पंतप्रधान कार्यालय
राज्ये आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी कोविड-19 व्यवस्थापनाबाबतच्या चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी साधलेला संवाद
Posted On:
18 MAY 2021 6:57PM by PIB Mumbai
मित्रांनो,
आपण सगळ्यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतांना अत्यंत कठोर परिश्रम केले आहेत आणि सातत्याने करत आहात. आपल्यापैकी अनेक लोक असे आहेत, जे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असूनही आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सांभाळण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील इतर लोकांची उमेद वाढली आणि त्यांना आपल्यापासून प्रेरणा मिळाली. असे अनेक लोक आहेत, जे कित्येक दिवस आपल्या घरीही जाऊ शकलेले नाहीत, आपल्या घरच्यांची भेट घेऊ शकलेले नाहीत. कित्येकांनी या महामारीत आपल्या कुटुंबातील महत्वाच्या व्यक्ती, आपले जवळचे लोक गमावले आहेत. या कठीण प्रसंगी देखील आपण आपल्या कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आता आपल्यापैकी अनेक सहकाऱ्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मला मिळाली आहे. तसे तर माझ्यासमोर आज अनेक लोक आहेत. प्रत्येकाचे अनुभव ऐकणे तर आता शक्य झाले नाही. मात्र,प्रत्येकापाशी काहीतरी नवे सांगण्यासारखे होते. काहीतरी अभिनव कल्पना, अनुभव होते. आणि आपण ज्या प्रकारे अडचणीतून मार्ग शोधले, तेच यश मिळवण्याचे सर्वात मोठे गमक आहे. आपण मूलभूत विचारांचा स्थानिक परिस्थितीनुसार कसा उपयोग करून, त्यातून माग काढतो, हे महत्वाचे
आहे. अनेकांचे प्रयत्न अभिनव, कल्पक होते. ज्यांना आज आपले अनुभव सांगण्याची संधी मिळाली नाही, त्यांच्याकडेही सांगण्यासारखे बरेच काही असेल. माझी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण ज्या काही उत्तम गोष्टी केल्या आहेत, ज्या उत्तम प्रकारे केल्या आहेत, त्या आपण मला निःसंकोचपणे लिहून पाठवा, नक्की माझ्यापर्यंत पोचवा. तुमच्या या चांगल्या कामांचा उपयोग इतर जिल्ह्यातही कसा करता येईल, याचा विचार मी करेन. कारण तुमचे परिश्रम आणि तुमच्या अभिनव कल्पना संपूर्ण देशाच्या कामी यायला हव्यात. आणि मला विश्वास आहे की आज जेवढ्या गोष्टी माझ्यासमोर आल्या आहेत, तेवढ्याच आणखीही अनेक गोष्टी असतील ज्या आपल्याला उपयुक्त ठरू शकतील. आपण आपल्या या सगळ्या गोष्टी नक्की माझ्यापर्यंत पोचवा. आपले सगळे प्रयत्न आणि परिश्रम खरोखर कौतुकास्पद आहेत.
