संरक्षण मंत्रालय

तौते चक्रीवादळादरम्यान केलेल्या शोध आणि बचाव कार्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सैन्यदलांचे आणि भारतीय तटरक्षक दलाचे केले कौतुक

Posted On: 20 MAY 2021 4:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2021


तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागांमध्ये सुरू असलेल्या शोध आणि बचाव कार्यांसाठी सशस्त्र सेनादले आणि भारतीय तटरक्षक दलाच्या प्रयत्नांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले आहे. समुद्रात अडकलेल्या व्यक्तींचा जीव वाचवल्याबद्दल त्यांनी भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाचे कौतुक केले आहे. प्रभावित क्षेत्रात आपले सैनिक तैनात केल्याबद्दल त्यांनी भारतीय लष्कराची तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या कर्मींना प्रभावित क्षेत्रात कर्तव्यासाठी पोहोचविल्याबद्दल भारतीय हवाई दलाची प्रशंसा केली आहे. 

राजनाथ सिंह हे  नौदलप्रमुख  अ‍ॅडमिरल करमबीर सिंह, लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन, यांच्या सतत संपर्कात असून त्यांना नियमितपणे  माहिती दिली जात आहे.

संरक्षणमंत्र्यांनी 17मे 2021 रोजी आढावा बैठकीत येणाऱ्या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सशस्त्र सेनादलांना नागरी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.

भारतीय नौदल  आणि भारतीय तटरक्षक दलाने  आपली सागरी  व हवाई संसाधने  तैनात करून  गेल्या काही दिवसात मुंबईजवळच्या समुद्रात अडकलेल्या  चार बार्जमधल्या  600 हून अधिक व्यक्तींची सुटका केली आहे.

भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि विमाने, मुंबईहून 3  मैलांच्या अंतरावर 17 मे 2021  रोजी बुडलेल्या पी - 305 या निवासी बार्जवरील 38 बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सध्या शोध आणि बचाव  कार्य करत आहेत. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, आयएनएस ब्यास, आयएनएस बेतवा, आयएनएस तेग , पी 8 आय हे सागरी गस्त  विमान, चेतक, एएलएच आणि सी किंग हे  हेलिकॉप्टर्स शोध आणि बचाव कार्य करत आहेत.  मदत व बचाव कार्यात साहाय्य  करण्यासाठी आयएनएस तलवार सुद्धा रवाना करण्यात आली आहे. 20 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत बार्ज  पी -305 वरील  एकूण 186 लोकांना वाचवण्यात आले आणि 37 मृतदेह बाहेर काढण्यात आले.

गुजरात किनाऱ्याजवळ  आय.एन.एस. तलवारने  सपोर्ट स्टेशन 3 आणि ड्रिल शिप सागर भूषण यांना साहाय्य केले.  आता ती ओएनजीसीच्या सहायक जहाजांद्वारे सुखरूपपणे  मुंबईला  परत आणली जात आहेत. मुंबईहून  नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी  या जहाजांमधील 300 हून अधिक कर्मचाऱ्यांना अन्न व पाणी पुरवले.

भारतीय तटरक्षक दलाची जहाजेही शोध आणि बचाव  कार्यात सहभागी आहेत आणि त्यांनी केरळ, गोवा आणि लक्षद्वीप समुद्रातील  बद्रीया, जिझस, मिलाड, ख्रिस्त भवन, परियानायकी  आणि नोव्हाज  आर्क या विविध मासेमारी नौकांवरील चालकदलाला सुखरूप  परत  आणले आहे. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या  जहाजांनी समन्वयाने  न्यू मंगलोर बंदराजवळ  सिंगल पॉईंट मूरिंग ऑपरेशनसाठी एमव्ही कोरोमंडल सपोर्टर IX, वरील  नऊ  सदस्यांना सुखरूप  बाहेर काढले.

पुरेशा विजेअभावी  मुंबईच्या उत्तर दिशेने भरकटलेल्या  एमव्ही गॅल कन्स्ट्रक्टरवरील 137  जणांना, दमण इथून आलेली  भारतीय तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर्स, आयसीजीएस सम्राट आणि मुंबईच्या आयएनएस शिक्रा येथील भारतीय नौदलाचे मदत हेलिकॉप्टर  यांनी सुखरुप बाहेर काढले.

तत्पूर्वी, भारतीय हवाई दलाने  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे  सुमारे 400 जवान आणि 60 टन उपकरणे अहमदाबादला नेण्यासाठी आपले सी -130 जे आणि एएन -32 ही विमान तैनात केली  होती. भारतीय लष्कराने  जामनगरहून दीव येथे अभियंता कृतीदल रवाना केले. तातडीच्या मदतीसाठी  आणखी दोन तुकड्या जुनागडकडे रवाना केल्या . रस्त्यातले अडथळे दूर करणे आणि  गरजूंना अन्न व निवारा पुरवण्यात सैन्याचा सहभाग होता.


* * *

Jaydevi PS/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1720288) Visitor Counter : 215