पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्याशी दूरध्वनीद्वारे साधला संवाद
Posted On:
26 APR 2021 10:32PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर.बिडेन यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला.
भारतात लसीकरण मोहीम, अत्यावश्यक औषधांच्या तसेच उपचारपद्धती आणि वैद्यकीय साधनांच्या सुविहित पुरवठ्याची सुनिश्चिती यांच्यासह देशात सध्या आलेल्या कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांसह, दोन्ही नेत्यांनी आपापल्या देशातील कोविड-19 महामारीच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली.
राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी भारतासोबतच्या एकात्मतेच्या भावनेचा उल्लेख केला आणि भारताच्या प्रयत्नांना पाठींबा देण्यासाठी उपचारपद्धती तसेच व्हेन्टिलेटर्स यासारख्या साधनांची मदत करण्यासोबत कोविशिल्ड लसीच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्च्या माल उपलब्ध करून देण्याचे स्त्रोत शोधण्यासाठी अमेरिका कटिबद्ध आहे, याचा उल्लेख केला.
यासंदर्भात मदत आणि पाठिंब्यासाठी अमेरिकेच्या सरकारकडून देऊ करण्यात आलेल्या प्रस्तावाचे पंतप्रधानांनी मनःपूर्वक कौतुक केले. लस-मैत्री आणि कोवॅक्स तसेच क्वाड लस उपक्रमातील भारताचा सहभाग यांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर कोविड-19 महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या भारताच्या वचनबद्धतेचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कोविड-19 शी संबंधित लसी, औषधे आणि उपचारासाठी आवश्यक इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल आणि संबंधित गोष्टींच्या पुरवठा साखळीचे खुल्या आणि सुलभ पद्धतीने परिचालन सुनिश्चित करण्याची गरज पंतप्रधानांनी या संभाषणादरम्यान बोलताना अधोरेखित केली.
दोन्ही नेत्यांनी कोविड-19 महामारीला तोंड देण्यासाठी लस विकसित करणे आणि त्याचा पुरवठा करणे या प्रक्रियेतील भारत-अमेरिका भागीदारीच्या क्षमतांची संभाव्यता अधोरेखित केली आणि यासंदर्भात दोन्ही देशांत सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये संपूर्ण समन्वय आणि सहकार्य राखण्याचे आदेश आपापल्या देशातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विकसनशील देशांना लसी आणि औषधे जलदगतीने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्याची सुनिश्चिती करण्यासाठी ट्रिप्स अर्थात बौद्धिक संपदा हक्कांबाबत व्यवसाय संबंधी दृष्टिकोनाबाबतच्या करारातील अटी शिथिल करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेकडे मागणी करण्याच्या भारताच्या मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना माहिती देखील दिली.
दोन्ही नेत्यांनी नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले.
*****
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1714301)
Visitor Counter : 308
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam