वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

ऑक्सिजनची उपलब्धता, वितरण आणि साठवणूक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने उचलली विविध पावले


उत्पादनक्षमता वाढवणे, पीएसए प्लांट आणि ऑक्सिजन काँसंट्रेटर्सची खरेदी अशा प्रयत्नांतून ऑक्सिजन उपलब्धतेत वाढ

ऑक्सिजन टँकर्सची उपलब्धता वाढवण्यासाठी नायट्रोजन आणि आर्गन टँकर्सचे रुपांतरण,आयात, देशांतर्गत उत्पादन आणि रेल्वे तसेच हवाई वाहतुकीच्या माध्यमातून प्रयत्न

ऑक्सिजन वाहतुकीवर निरंतर देखरेख ठेवण्यासाठी डिजिटल ट्रॅकिंग व्यवस्थेची निर्मिती

रुग्णालयातील क्रायोजनिक टँकर्सची संख्या आणि क्षमता वाढवून तसेच वैद्यकीय ऑक्सिजनच्या खरेदीतून पायाभूत सुविधा तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न

अत्यावश्यक वस्तूंच्या जलद खरेदीसाठी सामान्य वित्तीय नियमांत शिथिलता

Posted On: 10 MAY 2021 8:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 मे 2021

 

ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीनुसार पुरेसा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजनची उपलब्धता वाढवणे, वितरणात सुसूत्रता आणि ऑक्सिजन साठवणूक विषयक पायाभूत सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने विविध पावले उचलली आहेत.यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये संपूर्ण ऑक्सिजन पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. यात ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यावर भर देणे, टँकर्स उपलब्धता वाढवणे, अखेरच्या टोकापर्यंत ऑक्सिजन साठवणूक सुविधा सुधारणे आणि खरेदीसाठीच्या निकषांमध्ये शिथिलता देणे अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत

ऑक्सिजन उपलब्धता वाढवण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवली गेली आहे, प्रेशर स्विंग अॅडस्वोर्पशन (PSA) प्लांट्स उभारणे, परदेशातून द्रवरूप ऑक्सिजनचची आयात  आणि ऑक्सिजन काँसंट्रेटर्सची खरेदी अशा उपाययोजना करण्यात आल्या. टँकर्सची उपलब्धता वाढवणे आणि वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी नायट्रोजन आणि आर्गन टँकर्स चे रूपांतरण ऑक्सिजन टँकर्समध्ये करण्यात आले आहे.  टँकर्स आणि कंटेनर्सची आयात करण्यात आली आहे. देशांतर्गत टँकरनिर्मिती वाढवण्यात आली आहे. तसेच वाहतुकीचा वेळ वाचवण्यासाठी रेल्वे आणि हवाई मार्गाने वाहतूक केली जात आहे. ऑक्सिजन टँकर्सच्या व्यवस्थेवर निरंतर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी ऑक्सिजन डिजिटल ट्रॅकिंग व्यवस्थेची उभारणी करण्यात आली, एमएचव्ही ड्रायव्हर्सना प्रशिक्षण देऊन चालकांची उपलब्धता वाढवण्यात आली आहे. ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी क्रायोजनिक टँकर्सची संख्या आणि क्षमता वाढवण्यात आली असून वैद्यकीय ऑक्सिजन सिलेंडर्सची खरेदी केली जात आहे. महत्वाच्या वस्तूंची खरेदी सहज व्हावी यासाठी, सामान्य वित्तीय नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ऑक्सिजन उत्पादन, वाहतूक, साठवणूक आणि पायाभूत सुविधा यासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:--

ऑक्सिजन निर्मिती आणि क्षमता वृद्धीत वाढ

ऑक्सिजन खरेदी ऑगस्ट महिन्यात 5700 मेट्रिक टन/ दिवस पासून मे 2021 पर्यंत 9,446  मेट्रिक टन/ दिवस इतकी वाढवण्यात आली आहे. उत्पादन क्षमता प्रतिदिन 6817 मेट्रिक टन पासून 7314 प्रतिदिन मेट्रिक टनपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच क्षमतावापर  देखील 84 टक्क्यांपासून 129% पर्यंत वाढवण्यात आला आहे.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील पोलाद कंपन्यांनी  देखील वैद्यकीय ऑक्सिजनची देशाची गरज भागवण्यासाठी हातभार लावला आहे. 4 मे 2021 पासून पोलाद कंपन्यांनी द्रवरूप ऑक्सिजन उत्पादन निर्मिती क्षमता 3680.30 मेट्रिक टन इतकी होती. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा सरासरी एप्रिलच्या मध्यापर्यंत  1500 ते 1700 मेट्रिक टन इतका होता, तो 25 एप्रिल पर्यंत 3131.84 मेट्रिक टन आणि चार मे पर्यंत 4076.65 मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

