संरक्षण मंत्रालय

लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे बांगलादेश दौर्यासाठी रवाना झाले

Posted On: 08 APR 2021 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 एप्रिल 2021

 

भारत आणि बांगलादेश यांच्यातील  मजबूत द्विपक्षीय आणि संरक्षण संबंधांची उत्कृष्ट परंपरा सुरु ठेवत लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे 08 ते 12 एप्रिल 2021 दरम्यान बांगलादेश दौर्यासाठी रवाना झाले आहेत. बांग्लादेश मुक्ती संग्रामाला  50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त स्वर्णिम विजय वर्ष समारंभाच्या पार्श्वभूमीवर   जनरल नरवणे यांचा हा दौरा आहे. बंगबंधू  शेख मुजीबुर रहमान यांचे ऐतिहासिक नेतृत्व आणि भारतीय सशस्त्र सैन्यासह खांद्याला खांदा लावून लढणार्या मुक्ति बाहिनीच्या  शौर्यामुळे बांगलादेश मुक्त झाला.

लष्करप्रमुख 8 एप्रिल  2021 रोजी शिखा अनिर्बन येथे पुष्पहार अर्पण करून मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर बांगलादेशच्या सशस्त्र दलाच्या तीन सेवा प्रमुखांशी स्वतंत्र  बैठक होईल.  जनरल नरवणे हे धानमंडी येथील राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबुर रहमान स्मृती  संग्रहालयालाही भेट देतील, तेथे ते बांगलादेशच्या संस्थापकांना  श्रद्धांजली वाहतील.

लष्करप्रमुख  11 एप्रिल 2021 रोजी ढाका येथील बांगलादेश सैन्याच्या बहुउद्देशीय संकुलात  बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संवाद साधतील  आणि तेथे ते संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सहकार्य  मोहिमेवरील  चर्चासत्रात भाग घेतील आणि “जागतिक संघर्षाचे बदलते स्वरूप: संयुक्त राष्ट्र शांतीसेनेची भूमिका” या विषयावर मुख्य भाषण देतील.

जनरल एम.एम. नरवणे हे माली, दक्षिण सुदान आणि मध्य आफ्रिकन रिपब्लिक मधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांचे  फोर्स कमांडर्स आणि रॉयल भूतानी सैन्याचे उप-मुख्य संचालन  अधिकारी यांच्याशी  12 एप्रिल 2021 रोजी संवाद साधणार आहेत. ते समारोप समारंभालाही उपस्थित राहतील. ते संयुक्त राष्ट्र ,भारत, बांग्लादेश, भूतान आणि श्रीलंकेच्या  सशस्त्र सैन्यासह अमेरिका, ब्रिटेन, तुर्की आणि सौदी अरेबियाच्या  पर्यवेक्षकांसह  शांतीर ओग्रोसेना,या  संयुक्त राष्ट्रच्या अनिवार्य  बहुपक्षीय दहशतवादविरोधी सरावात उपस्थित राहतील.  हार्डवेअर डिस्प्ले दरम्यान बांगलादेशी सशस्त्र दलाच्या जवानांच्या नवसंशोधनाची पाहणी करतील.

लष्करप्रमुख दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात बांगलादेश इन्स्टिट्यूट ऑफ पीस सपोर्ट अँड ट्रेनिंग ऑपरेशन्स (बिप्सोट) च्या सदस्यांशी संवाद साधतील.

या भेटीमुळे दोन्ही सैन्यामधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि सामरिक विषयांवर दोन्ही देशांमध्ये सुसंवाद व सहकार्यासाठी उत्प्रेरक ठरेल.


* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1710480) Visitor Counter : 256