संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओने विकसित केलेल्या कोविड प्रतिरोधक औषधांच्या पहिल्या बॅचचे उद्घाटन करून ते आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे सुपूर्द केले

2-DG औषध हा कोविड-19 विरोधी लढ्यातील आशेचा किरण असल्याचे संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन

Posted On: 17 MAY 2021 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 मे 2021

 

समायोजित कोविड उपचारपद्धतीतील (adjunct covid therapy) कोविड प्रतिरोधक औषध - 2-deoxy-D-glucose अर्थात 2-DG ची पहिली तुकडी 17 मे 2021 रोजी नवी दिल्ली इथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सादर केली व त्यानंतर ती आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच विज्ञान, तंत्रज्ञान व पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ हर्ष वर्धन यांना सुपूर्द केली. या औषधांच्या पाकिटांची प्रत्येकी एक पेटी डॉ. रणदीप गुलेरिया, संचालक,अखिल भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था (AIIMS) यांना, तसेच सैन्यदल वैद्यकीय सेवेचे (AFMS) ले.जन. सुनील कांत यांना देण्यात आली.  यानंतर हे औषध देशातील विविध रुग्णालयांना आपत्कालीन उपयोगासाठी उपलब्ध करून दिले जाईल. 2-deoxy-D-glucose (2-DG)  या औषधाचा कोविड-19 प्रतिरोधक म्हणून उपयोग करण्यासंबंधीचे संशोधन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) या संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) एका प्रयोगशाळेने विकसित केले आहे. यात त्यांना डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज,(DRL), हैद्राबाद यांचे सहकार्य मिळाले होते. कोविड रुग्णांचे ऑक्सिजन वरील अवलंबित्व कमी करून त्यांना लवकर बरे करणारे औषध उत्पादित केल्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी डीआरडीओ व डीआरएल यांचे अभिनंदन केले आहे. हे औषध म्हणजे देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचे द्योतक असून आत्मनिर्भरतेकडे चाललेल्या वाटचालीतील एक महत्त्वाचा मैलाचा दगड असल्याचे यावेळी संरक्षण मंत्र्यांनी सांगितले. या औषधाचा विकास म्हणजे या आव्हानात्मक काळात देशाला मदत करणाऱ्या खाजगी-सरकारी भागीदारीचे उत्तम उदाहरण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संबंधित मंत्रालये व विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून देशभरातील रुग्णालयांत ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा तसेच ICU मधील खाटाच्या परिस्थितीवर सरकार सतत लक्ष ठेवून योग्य ती पावले उचलत असल्याचे यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले.

देशाच्या नागरी प्रशासनाला सैन्यदलाकडून होणारी मदत खूप महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची बाब यावेळी राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केली. या महामारीशी चालू असलेल्या देशाच्या  लढ्यात सर्व जणांनी खांद्याला खांदा भिडवून साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले, तसेच या अदृश्य शत्रूशी चाललेल्या लढाईत देश नक्कीच विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डीआरडीओ व डीआरएल, हैद्राबादच्या या महत्वपूर्ण  2-DG औषधामुळे कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज कमी होईल व बरे होण्याचा वेग वाढेल, असे आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आपल्या भाषणात सांगितले. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कोविड विषाणू प्रतिरोधासाठी या औषधाचा उपयोग होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज (DRL) चे अध्यक्ष कल्लम सतीश रेड्डी यांनी डीआरडीओ व आयएनएमएएस बरोबर या 2- DG औषध निर्मितीत सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डीआरएल या औषधांची उत्पादन क्षमता वाढवत असून जूनच्या पहिल्या आठवड्यात ते देशातील सर्व रुग्णालयांना उपलब्ध होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


* * *

S.Tupe/U.Raikar/D.Rane

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai    /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1719389) Visitor Counter : 52