संपूर्ण देशभरातून ‘एलएमओ’ला असलेली मागणी आणि या प्राणवायूची होत असलेली वाढती विक्री  लक्षात घेवून त्या अनुषंगाने उत्पादनामध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे.  देशात  मार्च 2021 मध्‍ये  मधील सुमारे 1300 मेट्रिक टन प्रतिदिनी ‘एलएमओ’ची विक्री होत असे; आता दिनांक 6 मे, 2021च्या आकडेवारीनुसार  8920 मेट्रिक टन प्रतिदिनी ‘एलएमओ’ची विक्री होत आहे.   कोविड-19 च्या पहिल्या लाटेच्या कालावधीत दिनांक 29 सप्टेंबर, 2020 रोजीच्या आकडेवारीनुसार ‘एलएमओ’ची कमाल 3095 मेट्रिक टन  विक्री झाली. एलएमओची विक्री दिनांक 31 मार्च 2021 रोजी 1559 मेट्रिकटन  झाली आहे. तर दिनांक 3 मे, 2021 रोजी 8000 मेट्रिक टनापेक्षाही जास्त एलएमओची विक्री झाली. हे प्रमाण मार्चच्या  तुलनेत पाच पट जास्त आहे.  

 

ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवण्याच्या योजना

नजीकच्या भविष्यात ऑक्सिजन उत्पादन क्षमता आणखी वाढविण्यासाठी  नियोजन करण्‍यात आले आहे. या संदर्भातील उपायांमध्ये कर्नाटकमध्‍ये प्रतिदिनी अतिरिक्त 70 मेट्रिकटन  प्राणवायूचे उत्पादन होईल, अशी अपेक्षा असून त्या  प्रकल्पाचा समावेश योजनेत केला आहे.  एसएमई क्षेत्राच्या ‘एअर सेपरेक्शन युनिट’ कडून पुरवठा करणे, 11,950 खाटांच्या मोठ्या रूग्णालयांसाठी  तेलशुद्धीकरण प्रकल्पांमार्फत वायूरूप प्राणवायू  पुरवणारे संयंत्र, ऊर्जा  प्रकल्पांकडून 3,850 खाटांच्या रूग्णालयांना  आणि पोलाद प्रकल्पांकडून  8,100 खाटांच्या रूग्णालयांना प्राणवायू पुरवठा करणारे प्रकल्प उभारण्‍यात येणार आहेत.  सध्‍याच्या काळात कमी आवश्यक औद्योगिक कारणांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास दिनांक 22 एप्रिल, 2021 पासून मनाई करण्‍यात आली आहे;  परिणामी 1,000 मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजनची  उपलब्धता होत आहे.  पोलाद  क्षेत्राद्वारे 630 मेट्रिकटन  प्रतिदिनीपुरवठा होवू शकेल अशा अतिरिक्त क्षमतेच्या विस्ताराची योजनाही आखण्‍यात आली आहे.

ऑक्सिजन पुरवठा कार्यात सुधारणा करण्‍यासाठी मागणी ‘क्लस्टर’ जवळ 1,594  पीएसए प्रकल्पांची स्थापना केली जात आहे. यातच 2020 मध्ये मंजूर केलेल्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या  माध्यमातून ‘पीएम-केअर्स’ अंतर्गत 162 प्रकल्प आणि मार्च 2021 मध्ये मंजूर झालेल्या पीएम-केअर्स अंतर्गत 551  प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच  27 एप्रिल 2021 रोजी पीएम-केअर्सअंतर्गत  डीआरडीओमार्फत 500 प्रकल्प उभारणीला  मंजूरी देण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत असलेल्या  तेल आणि वायू कंपन्यांनी जवळपास 100 पीएसए प्रकल्पांची स्थापना स्वत:हून करणार आहेत. तसेच मंजूर झालेल्या  पीएसएच्या 162 पैकी 74 प्रकल्पांची  स्थापना  केली  गेली  आहे आणि उर्वरित प्रकल्प  जून 2121 पर्यंत स्थापित केले जातील. मार्च आणि एप्रिल 2021 मध्ये पीएम केअर्स निधीतून  मंजूर झालेले अतिरिक्त 1,051  पीएसए प्रकल्प आगामी तीन महिन्यांत टप्प्याटप्प्याने सुरू करण्‍यात येणार आहेत.

