पंतप्रधान कार्यालय

श्री गुरु तेगबहादूर जी यांच्या 400 व्या जन्मशताब्दी (प्रकाश पर्व) सोहळ्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक

Posted On: 08 APR 2021 3:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री गुरू तेग बहादुर जी यांचा 400वा जन्मशताब्दीसोहळा (प्रकाश पर्व) निमित्त विचारविनिमयासाठी  दूरदृश्यप्रणालीद्वारे उच्चस्तरीय समितीची बैठक झाली.

 

श्री गुरू तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या आयोजनासाठी दूरदृष्टी दाखवल्याबद्दल बैठकीत सहभागी झालेल्यांनी पंतप्रधानांना धन्यवाद दिले. श्री गुरु तेग बहादूर यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान आणि त्याग याचे स्मरण यावेळी करण्यात आले. बैठकीत सहभागी सदस्यांनी जन्मशताब्दी सोहळ्यासाठी काही सूचना आणि माहिती दिली, त्याचप्रमाणे त्यांच्या जीवन चरित्रातील महत्वाच्या गोष्टी या निमित्ताने अधोरेखित करणे महत्त्वाचे असल्याचेही सांगितले. श्री गुरू तेग बहादुर जी यांचा संदेश सर्वांपर्यंत पोचवला जाण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले गेले पाहिजेत असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सांस्कृतिक सचिवांनी या सोहळ्यासाठी आत्तापर्यंत आलेल्या सूचनांवर आधारित प्रेझेटेशन यावेळी दिले.

बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी सहभागी झालेल्यांना त्यांच्या सूचनांबद्दल धन्यवाद दिले. श्री गुरू तेग बहादुर यांचा 400 व्या प्रकाश पर्वचे संस्मरण हे धार्मिकच नव्हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले. श्री गुरू तेग बहादुर जी यांच्या जीवनातून आपण बरेच काही शिकलो असे सांगत प्रत्येकाने त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी असे ते म्हणाले. त्यांची शिकवण तरुण पिढीला सांगितली गेली पाहिजे तसेच त्यांचा संदेश संपूर्ण विश्वातील तरुण पिढीपर्यंत जाण्यासाठी डिजिटल मार्गांचा अवलंब केला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

शीख गुरुपरंपरा ही पूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. गुरू नानक देव जी यांचा साडेपाचशेवा प्रकाश पर्व,  गुरू तेगबहादूरजी यांचा चारशेवा प्रकाश पर्व आणि श्री गुरू गोविंद सिंगजी यांचा साडेतीनशेवा प्रकाश पर्व साजरा करण्याचे भाग्य आपल्या सरकारला लाभले याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की,  गुरू तेग बहादुर जी यांच्या 400 व्या प्रकाश पूरब संस्मरणाशी जास्तीत जास्त लोक जोडले जावेत म्हणून वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.  श्री गुरू तेग बहादुर जी यांचे जीवन आणि शिकवणच नव्हे तर संपूर्ण गुरु परंपरा जगभरात नेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमांचे आयोजन केले जावे. जगभरातील गुरुद्वारा आणि शीख समुदायाकडून केल्या जात असलेल्या सामाजिक सेवांचा गौरव करत पंतप्रधान म्हणाले की,  शीख परंपरेच्या या पैलूचे व्यवस्थित संशोधन आणि नोंदी केल्या जाव्यात.

या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, विरोधी पक्षाचे राज्यसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती अमृतसरच्या बीबी जागीर कौर, सुखबीर सिंग बादल, सुखदेव सिंग धिंडसा हे आमदार, माजी आमदार त्रिलोचन सिंग, अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोढी,  प्रख्यात विद्वान अमृतसिंग ग्रेवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 

* * *

M.Chopade/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1710420) Visitor Counter : 226