मित्रांनो,
आपल्या देशात जितके जिल्हे आहेत, तितकीच वेगवेगळी आव्हानेही आहेत, एकप्रकारे प्रत्येक जिल्ह्याची आपली आव्हाने आहेत, आणि तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासमोरची आव्हाने उत्तमप्रकारे माहित आहेत. आणि म्हणूनच जर, तुमचा जिल्हा जिंकला तर त्याचा अर्थ देश जिंकला. जर तुमचा जिल्हा कोरोनावर मात देतो आहे, तर देश कोरोनावर मात देतो आहे. आणि म्हणूनच, जिल्ह्याचे ध्येय असले पाहिजे- गावागावांत हा संदेश प्रभावीपणे पोचवणे की ‘मी माझे गाव कोरोनामुक्त ठेवणार’. माझ्या गावात मी कोरोनाला प्रवेश करु देणार नाही. गावातल्या लोकांनी जर हा संकल्प केला, आणि गावातले लोक आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तम नियोजन करतात. गेल्या वर्षी याच काळात, ज्यावेळी कोरोना महामारीविषयी आपल्याला काही कल्पनाही नव्हती, उपाय माहित नव्हते. त्यावेळी सरकारने टाळेबंदी काळात, गावात शेतीकामांवर कोणतेही निर्बंध लावले नव्हते. विशेष म्हणजे, गावातले लोक शेतीच्या कामावर जात होते आणि त्यांनी तिथेही शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करत शेतीची कामे सुरु केली. गेल्यावर्षी आपल्याला आठवत असेल हे सगळे. सांगण्याचा उद्देश हा की आपली गावे अत्यंत तत्परतेने सामाजिक नियम, संदेश समजून घेतात आणि आपल्या गरजेनुसार त्यात बदल करुन त्याचे पालनही करतात. ही गावांची ताकद आहे. मी बघितले आहे. आजही अनेक गावांनी आपल्या गावातल्या लोकांच्या येण्याजाण्याचे व्यवस्थापन उत्तमप्रकारे केले आहे. गावाच्या गरजेसाठी एक किंवा दोघेजण बाहेर जातात आणि आवश्यक ते सामान घेऊन येतात, मग गावात त्यांचे वाटप करतात. गावात कोणाकडे पाहुणे आल्यास, त्यांना आधी बाहेर ठेवले जाते. गावांची ही आपली ताकद असते.त्या ताकदीचा एक उपयोग असतो. आणि मला इथे माझ्या या सर्व मित्रांना सांगायला आवडेल की कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आपण सगळे अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत आहात. एकप्रकारे आपण या युद्धभूमीवरचे सेनापती आहात. युद्ध जसे सुरु असते, तसे सेनापती त्याचे नियोजन करतो, युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढाई करतो आणि परिस्थितीनुसार निर्णय घेत असतो. आपण सगळे आज भारताच्या या महत्वाच्या युद्धात प्रत्यक्ष रणभूमीवरचा सेनापती म्हणून नेतृत्व करत आहात. आणि विषाणूविरुध्दच्या या लढाईत आपली आयुधे काय आहेत ? आपली आयुधे आहेत-स्थानिक प्रतिबंधित क्षेत्रे, आक्रमणपणे चाचण्या आणि लोकांपर्यंत योग्य आणि संपूर्ण माहिती पोचवणे. रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, कुठे उपलब्ध आहेत, ही माहिती लोकांना सहजपणे मिळाली तर लोकांची गैरसोय होत नाही, त्यांना त्रास होत नाही. त्याचप्रमाणे काळाबाजार कसा रोखला जावा, अशी कृत्ये करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई करणे, पहिल्या फळीत काम करणाऱ्या कोरोनायोध्यांची उमेद कायम ठेवत त्यांना एकत्रित करणे असो, प्रत्यक्ष भूमीवर काम करणाऱ्या कमांडर सारखे आपले प्रयत्न, समन्वयक म्हणून केलेले नेतृत्व यामुळे पूर्ण जिल्ह्याला सक्षम होण्याचे बळ मिळते. आपली कृती आणि वर्तणूक यातून अनेकांना प्रेरणा मिळत असते. त्यांचा विश्वास वाढतो. आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. सरकारने तयार केलेल्या धोरणात जर आपल्याला जिल्हास्तरावर काही बदल करण्याची, सुधारणा करण्याची गरज वाटते आहे, अशा सुधारणा, ज्यामुळे कोरोना व्यवस्थापनाचे धोरण आणखी मजबूत होणार असेल तर त्या करण्यास तुम्हाला सूट आहे, तुम्ही त्या जरूर अमलात आणा. जर हे अभिनव प्रयोग आपल्या जिल्ह्याच्या स्थानिक गरजांनुरूप असतील, तर त्यांना त्या पद्धतीने करा. जर आपल्याला वाटत असेल की आपण ज्या कल्पना अमलात आणल्या आहेत,त्या संपूर्ण राज्यासाठी, संपून देशासाठी लाभदायक आहेत, तर त्या कल्पना सरकारपर्यंत पोचवा.जर आपल्याला आपल्या अनुभवातून, जलद गतीने बदलत असलेल्या परिस्थितीनुसार, जर धोरणात काही सुधारणा कराव्यात असे आपल्याला वाटत असेल, तर ते ही सरकारपर्यंत जरूर पोचावा. निःसंकोच पोचवा. कारण ही अशी लढाई आहे, ज्याचा विचार आपण सर्वांनी करायचा आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे नवनव्या गोष्टी शोधून काढल्या तरच आपण आपले ध्येय साध्य करु शकू.