 

द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूची  आयात

विदेशातून 50,000 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूची आयात केली जात आहे. यामध्‍ये 5,800 मेट्रिक टनची मागणी नोंदवून तो येणे तसेच त्याचे देशामध्ये  वितरण करणे या कामाचे नियोजन करून  वेळापत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने  परदेशातून ऑक्सिजनचे स्रोत मिळवून तो देशात आणण्‍यासाठी  सक्रिय मदत केली जात आहे. ही प्रक्रिया अधिक वेगवान करण्यात येत आहे. दिनांक  21.04.21 रोजी यासंदर्भात 3,500 मेट्रिक टनासाठी निविदा प्राप्त झाल्या; त्या मंजूर झाल्या  आहेत. आता  3 महिन्यांच्या आत प्राणवायू विदेशातून मिळू शकणार आहे.  या व्यतिरिक्त, युएई, बहारीन, कुवैत आणि फ्रान्समधून 2285 मेट्रिक टन एलएमओ आयात केला जात आहे.   या मागणीचा काही  भाग आधीच आला आहे.

 

ऑक्सिजन काँसंट्रेटर्सची खरेदी

पीएम केअर्स निधीतून एक लाख ऑक्सिजन काँसंट्रेटर्सची खरेदी करण्‍यासाठी दि. 27.04.2021 रोजी मंजूरी दिली आहे. यासंदर्भात 29.04.21 रोजी  अभिव्यक्ती स्वारस्य सूचना जारी केली गेली आणि 2,500 युनिटसाठी ‘ऑफर’ प्राप्त झाली आहे. ओएनजीसीने काढलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. देशांतर्गत उत्पादकांकडून 50,000  काँसंट्रेटर्ससाठी  ऑफर प्राप्त झाल्या आहेत. यापैकी दिनांक 15.05.2021 रोजी 4800 युनिटचे वितरण होणार आहे. या वेळापत्रकानुसार आणखी 5000 युनिटसचे वितरण दिनांक 27.05.2021 रोजी होणार आहे. या व्यतिरिक्त, 55 निविदा दाखल करणा-यांनी 70,000 ते 75,000 युनिट्सचा  पुरवठा करण्यासाठी  स्वारस्य दर्शविले आहे. या निविदांच्या पूर्ततेसंबंधी आवश्‍यक असणारे अंतिम कार्य केले जात आहेत आणि निविदा भरणा-यांनी दिलेले  आश्वासन वेळेवर पूर्ण करावे यासाठी  वितरण वेळापत्रक निश्चित केले जात आहे.

 

ऑक्सिजन वितरण प्रक्रिया

सर्व राज्यांना त्यांच्या मागणीनुसार समानशील प्रमाणात प्राणवायू पुरवठा करता येण्यासाठी ऑक्सिजन वितरण प्रणाली प्रस्थापित करण्यात आली आहे. 15.04.21 रोजी काढण्यात आलेला पहिला ऑक्सिजन वितरण आदेश महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्यप्रदेश, कर्नाटक इत्यादी काही राज्यांपुरताच मर्यादित होता. मात्र साथीची दुसरी लाट इतर राज्यांमध्ये पसरू लागल्यावर, इतर राज्यांमध्येही प्राणवायूची मागणीही वाढत गेली. प्रत्येक राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येक राज्याच्या ऑक्सिजन गरजेचा अंदाज बांधण्यासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सूत्र वापरण्यात आले. आणि त्या-त्या राज्याच्या अंदाजित गरजेनुसार त्या राज्याला ऑक्सिजन वितरित करण्यासाठी अधिकाधिक परिश्रम घेतले गेले. या वितरणाला अंतिम स्वरूप देण्यासाठी रुग्णालयांची उपलब्धता, अतिदक्षता विभागातील खाटांची उपलब्धता अशा अन्य घटकांचाही विचार करण्यात आला.

देशातील प्राणवायूचे वाटप सुरळीतपणे करण्याच्या दृष्टीने ऑक्सिजन वितरण प्रक्रिया सातत्याने विकसित होत गेली आहे. राज्ये/ केंद्रशासित प्रदेशाना होणारे ऑक्सिजन वितरण गतिशील असून, आरोग्य मंत्रालयाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक राज्याच्या गरजेवर ते आधारित आहे. तसेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी, उत्पादकांशी आणि अन्य संबंधित घटकांशी सल्लामसलत करून ते ठरविण्यात आले आहे. उत्पादन करणारी राज्ये व उपभोग घेणारी राज्ये यांमध्ये मेळ बसत नसूनही राज्यांमध्ये समानशीलता सांभाळली गेली पाहिजे. त्याखेरीज, एक तृतीयांश उत्पादन पूर्व भारतात एकवटले आहे. तर ऑक्सिजनची ~60% मागणी उत्तर आणि दक्षिण भारताकडून येत आहे. परिणामी वाहतूकविषयक आव्हानेही मोठी आहेत. प्राणवायू निर्मिती करणारी केंद्रे व तो वाहून नेण्याची उपयोगाची केंद्रे एकमेकांशी जोडून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांशी, उत्पादकांशी आणि अन्य भागीदारांशी सल्लामसलत करण्यात आली आहे.

