भारतीय निवडणूक आयोग

भारताचे चोविसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुशील चंद्र यांनी स्वीकारला पदभार


भारतीय निवडणूक आयोगाने सुनील अरोरा यांना दिला निरोप

Posted On: 13 APR 2021 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2021

भारताचे चोविसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून श्री.सुशील चंद्र यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 12 एप्रिल 2021 रोजी पदमुक्त झाले.

चंद्र हे 15 फेब्रुवारी 2019 पासून आयोगामध्ये निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्याखेरीज 18 फेब्रुवारी 2019 पासून ते डिलिमिटेशन कमिशन म्हणजे मतदारसंघ  पुनर्रचना आयोगाचे सदस्य म्हणूनही काम करीत आहेत. जम्मू काश्मीर केंद्रसशासित प्रदेशाच्या  मतदार संघ पुनर्रचनेची जबाबदारी त्यांच्या शिरावर आहे. गेल्या जवळपास 39 वर्षांपासून प्राप्तिकर विभागात विविध पदांच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे चंद्र, 1 नोव्हेंबर 2016 – 14 फेब्रुवारी 2019 या काळात  CBDT म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्षही होते.

CBDT चे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत असल्यापासूनच चंद्र यांनी निवडणुकांमध्ये बेकायदेशीरपणे खेळणाऱ्या पैशाची प्रकरणे उकरून काढण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. 'आमिष-विरहित निवडणुका' या संकल्पनेवर त्यांनी कायमच भर दिला असून, आगामी तसेच चालू असलेल्या अशा सर्वच निवडणुकांच्या बाबतीत निवडणूक प्रक्रियेवर देखरेख करण्याचा तो एक महत्त्वाचा पैलू ठरला आहे.

आज महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये स्थान असलेल्या 'फॉर्म-26' सह अनेक व्यवस्थात्मक बदलांमध्ये त्यांचे योगदान अमूल्य आहे. उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी भरलेल्या शपथपत्रांच्या पडताळणीसारख्या विषयांतही CBDT चे अध्यक्ष म्हणून चंद्र यांनी विशेष लक्ष घातले. 2018 मध्ये, CBDT  चे अध्यक्ष असताना त्यांनी, अपूर्व योगदान दिलेला आणखी एक विषय आहे- तो म्हणजे- उमेदवारांनी शपथपत्रात उल्लेख न केलेल्या सर्व मालमत्ता आणि कर्जाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेला एक सामायिक आराखडा. निवडणूक व्यवस्थेत अभिनव पद्धतीने माहिती तंत्रज्ञानाचा वापर, हे 2019 मधील 17 व्या लोकसभा निवडणुकीकरिता तसेच विधानसभा निवडणुकांकरिता चंद्र यांनी दिलेल्या योगदानाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

भारतीय निवडणूक आयोग परिवाराने मावळते मुख्य निवडणूक आयुक्त श्री.सुनील अरोरा यांना 12 एप्रिल 2021 रोजी सस्नेह निरोप दिला. आयोगामध्ये 43  महिने काम केल्यावर आणि मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुमारे 29 महिन्यांची कारकीर्द पूर्ण केल्यावर ते पदमुक्त झाले. त्यांच्या कार्यकाळात 2019 मध्ये 17 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. तसेच सप्टेंबर 2017 मध्ये निवडणूक आयोगात काम सुरु केल्यापासून 25  विधानसभा  राज्यांच्या निवडणुकाही पार पडल्या.

अरोरा यांना निरोप देताना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, अरोरा यांच्या कार्यकाळात आयोगाने सुरु केलेल्या विविध विशेष उपक्रमांचा उल्लेख केला. उदा.- ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांग मतदारांना टपालाने मत पाठविण्याच्या सुविधेचा पर्याय, इंडिया-ए वेब केंद्राची स्थापना इ.

सुनील अरोरा यांनी मनोगत व्यक्त करताना आयोगाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले व भविष्यातील सर्व निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. "कोरोना साथीच्या काळात बिहार विधानसभा निवडणूक घेण्याचा निर्णय ही सर्वात कठीण अशी कसोटीची वेळ होती", असेही ते म्हणाले.

 

 

Jaydevi PS/S.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1711531) Visitor Counter : 29791