मित्रांनो,
आपल्या जिल्ह्याने मिळवलेले यश इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श उदाहरण बनू शकेल. त्यांनाही त्यातून मदत मिळू शकेल. कोरोनावर मात करण्यासाठी ज्या ज्या उत्तम पद्धती आहे, त्या सर्व स्वीकारून आपल्याला जायचे आहे. आपल्यापैकी अनेक सहकारी अशा जिल्ह्यांतले असतील जिथे कोरोना संक्रमण सर्वोच्च उंचीपर्यंत पोचून आता कमी होत चालले आहे. अनेक लोक असे असतील ज्यांच्या जिल्ह्यातल्या अनुभवांपासून शिकत आपण कोरोनाविरुद्धची आपली रणनीती अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न केले आहेत. असे अनुभवांचे आदानप्रदान करत राहिलो तर कोरोनाविरुद्धचा हा लढा सोपा होऊ शकेल.
मित्रांनो,
सध्या अनेक राज्यांत कोरोना संसर्गाचे आकडे कमी होत चालले आहेत.तर अनके राज्यात ते वाढतही आहेत. मित्रांनो, आकडे कमी होत असतांना आपल्याला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. गेल्या एका वर्षातल्या जवळपास प्रत्येक बैठकित माझा हाच आग्रह होता की आपली लढाई, आपली प्राथमिकता एकेक आयुष्य वाचवण्याची आहे. प्रत्येकाचे प्राण वाचवण्याची आहे. आपली जबाबदारी संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचीही आहे आणी हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपल्याला संसर्गाच्या प्रमाणाची आणि व्याप्तीची योग्य माहिती असेल.चाचण्या, संशयित रुग्णांचा माग, अलगीकरण आणि कोविडविषयक नियमांचे पालन या सगळ्यावर सातत्याने भर देण्याची गरज आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत, आता आपल्याला ग्रामीण आणि दुर्गम भागांकडे लक्ष विशेष लक्ष द्यायला हवे आहे. यासाठी या व्यवस्थापनातला आजवरचा आपला प्रत्यक्ष अनुभव आणि कौशल्य अतिशय उपयोगी पडणार आहे.
आपल्याला गावांगावांमधून जागरूकताही मोठ्या प्रमाणावर निर्माण केली पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत कोविड आजारावर असलेली औषधे आणि इतर सुविधाही पोहोचवायच्या आहेत. वाढत असलेली रूग्णसंख्या आणि मर्यादित साधन सामुग्री यांचा विचार करून लोकांच्या अपेक्षा लक्षात घेवून योग्य तो तोडगा काढण्यास आपण सर्वात जास्त प्राधान्य दिले पाहिजे. सध्या असलेल्या अवघड, परीक्षेच्या काळामध्ये समाजातल्या सर्वात खालच्या स्तरावरच्या व्यक्तीचा चेहरा लक्षात घेऊन आपल्याला काम केले पाहिजे. आपल्या उपाय योजनांमुळे त्यांचे कष्ट दूर व्हावेत, त्यांना मदत मिळावी, अशी मजबूत व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. या खूप मोठ्या वर्गापर्यंत ज्यावेळी प्रशासनातली एखादी जरी व्यवती पोहोचते, अथवा त्यांच्याशी संपर्क करते, त्यांचे म्हणणे ऐकून घेते, त्यामुळेही त्यांच्यामध्ये खूप मोठा विश्वास जागृत होतो. आजाराशी लढा देण्याची त्यांची ताकद अनेकपटींनी वाढते. आम्ही पाहतो आहोत, ज्यावेळी गृह विलगीकरणात राहिलेल्या कुटुंबाकडे ज्यावेळी प्रशासनातले लोक ऑक्सिमीटर घेवून जातात, औषधे घेवून जातात, त्यांची माहिती जाणून घेतात, त्यावेळी त्या परिवाराला आपण एकटे नाही, आपल्याला मदत करणारे कुणीतरी आहे असे वाटते आणि त्यांना खूप मोठा आधार मिळतो.