Zone

Production

Allocation

MT

%

MT

%

North

1,174

13%

2,897

33%

East

2,867

32%

1,035

12%

West

2,838

32%

2,688

30%

South

1,980

22%

2,239

25%

Total

8,859

100%

8,859

100%

 

ऑक्सिजन टँकर्सच्या उपलब्धतेत वाढ- टँकर्सचे रूपांतर व आयात

टँकर्सची उपलब्धता वाढविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. टँकर्सची आयात करून तसेच नायट्रोजन व आरगॉनच्या टँकर्सचे रूपान्तर करून ऑक्सिजनवाहक टँकर्सची उपलब्धता वाढविण्यात येत आहे. मार्च 2020 मध्ये टँकर्सची क्षमता 12,480 मेट्रिक टन आणि त्यांची संख्या 1040 इतकी होती. आता टँकर्सची क्षमता वाढून 23,056 मेट्रिक टन झाली आहे, तर त्यांची संख्या 1681 पर्यंत पोहोचली आहे. यामध्ये 408 रुपान्तरित टँकर्स आणि 101 आयात टँकर्सचा समावेश आहे. आतापर्यंत नायट्रोजन व आरगॉनची वाहतूक करणाऱ्या 1,105 टँकर्सपैकी 408 टँकर्स, प्राणवायूची वाहतूक करणाऱ्या टँकर्समध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. तसेच, आणखी 200 टँकर्सचे रूपान्तर लवकरच केले जाणार आहे. 248 ऑक्सिजन टँकर्सची आयात केली जात आहे. येत्या दहा दिवसात 58 टँकर्सची आयात होत आहे. त्याशिवाय, 100 टँकर्सचे देशांतर्गत उत्पादन होत आहे.

 

वाहतुकीचा वेळ कमी करण्यासाठी ऑक्सिजन टँकर्सची रेल्वेने आणि विमानाने वाहतूक

रो-रो म्हणजे रोल ऑन- रोल ऑफ सुविधा वापरून ऑक्सिजन टँकर्स दूरवर वाहून नेण्यासाठी रेल्वेचा उपयोग करून घेतला जात आहे. आतापर्यंत भारतीय रेल्वेने 268 पेक्षा अधिक टँकर्समधून सुमारे 4200 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू विविध राज्यांपर्यंत पोहोचविला आहे. तसेच आजवर 68 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांनी आपला प्रवास पूर्ण केला आहे. 9 मे च्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात 293 मेट्रिक टन, उत्तरप्रदेशात 1,230 मेट्रिक टन, मध्यप्रदेशात 271 मेट्रिक टन, हरयाणात 555 मेट्रिक टन, तेलंगणात 123 मेट्रिक टन, राजस्थानात 40 मेट्रिक टन आणि दिल्लीत 1,679 मेट्रिक टन प्राणवायू पोहोचला आहे.

रिकाम्या ऑक्सिजन टँकर्स कंपनीपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून हवाई मार्गाने या टँकर्सची वाहतूक केली जात आहे. वैद्यकीय वापरासाठीच्या द्रवरूप ऑक्सिजनची देशांतर्गत मार्गांवरून वाहतूक करणाऱ्या  5505 मेट्रिक टन क्षमतेच्या रिकाम्या  282 टँकर्सची हवाई मार्गाने वाहतूक करण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी परदेशातून 1293 मेट्रिक टन क्षमतेचे 75 कंटेनर्स देशात आणले. त्याचबरोबर, 1252 ऑक्सिजन सिलेंडर्स, 3 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे भारतीय हवाई दलाच्या मदतीने आयात करण्यात आली आहेत.

