आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्धतेबाबत टोकाची परिस्थिती उद्भवू नये यासाठी अधिकारप्राप्त गट 2 ने उचलली पावले

Posted On: 15 APR 2021 3:54PM by PIB Mumbai

 

कोविड बाधित रुग्णांवरच्या उपचारात वैद्यकीय ऑक्सिजन हा महत्वाचा घटक आहे. कोविड महामारीत बाधित राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनसह अत्यावश्यक वैद्यकीय साधने यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मार्च 2020 मध्ये आंतर मंत्रालयीन अधिकारप्राप्त अधिकारी गट (ईजी2) स्थापन करण्यात आला. औद्योगिक आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव डॉ गुरुप्रसाद मोहपात्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या गटात आरोग्य आणि कुटुंब कल्याण  मंत्रालय,वस्त्रोद्योग, आयुष,सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, यासह विविध मंत्रालये आणि विभागांच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

बाधित राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनसह अत्यावश्यक वैद्यकीय साधनांचा सुरळीत पुरवठा राहावा यासाठी  ईजी 2 गेल्या वर्षभरापासून सातत्याने लक्ष ठेवून असून वेळोवेळी उद्भवणाऱ्या आव्हानांची  दखल घेऊन त्यांचे निराकरण करत आहे. कोविड रुग्णाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवरराज्यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ईजी 2 सातत्त्याने राज्ये, ऑक्सिजन उत्पादक आणि इतर संबंधीताशी बैठका आणि संवाद साधत आहे.देशात पुरेशी म्हणजे सुमारे 7127 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे आणि पोलाद कारखान्यात उपलब्ध अतिरिक्त  ऑक्सिजनचाही  वापर करण्यात येत आहे. देशात दररोज सुमारे 7127 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाची क्षमता आहे. 12 एप्रिल 2021 ला देशात 3842 मेट्रिक टन म्हणजे दैनिक उत्पादन क्षमतेच्या 54 टक्के वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर झाला. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली आणि त्यानंतर छत्तीसगड, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये वैद्यकीय ऑक्सिजनचा मोठा वापर होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय ऑक्सिजनचा वापर आणि  राज्यांची आवश्यकता यांचा ताळमेळ आवश्यक आहे. देशात सध्या उत्पादन कारखान्याकडे उपलब्ध औद्योगिक ऑक्सिजनसह 50,000  मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन उपलब्ध आहे. ऑक्सिजन उत्पादन युनिटची वाढवण्यात आलेली उत्पादन क्षमता आणि उपलब्ध अतिरिक्त साठा लक्षात घेता  सध्या ऑक्सिजन उपलब्धता पुरेशी आहे.

बाधित राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी ईजी 2 ने अनेक पावले उचलली आहेत

..ऑक्सिजन उत्पादन कारखान्यांची उत्पादन क्षमता वाढवणे, यामुळे 100 टक्के ऑक्सिजन उत्पादन साध्य करण्यात येत असल्याने देशाच्या ऑक्सिजन उपलब्धतेत वाढ होत आहे. 

..पोलाद कारखान्यात उपलब्ध अतिरिक्त साठ्याचा वापर

.. ऑक्सिजनची जास्त गरज असलेल्या राज्यांची आवश्यकता आणि राज्याच्या सीमेजवळील स्त्रोतासह पोलाद कारखान्यात उपलब्ध ऑक्सिजनसहित ऑक्सिजन स्त्रोत यांचे ठिकाण लक्षात घेऊन त्याचे मॅ पिंग  करावे. यामुळे महाराष्ट्राला डोलवी इथल्या जेएसडब्ल्यू पोलाद कारखानाछत्तीसगडमधल्या भिलाईतल्या एसएआयएल आणि कर्नाटक मधल्या बेलारी इथल्या जेएसडब्ल्यू मधून अतिरिक्त ऑक्सिजन  दररोज घेता येईल.

.. ऑक्सिजनची कमी आवश्यकता असलेल्या राज्यांकडून, ऑक्सिजनची  जास्त गरज असलेल्या राज्यांकडे त्याची वाहतूक हे सध्या आव्हान आहे.

..द्रवीभूत वैद्यकीय ऑक्सिजन टॅन्करची वाहतूक सुलभ होण्यासाठी रेल्वे मंत्रालयासह  रस्ते आणि वाहतूक मंत्रालया अंतर्गत उप- गट  स्थापन करण्यात आला आहे. ऑक्सिजन टॅन्करची रेल्वे द्वारे वाहतूक करण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात येत आहे.

 ऑक्सिजन टॅन्करची वाहतूक सुरळीत राहावी यासाठी घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय याप्रमाणे-

- ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी   नायट्रोजन टॅन्करचा वापर करण्यासाठी पेट्रोलियम आणि सुरक्षा संस्थेला आदेश देण्यात आले आहेत.

- दुसऱ्या राज्यात नोंदणी शिवाय ऑक्सिजन टॅन्करची आंतर- राज्य वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाची मदत

- सिलेंडरचे राज्य निहाय मॅपिंग आणि शुद्धीकरण केल्यानंतर औद्योगिक सिलेंडरचा वैद्यकीय ऑक्सिजनसाठी वापर करायला परवानगी देण्यात आली आहे.

- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आणखी एक लाख ऑक्सिजन सिलेंडरच्या खरेदीसाठी मागणी नोंदवण्यात आली आहे.

- पीएम- केअर्स अंतर्गत मंजूर करण्यात आलेले पीएसए कारखाने लवकर पूर्ण व्हावेत यासाठी बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

- डीपीआयआयटी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि पोलाद मंत्रालय यांच्यासह ऑक्सिजनची जास्त गरज असलेली राज्ये यांच्या समवेत दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

- ऑक्सिजन उत्पादकही या बैठकांना उपस्थित राहतात.

 ईजी 2 च्या निर्देशानुसार, बाधित राज्यांना  वैद्यकीय ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा राहावा यासाठी  या स्त्रोतांचे दररोज तपशीलवार मॅपिंग तयार करण्यात येत आहे.

वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणीत असाधारण वाढ झाली आहे त्याच वेळी 30.04.2021 ला काही राज्यात  ऑक्सिजनच्या अंदाजित मागणीतही मोठी वाढ  झाल्याचे या चर्चे दरम्यान लक्षात आले आहे. ऑक्सिजनच्या तर्कसंगत वापरासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. इजी2  वैद्यकीय ऑक्सिजनच्या मागणी आणि पुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून  वैद्यकीय ऑक्सिजनच्या विना व्यत्यय पुरवठ्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1712011) Visitor Counter : 299