मित्रांनो,
कोविडव्यतिरिक्त आपल्या जिल्ह्यांमधल्या प्रत्येक नागरिकाच्या ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठीही आपण लक्ष दिले पाहिजे. आपल्याला रोगाचे संक्रमण तर रोखायचे आहेच आणि दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असणा-या वस्तूंचा, गोष्टींचाही पुरवठा विनाखंड करायचा आहे. यासाठी स्थानिक पातळीवर प्रतिबंधित क्षेत्राविषयी ज्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत, त्याचे पालन करताना, गरीबांना कमीत कमी त्रास व्हावा, याचा विचार केला जावा. कोणत्याही नागरिकाला त्रास होवू नये.
मित्रांनो,
पीएम केअर्सच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक जिल्हा रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प स्थापन करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. अनेक रूग्णालयांमध्ये या प्रकल्पांचे काम सुरूही झालो आहे. आत्ताच आपण चंदिगडची माहिती ऐकली. त्याचा किती लाभ तिथल्या लोकांना झाला, हे त्यावरून समजले आणि म्हणूनच आपल्या सर्वांना माझा आग्रह आहे की, ज्या कोणत्या जिल्ह्यांना आॅक्सिजन प्रकल्प स्थापन करण्यासाठी मंजूरी मिळणार आहे, त्यांनी आपल्या स्थानी आवश्यक असणारी तयारी आधीपासूनच सुरू करावी, म्हणजे ऑक्सिजन प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होवू शकेल. रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन मॉनिटरिंग समिती जितके योग्य प्रकारे काम करेल, तितक्या प्रमाणात ऑक्सिजनाचा योग्य वापर होवू शकेल.
मित्रांनो,
लसीकरण हे एक कोविडच्या लढाईतले सशक्त माध्यम आहे. म्हणूनच लसीकरणासंबंधी जे काही गैरसमज असतील त्यांचे निराकरण आपल्याला करायचे आहे. कोरोना विरोधातल्या लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाची व्यवस्था आणि प्रक्रिया योग्य प्रकारे व्हावी, यासाठी आरोग्य मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवायचा, याचे आगामी 15 दिवसांचे वेळापत्रक तयार करून त्याची माहिती राज्यांना आगावू पाठवण्यासाठी काम केले जात आहे. यामुळे तुम्हाला माहिती होईल की, जिल्ह्यामध्ये किती लोकांसाठी लस उपलब्ध होवू शकणार आहे आणि त्यादृष्टीने तुम्ही तयारीही करू शकणार आहे. लस वाया जाण्याचे प्रमाण कमीत कमी व्हावे, यासाठी जिल्हा स्तरावर योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, हे तुम्हा सर्वांनाही खूप चांगले माहिती आहे. तुम्हा मंडळींच्या सहकार्यानेच लस वाया जाणे संपूर्णपणे रोखता येणार आहे. इतकेच नाही तर, सर्वजणांनी मिळालेल्या लसीचा जास्तीत जास्त विनियोग कसा होवू शकेल, या दिशेने यशस्वीपणे पुढे जायचे आहे.