 

ऑक्सिजन डिजिटल ट्रॅकिंग यंत्रणा

देशात ऑक्सिजनच्या वाहतुकीची वास्तविक माहिती मिळविण्यासाठी वेब आणि अॅप वर आधारित ऑक्सिजन डिजिटल ट्रॅकिंग यंत्रणा (ODTS) सुरु करण्यात आली आहे. ऑक्सिजननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ऑक्सिजनच्या नोंदणीची आणि ऑर्डर पूर्ण झाल्याची  परिणामकारक आणि त्वरित माहिती देणे आणि कंपन्यांकडून राज्यांकडे ऑक्सिजन वाहून नेतानाची वास्तविक माहिती करून घेणे ही या यंत्रणेची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत. यामध्ये, ई-वे बिल आधारित GSTN ची माहिती, जीपीएस यंत्रणेद्वारे टँकर्सच्या प्रवासाचा माग ठेवणे, सीम(चालकाचा मोबाईलक्रमांक), फास्टॅग आणि मार्ग बदलणे,कारणाशिवाय थांबणे आणि प्रवासाला उशीर करणे यासाठी स्वयंचलित धोक्याच्या घंटेचा यात समावश आहे.

त्याशिवाय,आभासी केंद्रीकृत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यात केंद्रीय आरोग्य,रस्ते विभाग, रेल्वे विभाग,औद्योगिक जगत,पोलाद मंत्रालयाचे अतिरिक्त/सह सचिव आणि राज्य सरकारांचे अधिकारी यांचा समावेश आहे. ऑक्सिजन वाहतुकीतील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी हा नियंत्रण कक्ष ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांच्या हालचालींवर अहोरात्र लक्ष ठेवून आहे.   

 

ऑक्सिजन टँकर्स चालविण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देणे

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि मालवाहतूक क्षेत्र कौशल्य मंडळ यांच्यातर्फे 2,500 अतिरिक्त चालकांना ऑक्सिजन टँकर्स चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.विनाअडथळा ऑक्सिजनची वाहतूक होण्यासाठी कुशल चालकांची उपलब्धता आवश्यक आहे. वैद्यकीय वापरासाठीचा द्रवरूप ऑक्सिजन हा धोकादायक रसायने नियमांच्या अंतर्गत येत असल्याने फक्त पुरेसे प्रशिक्षण घेतलेल्या आणि HAZ Cargo license परवाना  असलेल्या चालकांनाच ऑक्सिजन वाहून नेणारे ट्रक चालविण्याची परवानगी असते. NSDC आणि LSSC कडून अनुक्रमे इंग्रजी आणि हिंदी भाषेत प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित करण्यात आला असून 20 तज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.सक्रीय नसलेल्या चालकांसाठी धोकादायक रसायने असलेले ट्रक चालविण्याची माहिती देणाऱ्या ऑनलाईन रिफ्रेशर कोर्सचे नियोजन करण्यात आले आहे. ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या ठिकाणी चालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याच्या हेतूने 73 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.   

 

ऑक्सिजनची साठवण वाढविण्यासाठी क्रायोजेनिक टँक्स

मार्च 2020 मध्ये ऑक्सिजन साठवणुकीसाठी 609 क्रायोजेनिक टँक उपलब्ध होते त्यांची संख्या वाढवून आता 901 करण्यात आली आहे. ऑक्सिजन सिलेंडर्सची संख्या मार्च 2020 मध्ये 4.35 लाख होती ती आता वाढवून मे 2021 मध्ये 11.19 लाख करण्यात आली आहे. वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन  अतिरिक्त 3.35 लाख सिलेंडर्स खरेदी करण्यात येत आहेत. त्याशिवाय 21 एप्रिल 2021 ला  1,27,000 अतिरिक्त सिलेंडर्सची मागणी नोंदवण्यात आली आहे.पीएम निधीतून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था 10 लाख एनआरएम व्हॉल्वची खरेदी करणार आहे- हे साधन उच्छ्वासाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन वाया जाऊ नये म्हणून ऑक्सिजनचा पुरवठा थांबवते.

 

महत्त्वाच्या सामानाची जलद खरेदी करण्यासाठीचे उपाय

महत्त्वाच्या सामानाची खरेदी जलदगतीने होण्यासाठी सामान्य आर्थिक नियम शिथिल करण्यात आले असून कोविड व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या सामानाची खरेदी शक्य होणार आहे. मोठ्या प्रमाणावर सहभाग आणि जलद खरेदीसाठी सर्व निर्बंधात्मक तरतुदी हटविण्यात आल्या आहेत.सर्व खरेदीसाठी आवश्यक बॅंक हमीच्या नियमात सवलत देण्यात आली आहे. महत्त्वाच्या कोविड संबंधित खरेदीची किंमत  100% आगाऊ भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अडचणीतील पुरवठा बाजारासाठी नामनिर्देशन आधारित खरेदीला परवानगी देण्यात आली आहे.

 

* * *

MC/RA/SB/JW/SC/DR

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1717526) Visitor Counter : 448