विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत कोव्हॅक्सिन उत्पादनासाठी उत्पादन क्षमता वाढवायला सरकारचे  समर्थन

Posted On: 15 MAY 2021 6:21PM by PIB Mumbai

 

आत्मनिर्भर भारत 3.0 अभियानांतर्गत स्वदेशी कोविड प्रतिबंधक लसींचा विकास व उत्पादनाची  गती वाढवण्यासाठी केंद्र  सरकारकडून मिशन कोविड सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली.  नवी दिल्ली येथे जैव तंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) येथे  केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाकडून याची अंमलबजावणी केली जात आहे.

या मिशन अंतर्गत कोव्हॅक्सिनच्या  स्वदेशी उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी एप्रिल 2021 मध्ये केंद्र  सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने लसीची  उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी  लस उत्पादक सुविधांना अनुदान म्हणून आर्थिक सहाय्य दिले. सप्टेंबर, 2021 पर्यंत उत्पादन क्षमता दरमहा 10 कोटीपेक्षा अधिक होण्याची शक्यता  आहे.

या विस्तार योजनेचा एक भाग म्हणून, भारत बायोटेक लिमिटेड, हैदराबाद तसेच सार्वजनिक क्षेत्रातील इतर उत्पादकांच्या क्षमतांना आवश्यक पायाभूत सुविधा व तंत्रज्ञानाद्वारे उन्नत केले जात आहे.

खालील तीन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनाही लस उत्पादनाची क्षमता वाढवण्यासाठी सहाय्य पुरवले जात आहे.

1.  हाफकीन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई-महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत राज्य सरकारी उपक्रम.

 या सुविधेला उत्पादन निर्मितीसाठी सज्ज बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून 65 कोटी रुपये दिले जात आहेत. ही सुविधा एकदा कार्यान्वित झाल्यावर दर महिन्याला  20 दशलक्ष डोस निर्मितीची  क्षमता असेल.

2.  इंडियन इम्युनोलॉजिकल लिमिटेड (आयआयएल), हैदराबाद - राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या अंतर्गत या सुविधेला 60 कोटी रुपये देण्यात येत आहेत

3.  भारत इम्युनोलॉजिकल अँड बायोलॉजिकल लिमिटेड (बीआयबीसीओएल), बुलंदशहर या केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाअंतर्गत सार्वजनिक उपक्रमाला दरमहा 10-15 दशलक्ष लसीच्या मात्रा बनवण्यासाठी तयार केले जात आहे.

तसेच गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने हेस्टर बायोसायन्स आणि ओम्नीबीआरएक्ससह भारत बायोटेकबरोबर कोव्हॅक्सिन तंत्रज्ञान विस्तारासाठी आणि दरमहा किमान 20 दशलक्ष डोस तयार करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे.  सर्व उत्पादकांबरोबर तंत्रज्ञान हस्तांतरण कराराला अंतिम स्वरूप देण्यात  आले आहे.

डीबीटी बद्दलः विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी) कृषी, आरोग्यसेवा, प्राणी विज्ञान, पर्यावरण आणि उद्योग क्षेत्रात जैव तंत्रज्ञानाच्या वापराला  प्रोत्साहन देते. www.dbtindia.gov.in

बीआयआरएसी बद्दलः बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स काउन्सिल (बीआयआरएसी) एक ना-नफा कलम 8, शेड्यूल बी,सार्वजनिक उपक्रम  असून केंद्र सरकारच्या  बायोटेक्नॉलॉजी (डीबीटी) विभागाने  इंटरफेस एजन्सी म्हणून उदयोन्मुख बायोटेक कंपन्यांना बळकट व सक्षम  करण्यासाठी स्थापन केली आहे. www.www.birac.nic.in

अधिक माहितीसाठी: डीबीटी / बीआयआरएसी @DBTIndia@BIRAC_2012 च्या संपर्क संवाद विभागाशी संपर्क साधा

www.dbtindia.gov.inwww.birac.nic.in

***

Jaydevi PS/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1718845) Visitor Counter : 289