निती आयोग

AIM-ICDK जल नवोन्मेष स्पर्धेची यशस्वी सांगता

Posted On: 19 MAY 2021 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मे 2021

भारत-डेन्मार्क द्विपक्षीय हरित धोरणात्मक भागीदारी अंतर्गत, अटल इनोव्हेशन मिशन (AIM), निती आयोग यांनी डेन्मार्क दूतावास आणि डेन्मार्क तंत्रविषय विद्यापीठ (DTU) यांच्या अखत्यारीतील, नवोन्मेष केन्द्र डेन्मार्क (ICDK) - यांच्यासह भविष्यातील जलविषयक कृती जल नवोन्मेष अंतिम स्पर्धेची (NGWA) यशस्वी सांगता केली.

जागतिक जलविषयक कृती कार्यक्रम

ग्लोबल नेक्स्ट जनरेशन वॉटर  ॲक्शन प्रोग्राम हा आंतरराष्ट्रीय जल संघटना आणि डेन्मार्क तंत्र विद्यापीठातर्फे राबवला जात आहे. यंदाभारत आणि डेन्मार्क त्याचे यजमान आहेत. या कार्यक्रमासाठी भारतीय संशोधकांना शोधणे आणि त्यांचा सहभाग निश्चित करणे याकरता AIM-ICDK जल नवोन्मेष (आव्हान) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेसाठी देशभरातून 400 पेक्षा जास्त नवोन्मेषी अर्ज दाखल झाले. त्यातून  10 भारतीय संघ निवडण्यात आले.  पैकी 6 संघ विद्यार्थ्यांचे तर 4 संघ स्टार्टअप्सचे होते.

निवडलेले संघ जल कृती कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधीत्व करतील. भारत, डेन्मार्क, केनिया, घाना आणि दक्षिण कोरिया या पाच देशातल्या प्रतिथयश विद्यापीठ तसेच नवोन्मेषी संस्थांमधील तरुण प्रज्ञावंतांना या कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी DTU ने पुढाकार घेतला आहे. यांद्वारे, शहरांच्या पाणी विषयक आव्हानांवर तोडगा शोधण्यासाठी हे प्रज्ञावंत आपले कौशल्य , तंत्रज्ञान विषयक अनुशासन , नवोन्मेष क्षमता यांचा विकास करु शकतील.

भारतात या स्पर्धेअंतर्गत, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना पुढील विषयावर आपल्या संकल्पना सादर करायच्या होत्या : पाण्याच्या डिजिटल व्यवस्थापनासाठी उपाय,  शहरातील पाणी पुरवठ्यातील गळती आणि  ती रोखणे तसेच देखरेख यावर उपाय, ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी अपव्यय रोखण्यासाठी व्यवस्थापन, पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि सुरक्षित शाश्वत पिण्याचे पाणी. भारताने प्रतिनिधींसोबतच स्पर्धेची सह भागीदारीही स्विकारली. स्पर्धेचे सह भागीदार म्हणून भारताने विद्यार्थ्यांचे तीन संघ पाठवले. स्पर्धेत डेन्मार्क आणि दक्षिण कोरियाच्या प्रत्येकी एका संघाने भाग घेतला. दरम्यान, स्टार्टअप्स संघानी थेट जागितक अंतिम फेरीत भाग घेतला.

DTU ने 18 मे 2021 रोजी याचे आयोजन केले होते. अंतिम स्पर्धा डेन्मार्क तंत्र विद्यापीठात झाली. यात पाच देशातील प्रतिनीधींनी स्थानिक संस्थातून आभासी पद्धतीने भाग घेतला. भारताने या अंतिम फेरीचे आयोजन आभासी पद्धतीने केले. यातील परिचर्चेचे अध्यक्षपद अटल नवोन्मेष अभियानाचे, संचालक डॉ. चिंतन वैष्णव यांनी भूषवले.

नेक्स्ट जनरेशन वॉटर  ॲक्शन कार्यक्रमात पुढील भारतीय संघांना विजयी घोषित करण्यात आले:

विद्यार्थी संघ :

  1. प्रोत्साहनपर पुरस्कार: वैशाली आणि कौशल्या यांना ‘परवडणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत व्यवस्थापनाचे उपाय (SMART)यासाठी देण्यात आला.
  2. सर्वोत्तम आशादायी उपाय : मिहीर पालव आणि एकताव्यम संघ यांना जल प्रशासनासाठी बहुस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करणाऱ्या उपायांसाठी देण्यात आला. 
  3. आंतरराष्ट्रीय जागतिक जल  काँग्रेस 2022 शिष्यवृत्त्या:

मिहीर पालव आणि एकताव्यम संघ यांना जल प्रशासनासाठी बहुस्तरीय व्यासपीठ उपलब्ध करणाऱ्या उपायांसाठी जाहीर झाल्या. 

स्टार्टअप्स संघ:

  1. सर्वोत्तम 5 स्टार्टअप्स : 2 भारतीय स्टार्टअप्सचा यात समावेश आहे. आकांक्षा अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील ॲग्रोमार्फ आणि मानसी जैन यांच्या नेतृत्वाखालील डिजिटल इकोइनोव्हिजन यांची पाच स्टार्टअप्समध्ये  निवड झाली.
  2. आंतरराष्ट्रीय जागतिक जल काँग्रेस 2022 शिष्यवृत्त्या: आकांक्षा अगरवाल यांच्या नेतृत्वाखालील ॲग्रोमार्फ

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1719897) Visitor Counter : 182