उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी सार्वजनिक भाषणामध्ये भाषेची सभ्यता कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला
Posted On:
06 APR 2021 5:51PM by PIB Mumbai
‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून आयोजित केलेल्या ‘दांडी मार्च’ च्या समारोप समारंभाला केले संबोधित
उपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांनी सार्वजनिक भाषणामध्ये शब्दांची आणि भाषेची सभ्यता कायम राखण्याच्या गरजेवर भर दिला . सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
गुजरातच्या ऐतिहासिक दांडी गावात 'आझादी का अमृत महोत्सव' चा भाग म्हणून 25 दिवस चाललेल्या 'दांडी मार्च'च्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. विरोधकांसाठीही नेहमी नम्र आणि आदरणीय भाषा वापरणार्या महात्मा गांधींकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. गांधीजींचे अहिंसेचे तत्व केवळ शारीरिक हिंसाचारापुरते मर्यादित नव्हते तर शब्द आणि विचारांमध्येही अहिंसा त्यांना अभिप्रेत होती. राजकीय पक्षांनी परस्परांकडे शत्रू म्हणून न पाहता प्रतिस्पर्धी म्हणून पहावे असे ते म्हणाले.
आझादी का अमृत महोत्सव ”- भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त 75 आठवड्यांच्या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 मार्च , 2021 रोजी साबरमती आश्रम येथून हिरवा झेंडा दाखवला होता. या महोत्सवातून मागील 75 वर्षात भारताने घेतलेल्या उत्तुंग भरारीचा मागोवा घेतला जाणार आहे. उपराष्ट्रपती म्हणाले की हा एक उत्सव आहे जो आपल्याला आपल्या छुप्या सामर्थ्यांचा पुन्हा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करतो आणि राष्ट्रांच्या मांदियाळीत आपले योग्य स्थान पुन्हा मिळवण्यासाठी प्रामाणिक, समन्वयवादी कृती करण्यास उद्युक्त करतो.
आपल्या स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींचा दांडी येथील मिठाचा सत्याग्रह हा ऐतिहासिक क्षण म्हणून संबोधित करताना नायडू म्हणाले की, यामुळे इतिहासाचा मार्ग बदलला. ते म्हणाले, “आज आपण जो प्रतीकात्मक दांडी मार्च करत आहोत. तो आपल्यासमोरच्या आव्हानांचा सामना करताना आपण एकत्र राहण्याची देशाची क्षमता दर्शवतो.” विकासाच्या मार्गावर एकत्र चालण्याच्या या क्षमतेचे अनेक सकारात्मक परिणाम मिळाले आहेत हे लक्षात घेऊन, भविष्यातही या मार्गाने सातत्याने चालण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या महान नेत्यांचा संदेश आपल्याला आपल्या स्वप्नातील भारताच्या निर्मितीसाठी एकत्र काम करण्याची प्रेरणा देतो. ते म्हणाले की, हा भारत देश आहे जो आपली समृद्धी इतर देशांबरोबर सामायिक करतो. ते म्हणाले की, "घटनात्मक मूल्ये आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारे हे राष्ट्र आहे आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्देशाने लोकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे."
तत्पूर्वी उपराष्ट्रपतींनी प्रार्थना मंदिरात महात्मा गांधींना आदरांजली वाहिली आणि दांडी मार्च समारंभात सहभागी झालेल्यांशी संवाद साधला. गांधीजींनी 4 एप्रिल 1930 रोजी जिथे एक रात्र घालवली त्या सैफी व्हिलाला देखील त्यांनी भेट दिली. त्यानंतर, नायडू यांनी राष्ट्रीय मिठाचा सत्याग्रह स्मारकाला भेट दिली - हे स्मारक मिठाच्या सत्याग्रहातील कार्यकर्ते आणि सह्भागींच्या सन्मानार्थ बांधले आहे.
या कार्यक्रमादरम्यान उपराष्ट्रपतींनी गुजरात राज्य हस्तकला विकास महामंडळाच्या भौगोलिक संकेत (जीआय टॅग) उत्पादनांवरील विशेष लिफाफ्याचे प्रकाशन केले. सिक्किम, छत्तीसगड आणि गुजरातमधील लोक कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले.
***
M.Iyengar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1709888)
Visitor Counter : 288