गृह मंत्रालय
‘यास’ चक्रीवादळाच्या सज्जतेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओदिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल यांच्यासोबत घेतला आढावा
Posted On:
24 MAY 2021 4:05PM by PIB Mumbai
बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या 'यास' चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या सज्जतेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ओदिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अंदमान निकोबार द्वीपसमूहाचे नायब राज्यपाल तसेच केंद्रीय मंत्रालये आणि संबंधित संस्थांसोबत आढावा बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
अमित शहा यांनी सर्व कोविड -19 रुग्णालये, प्रयोगशाळा, लसीच्या शीतगृह साखळी व इतर वैद्यकीय सुविधांमध्ये वीज पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश प्रशासनांसोबत विशेषतः पुनरावलोकन केले आणि आढावा घेतला.
पश्चिम किनाऱ्यावर या संदर्भात आधीच केलेल्या उपाययोजनांमुळे वैद्यकीय सुविधांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे सुनिश्चित झाले आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.
पश्चिम बंगाल, ओदिशा आणि आंध्र प्रदेश राज्यांत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांवर चक्रीवादळाच्या होणाऱ्या परिणामांचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी आढावा घेतला. दोन दिवस पुरेसा ऑक्सिजनचा बफर साठा ठेवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे आणि ऑक्सिजन टँकरचे वाटप राज्यांना करण्यासाठी हालचाली करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या, जेणेकरून काही अडथळा निर्माण झाल्यास वाटप केलेल्या राज्यांना पुरवठा प्रभावित होणार नाही.
सर्व मालवाहू व मासेमारी जहाजांच्या सुरक्षेचा तसेच त्या भागातील सर्व बंदरे व तेलाच्या खाणींचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
हवामानाच्या आगाऊ इशाऱ्यांसाठी आणि अद्ययावत हवामान अंदाजासाठी भारतीय हवामान खात्याशी संपर्क साधण्याचा सल्ला अमित शहा यांनी राज्य सरकार आणि अंदमान व निकोबार द्वीपसमूह केंद्र शासित प्रदेशांना दिला.
गृह मंत्रालयात एक 24x7 नियंत्रण कक्ष कार्यरत असून तिथे कोणत्याही मदतीसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेश कधीही संपर्क साधू शकतात अशी माहिती अमित शहा यांनी दिली.
***
S.Tupe/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1721272)
Visitor Counter : 211