PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
07 APR 2021 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 7 एप्रिल 2021
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती
देशभरात दिल्या जात असलेल्या कोविड 19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांची एकूण संख्या आज 8.70 कोटीच्या पुढे गेली आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार 13,32,130 सत्रांद्वारे एकूण 8,70,77,474 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
लक्षणीय कामगिरीची नोंद करत भारताने दररोज सरासरी 30,93,861 लसीच्या मात्रा देऊन जगातील सर्वात वेगवान लसीकरण करणारा देश बनताना अमेरिकेला मागे टाकले आहे.
भारताच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांत 1,15,736 नवे रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली, मध्य प्रदेश आणि गुजरात या आठ राज्यांत कोविडच्या दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवीन रुग्णांपैकी 80.70 टक्के रुग्ण या 8 राज्यांमधील आहेत.
महाराष्ट्रात काल दिवसभरात सर्वाधिक 55,469 रुग्ण आढळले. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 9,921 तर कर्नाटकमध्ये 6,150 नवे रुग्ण आढळले.
भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 8,43,473. वर पोहोचली आहे. ती आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 6.59 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णसंख्येत 55,250 रुग्णांची वाढ झाली आहे.
देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी 56.17 टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत .
दैनंदिन नवीन रुग्णसंख्या वाढत असलेल्या आणि सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असलेल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशच्या सरकारांबरोबर केंद्र सरकार सक्रियपणे काम करत आहे. देशातील कोविड 19 महामारी आणि लसीकरण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी 4 एप्रिल 2021 रोजी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल कोविड -19 परिस्थिती आणि दैनंदिन नवे रुग्ण आणि मृत्यूंची संख्या वाढत असलेल्या 11 राज्य/केंद्रशासित प्रदेशांमधील लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्याबाबत एक उच्च स्तरीय बैठक झाली. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (2 एप्रिल 2021) सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक आणि आरोग्य सचिवांसमवेत एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली , ज्यामध्ये गेल्या दोन आठवड्यात दैनंदिन रुग्णसंख्येत आणि मृत्यूमध्ये मोठी वाढ नोंदविणाऱ्या 11 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले गेले.
देशातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आज 1,17,92,135 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 92.11 % आहे.
गेल्या 24 तासात 59,856 रुग्ण बरे झाले
गेल्या 24 तासांत 630 मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रात काल सर्वाधिक 297 मृत्यूंची नोंद झाली आहे
जागतिक आरोग्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश पुढीलप्रमाणे आहे.
"जनतेला उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार आयुष्मान भारत आणि पंतप्रधान जनऔषधी योजनेसह अनेक उपाययोजना करत आहे. कोविड-19 विरूद्ध लढा बळकट करण्यासाठी भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. जागतिक आरोग्य दिनी आपण मास्कचा वापर, नियमितपणे हात धुणे आणि इतर नियमांचे पालन करण्याबरोबरच शक्य ती सर्व काळजी घेऊन कोविड -19 शी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित करूया. त्याच वेळी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्व संभाव्य उपाय करा. जागतिक आरोग्य दिन हा आपली वसुंधरा निरोगी ठेवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱ्या सर्वांप्रति कृतज्ञता व प्रशंसा व्यक्त करण्याचा दिवस आहे. आरोग्य सेवेतील संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला पाठबळ देण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करण्याचा देखील हा दिवस आहे.”
आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालयाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
देशातील वाढत्या कोविड -19 रुग्णांच्या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालयाने आज सर्व खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. देशात सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी 4 एप्रिल, 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाल्याचे यात नमूद केले आहे. चाचणी, शोध , उपचार, कोविड योग्य वर्तन आणि लसीकरण या पंचसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र अपडेट्स
महाराष्ट्रातील एका महत्त्वपूर्ण घडामोडीनुसार, इयत्ता 9वी आणि 11वी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेविना उत्तीर्ण केले जाईल असे राज्य सरकारने आज जाहीर केले. राज्यातील पहिली ते आठवी या इयत्तांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेविना उत्तीर्ण केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीच जाहीर केले होते. मात्र, 10 वी तसेच 12 वी या मंडळांच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील आणि याबाबतचे माहितीपत्रक लवकरच प्रसिध्द केले जाईल असे राज्य सरकारने म्हटले होते. राज्यात, लसीकरण मोहिमेने चांगला वेग घेतलेला असताना, यात खंड पडू नये म्हणून, पुरेशा प्रमाणात लसीचा साठा पाठवावा अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला केली आहे. दरम्यान, मे महिन्यापर्यंत कोविड-19 प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या उत्पादनाची क्षमता प्रती महिना 10 कोटींहून जास्त मात्रांपर्यंत वाढविता यावी या उद्देशाने, पुणेस्थित सिरम संस्थेने सरकारकडे 3,000 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे. सध्या सिरम संस्थेची उत्पादन क्षमता दर महिन्याला 6.5 ते 7 कोटी मात्रांइतकी आहे.
***
MC/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1710219)
Visitor Counter : 315