संरक्षण मंत्रालय

कोविड 19 रुग्णांमध्ये सध्या झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर एएफएमएस जर्मनीवरून ऑक्सीजन निर्मिती करणारी संयंत्र आयात करणार


संरक्षण मंत्रालयाकडून एएफएमएसमधील शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या डॉक्टरांना 31 डिसेंबर, 2021 पर्यंत मुदतवाढ

Posted On: 23 APR 2021 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 एप्रिल 2021

 

देशात कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान  रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना एएफएमएस अर्थात संरक्षण दलांच्या वैद्यकीय सेवा संस्थेने   जर्मनीहून ऑक्सीजन निर्मिती करणारी संयंत्र आणि कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीवरून तेवीस फिरती ऑक्सिजन निर्मिती संयंत्र हवाई मार्गाने आणली जाणार असून  संरक्षण दलांच्या वैद्यकीय सेवा संस्थेच्या रुग्णालयांमध्ये ही सयंत्र तैनात करून कोविड रुग्णांना ऑक्सीजन पुरवला जाणार आहे.

दर मिनिटाला 40 लिटर्स आणि प्रति तास 2,400  लिटर्स ऑक्सीजन निर्मिती करण्याची प्रत्येक संयंत्राची क्षमता आहे. त्यानुसार 20 ते 25 रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. या संयंत्रांचा फायदा असा की, ते सहजपणे एका जागेवरून दुसरीकडे हलवता येऊ शकतात. ही ऑक्सिजन उत्पादन संयंत्र आठवडाभरात भारतात दाखल होण्याची अपेक्षा आहे.

दुसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे, वैद्यकीय सेवांच्या वाढत्या मागणीच्या दृष्टीने, शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर कार्यरत असलेल्या डॉक्टरांना संरक्षण दलांच्या वैद्यकीय सेवेत त्यांच्या निर्धारित मुदतीनंतरही कार्यरत ठेवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने डिसेंबर 31, 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे संरक्षण दलाच्या वैद्यकीय सेवा संस्थेकडे आणखी 238 डॉक्टर उपलब्ध होतील.

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1713595) Visitor Counter : 169