑक्सिजन घेऊन 12 ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांनी चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पूर्वेकडील राज्यांमधून त्यांचा प्रवास सुरु केला आणि देशाला मदत करण्याच्या हेतूने निघालेल्या या गाड्यांनी बिकट हवामानाचा यशस्वी सामना केला.

या 12 ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांपैकी 3 गाड्या तामिळनाडू, 4 आंध्रप्रदेश आणि प्रत्येकी 1 गाडी दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम आणि केरळ राज्यासाठी आहे.

दक्षिणेकडील राज्यांचा विचार केला तर तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांना प्रत्येकी 1000 मेट्रिक टनपेक्षा जास्त द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

झारखंड राज्यासाठीची पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस तिथे पोहोचल्याने आता रेल्वेमार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा मिळणारे झारखंड हे देशातील 15 वे राज्य ठरले आहे.

ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या राज्यांना शक्यतो अत्यंत कमी वेळात शक्य तितका अधिकाधिक  प्रमाणात ऑक्सिजन पुरवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

देशातील उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या 15 राज्यांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांच्या माध्यमातून द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

हे पत्रक जारी होईपर्यंत, महाराष्ट्रात 614 मेट्रिक टन, उत्तर प्रदेशात 3731 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 633 मेट्रिक टन, दिल्लीत 4910 मेट्रिक टन, हरियाणा मध्ये 1911 मेट्रिक टन, राजस्थानात 98 मेट्रिक टन, कर्नाटकात 1653 मेट्रिक टन, उत्तराखंड मध्ये 320 मेट्रिक टन उत्तराखंडात, तामिळनाडू मध्ये 1158 मेट्रिक टन, आंध्रप्रदेश मध्ये 929 मेट्रिक टन, पंजाबमध्ये 225 मेट्रिक टन, केरळात 246 मेट्रिक टन, तेलंगणामध्ये 1312 मेट्रिक टन, झारखंड राज्यात 38 मेट्रिक टन आणि आसाम मध्ये 160 मेट्रिक टन द्रवरूप ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

रेल्वे विभागाने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विविध मार्ग निश्चित केले आहेत आणि कोणत्याही राज्याला गरज भासली तर तिथे तातडीने ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी जय्यत तयारी ठेवली आहे. राज्य सरकारांनी द्रवरूप ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी भारतीय रेल्वेला रिकामे टँकर पुरविले आहेत.

ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांच्या ऑक्सिजन वाहतुकीची सुरुवात 24 एप्रिलला महाराष्ट्रासाठी 126 मेट्रिक टन ऑक्सिजन आणण्यापासून झाली हे लक्षात घेण्यासारखे आहे.

देशात मार्गक्रमण करत, भारतीय रेल्वे देशाच्या पश्चिम भागातील हापा, बडोदा, मुंद्रा येथून तर पूर्व भागातील रुरकेला, दुर्गापूर, टाटानगर आणि अंगुल येथून ऑक्सिजन घेऊन गुंतागुंतीच्या कार्यान्वयन मार्गांच्या नियोजनातून तो उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये पोहोचवीत आहे.

ऑक्सिजनच्या रूपातील मदत शक्य तितक्या कमी वेळेत आवश्यक तिथे पोहोचण्याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी भारतीय रेल्वे, ऑक्सिजन एक्प्रेस वाहतूक गाड्यांच्या परिचालनाबाबत नवे मानक आणि अभूतपूर्व टप्पे निर्माण करत आहे. लाबं पल्ल्याच्या प्रवासासाठी या अत्यंत महत्त्वाच्या ऑक्सिजन एक्प्रेस वाहतूक गाड्यांचा वेग सरासरी ताशी 55 किमी पेक्षा जास्त ठेवण्यात येत आहे. ऑक्सिजनचा शक्य तितक्या जलदगतीने खात्रीपूर्वक पुरवठा करण्यासाठी रेल्वेच्या विविध विभागांमधील कार्यपथके, उच्च प्राधान्यक्रमाच्या हरित कॉरीडॉर द्वारे अत्युच्च तातडीची जाण ठेवून सर्वात आव्हानात्मक परिस्थितींमध्ये अहोरात्र काम करत आहेत.

ऑक्सिजन एक्प्रेस गाड्यांसाठी रेल्वेमार्ग खुले ठेवण्यात आले असून या गाड्यांचा प्रवास अखंडितपणे सुरु राहण्यासाठी खूप सतर्कता बाळगण्यात येत आहे.

हे सर्व करताना रेल्वेद्वारे होत असलेल्या इतर प्रकारच्या मालवाहतूकीचा वेग कमी होणार नाही अशा पद्धतीनेच कार्य केले जात आहे.

नव्या ऑक्सिजन एक्सप्रेस गाडीचे परिचालन हा अत्यंत नाविन्यपूर्ण अनुभव आहे आणि त्यातून होत असलेल्या ऑक्सिजनच्या वाहतुकीबाबतची आकडेवारी अद्ययावत करण्यात येत आहे. ऑक्सिजन भरलेल्या आणखी काही गाड्या आज रात्री उशिरा प्रवास सुरु करतील अशी अपेक्षा आहे.


* * *

S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1721894) Visitor Counter : 277