मित्रांनो,
हा काळ म्हणजे एका प्रशासकाबरोबरच मनुष्य बळ आणि व्यूहरचनात्मक पुरवठा व्यवस्थापक म्हणून आपण कशी भूमिका पार पाडतो, याची परीक्षा घेणारा, कसोटीचा काळ आहे. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित पुरवठाच नाही तर आपल्या जिल्ह्याला आवश्यक असणारे, इतर जरूरीचे सामानही पुरेसे असावे, आपल्या जिल्ह्याला इतर गोष्टींचा पुरवठाही योग्य प्रमाणात होणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळी हवामान कसे असते, हे आपण सर्वजण जाणून आहोत. आपण रोजच्या सरकारी कामांमध्ये गुंतलेले असता, मात्र जून महिना तोंडावर आला की, आपले लक्ष हवामान, पाऊस यांच्याकडेही द्यावे लागतेच. या गोष्टींकडे खूप लक्ष द्यावे लागते. आणि यंदाही आता पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे, तुम्हा सर्वांना पावसाळ्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. हे आव्हान तुमच्यासाठी जास्त ओझे बनणार आहे. जबाबदारीही असणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला अतिशय वेगाने आपल्या नेमक्या आवश्यकता काय आहेत, हे नोंदवून घ्यावे लागणार आहे आणि त्या सर्व गोष्टींचे नियोजनही करायचे आहे. आता अनेकदा जोरदार पावसामुळे वीज पुरवठा खंडित होतो. आणि काही ठिकाणी रूग्णालयांमध्ये वीज पुरवठा बंद होवून खूप मोठे संकट निर्माण होवू शकते. त्यामुळे अशा समस्या येवू शकतात, याचा विचार करून आधीच पर्यायी उपाय योजले पाहिजेत. या सगळ्या कामांचे खूप मोठे आव्हान आहे, परंतु आपल्याकडे असलेले धैर्यही त्यापेक्षाही मोठे आहे. आणि आपण देत असलेला प्रतिसादही न भूतो न भविष्यती... असा असला पाहिजे.... या महान धैर्याबरोबरच आणि संकल्पाबरोबरच, आपण केलेला पक्का इरादा आणि संकल्प यांच्यामुळेच आपण सर्वजण मिळून देशाला या संकटातून बाहेर काढणार आहोत. आत्ता कोरोनाच्या विरोधात लढा देताना तुम्हाला जो काही अनुभव येईल, तो भविष्यातही तुम्हाला आणि देशालाही खूप सहाय्यभूत ठरणार आहे. मला विश्वास आहे की, तुमच्या सहकार्याने, तुमच्या कुशल नेतृत्वाने, तुमच्या कुशल व्यवस्थापनाने कोरोनाच्या विरोधातल्या या लढाईत भारत अधिक ठामपणे, मजबुतीने पुढे जाईल. मला आनंद वाटतो की, आज जी राज्ये या बैठकीत सहभागी झाली आहेत, त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही वेळ काढला. ज्यावेळी कार्यक्रमाची नियोजन केले जात होते, त्यावेळी वाटत होतं की, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या व्यग्रतेतून वेळ काढण्याची गरज नाही. कारण जिल्ह्यातल्या लोकांशी बोलणे, त्यांना माहिती आहेच. मात्र तरीही या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून मुख्यमंत्रीही जोडले गेले, ही गोष्ट स्वागतार्ह आहे. मी सर्व आदरणीय मुख्यमंत्र्यांचे हृदयापासून आभार व्यक्त करतो. आणि मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याच्या संपूर्ण टीमला एका विश्वासाने, संकल्पाने एका-एका गावाचा कोरोनापासून बचाव करायचा आहे. हा मंत्र जपत आपण सर्वांनी पुढची वाटचाल करायची आहे. आणि वेगाने कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कसे वाढेल, निगेटिव्ह प्रकरणांची संख्या कशी वाढेल, वेगाने चाचण्या कशा केल्या जातील, या सर्व गोष्टींवर भर देवून आपण यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी एकही प्रयत्न सोडायचा नाही. एकही प्रयोग करणे बाकी ठेवायचा नाही. मला विश्वास आहे की, आपल्याकडून जे काही आज ऐकले आहे, त्यामध्ये एक आत्मविश्वासही आहे. अनुभवही आहे. कामाच्या नवनवीन पद्धतीही आहेत. या सर्व गोष्टी आपोआपच आपल्यामध्ये खूप मोठा विश्वास निर्माण करतात. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप-खूप धन्यवाद देतो. आणि हे काम खूप मोठे आहे. फिल्डमध्ये रहायचे आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःच्या आरोग्याकडेही जरूर लक्ष द्यावे. नातलगांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तिथल्या प्रत्येक नागरिकाला आरोग्यदायी बनविण्यासाठी तुमचे नेतृत्व कामी यावे, अशी अपेक्षा करतो. याबरोबरच मला विश्वास आहे की, तुमच्याकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा!!
***
M.Chopade/R.Aghor/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1719677)
Visitor Counter : 303
Read this release in:
Punjabi
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu