श्रम आणि रोजगार मंत्रालय

स्थलांतरित मजुरांच्या अखिल भारतीय सर्वेक्षणासह आणखी एका सर्वेक्षणाच्या माहिती गोळा करण्याच्या कार्याला केंद्रीय कामगार मंत्र्यांनी  दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 31 MAR 2021 5:46PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज स्थलांतरीत मजुरांबाबत अखिल भारतीय सर्वेक्षण आणि अखिल भारतीय तिमाही आस्थापने आधारित रोजगार सर्वेक्षण (एक्यूईईएस) या दोन सर्वेक्षणासाठीच्या फिल्ड वर्क अर्थात माहिती आणि आकडेवारी गोळा करण्याच्या कार्याला हिरवा झेंडा दाखवला. कामगार मंत्रालयाशी संलग्न असलेला लेबर ब्युरो या वर्षात अखिल भारतीय पाच सर्वेक्षणे हाती घेणार आहे त्यापैकी ही दोन सर्वेक्षणे आहेत. या सर्वेक्षणासाठी मंत्रालयाने या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये  चंडीगड इथे सॉफ्टवेअर एप्लिकेशन सुरु केले आहे. फिल्ड वर्कच्या सुरवातीची पूर्व तयारी म्हणून ब्युरोने, या सर्वेक्षणाचे प्रमुख प्रशिक्षक आणि निरीक्षक यांच्यासाठी गेले दोन महिने प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला आहे. 

या दोन सर्वेक्षणातून प्राप्त झालेले निष्कर्ष, कामगार आणि रोजगार या क्षेत्रात प्रभावी धोरणांची निर्मिती करण्यासाठी अतिशय उपयुक्त डाटा पुरवतील असे गंगवार यांनी सांगितले. सर्वेक्षण सुरु करण्यासाठी कठोर आणि काटेकोर वेळापत्रकासाठी ब्युरोच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. घरगुती कामे करणारे कामगार, व्यावसायिकांकडून निर्माण केलेले रोजगार आणि वाहतूक क्षेत्रात निर्माण झालेले रोजगार या अखिल भारतीय स्तरावरची तीन सर्वेक्षणेही लवकरच सुरु करण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0017YM9.jpg

सर्वेक्षणाच्या फिल्ड वर्कला आज  हिरवा झेंडा दाखवण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त करत या सर्वेक्षणासाठीच्या फिल्ड इनवेस्टिगेटरना, डाटा गोळा करण्यासाठीसॉफ्टवेअर एप्लिकेशनसह अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त टॅबलेट पीसी पुरवण्यात येतील असे श्रम आणि रोजगार सचिव अपूर्व चंद्र यांनी सांगितले.

हे सर्वेक्षण सुरु झाल्याने ब्युरो, येत्या काही महिन्यात लाखो घरातून स्थलांतरित मजूरांबाबत मौल्यवान डाटा गोळा करणार आहे. एक्यूईईएस अंतर्गत विविध आस्थापनांमधून, रोजगारविषयक परिस्थिती आणि रोजगार परिस्थितीत झालेले बदल यासाठी ब्युरो डाटा गोळा करणार आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002ADQT.jpg

स्थलांतरित मजुरांबाबत सर्वेक्षण हे या मजुरांच्या सामाजिक आर्थिक आणि कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीबाबत अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करणारे पहिले सर्वेक्षण आहे, भारतातल्या स्थलांतरित मजुरांवर कोविड-19 चा झालेला परिणामही या सर्वेक्षणात अभ्यासण्यात येणार आहे. 

आखलेली कालमर्यादा  आतापर्यंत पाळण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच कामगारांशी संबंधित पाच सर्वेक्षणाबाबतच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत यापुढेही विहित आराखड्यानुसार काम करण्याचा विश्वास, लेबर ब्युरोचे महासंचालक  डी पी एस नेगी यांनी व्यक्त केला. आज सुरु करण्यात आलेल्या सर्वेक्षणांचे निष्कर्ष या वर्षीच म्हणजे  2021 मधेच उपलब्ध होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

***

Jaydevi PS/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1708737) Visitor Counter : 229