युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
2021 च्या क्रीडा पुरस्कारांसाठी युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागविली नामांकने
Posted On:
20 MAY 2021 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2021
क्रीडाक्षेत्रातील उत्तुंग कामगिरी हेरून तिचा गौरव करण्यासाठी दरवर्षी क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. क्रीडा क्षेत्रात एखाद्या खेळाडूने बजावलेल्या चार वर्षांतील नेत्रदीपक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' देण्यात येतो. तर चार वर्षांतील सातत्यपूर्ण दिमाखदार कामगिरीसाठी 'अर्जुन पुरस्कार' प्रदान केला जातो. प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधील पदकविजेते खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षकांना 'द्रोणाचार्य पुरस्काराने' सन्मानित करण्यात येते तर खेळांच्या विकासासाठी आजीवन योगदान देणाऱ्या व्यक्तीस 'ध्यानचंद पुरस्कार' देऊन तिचा गौरव करण्यात येतो. खेळांना प्रोत्साहन देणे व खेळांचा विकास यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्या व व्यक्तींना 'राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार' दिला जातो. तर आंतर-विद्यापीठीय स्पर्धांमध्ये सर्वांगीण सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यापीठास 'मौलाना अबुल कलाम आजाद' करंडक प्रदान केला जातो.
युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय दरवर्षी या क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकने/ अर्ज पाचारण करते. वर्ष 2021 करिता या पुरस्कारांसाठी नामांकने/ अर्ज मागविणाऱ्या अधिसूचना मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.yas.nic.in) येथे अपलोड करण्यात आल्या आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटना / भारतीय क्रीडा प्राधिकरण/ नामांकित राष्ट्रीय क्रीडा महासंघ/ क्रीडा प्रोत्साहन मंडळे/ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांची सरकारे/प्रशासने यांनाही तशा संबंधित सूचना देण्यात आल्या आहेत.
पात्र खेळाडू/ प्रशिक्षक/ संस्था/ विद्यापीठांकडून सदर पुरस्कारांसाठी नामांकने/ अर्ज मागविण्यात येत असून ते त्यांनी इ-मेलद्वारे surendra.yadav[at]nic[dot]in किंवा girnish.kumar[at]nic[dot]in येथे पाठवावयाचे आहेत. नामांकने/ अर्ज पाठविण्याची मुदत 21जून 2021 (सोमवार) संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत असेल. मुदत संपल्यानंतर आलेल्या नामांकनांचा विचार केला जाणार नाही.
* * *
M.Chopade/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1720368)
Visitor Counter : 260