विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारताच्या पहिल्या सौर अवकाश अभियानातून मिळालेला डेटा समुदाय सेवा केंद्राच्या माध्यमातून विश्लेषणासाठी उपलब्ध होणार

Posted On: 27 APR 2021 1:21PM by PIB Mumbai

भारताच्या पहिल्या समर्पित सौर अवकाश अभियानातून मिळालेला डेटा –म्हणजेच माहिती आणि आकडेवारी संकलित करून ती वेबच्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एका विशेष समुदाय सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यावर वापरकर्त्याचा लगेच संपूर्ण डेटा आणि या अभियानाशी संबंधित रोचक वैज्ञानिक तथ्ये वाचता येतील.


आदित्य-एल वन सपोर्ट सेल (AL1SC) असे नाव असलेले हे सेवा केंद्र आणि इस्त्रो आणि आर्यभट्ट निरीक्षण विज्ञान संशोधन संस्था - ARIES या स्वायत्त संस्थेच्या संयुक्त प्रयत्नांतून साकार झाले आहे. या केंद्राचा वापर निरीक्षकांना वैज्ञानिक डेटाचे विश्लेषण करण्यासाठी होऊ शकेल.

आर्यभट्ट संस्थेच्या हल्दवाणी, उत्तराखंड, इथल्या परिसरात AL1SC ची स्थापना करण्यात आली असून या वैज्ञानिक डेटाचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी ही संस्था इस्त्रोसोबत आदित्य-एल वन अभियानासाठी काम करेल.

आदित्य एल-वन अभियानात सहभागी असलेला चमू आणि सौर अवकाश संशोधन समुदाय तसेच या डेटाचा वापर करणारे (विद्यार्थी/संशोधक/विद्यापीठे) यांच्यात समन्वय आणि दुवा साधण्याचे काम हे केंद्र करेल. संशोधक किंवा निरीक्षकांना, आदित्य अभियानाच्या प्रस्तावांचे निरीक्षण करण्यासाठी मदत व्हावी यासाठी या केंद्रात काही विशिष्ट उपकरणे देखील लावली जातील. तसेच इस्त्रोला देखील विश्लेषण सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी या केंद्राची मदत होऊ शकेल.


त्याशिवाय जगभरात सुरु असलेल्या अशाप्रकारच्या अभियानांची माहिती देखील या केंद्रात उपलब्ध होईल जेणेकरुन आदित्य- एल वन कडून मिळालेल्या माहितीस ती पूरक ठरू शकेल. यामुळे वैज्ञानिकांना आदित्य अभियानाच्या क्षमतेबाहेर असलेल्या वैज्ञानिक उद्दिष्टांसाठीही अध्ययन करता येईल.

या केंद्राद्वारे आदित्य-एल वन अभियान केवळ भारतापुरतेच मर्यादित न राहता, या अभियानाची प्रगती आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनुभवता येईल.

 

***

ST/RA/CY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1714330) Visitor Counter : 163