उपराष्ट्रपती कार्यालय

लोकांमधे कोविड-19 संसर्गाचे प्रमाण शोधणाऱ्या सांडपाणी आणि हवा निगराणी प्रणालीचे उपराष्ट्रपतींसमोर सादरीकरण


ही प्रणाली संसदेत बसवावी असे सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या महासंचालकांनी सुचवले

Posted On: 30 MAR 2021 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2021


लोकांमधे कोविड-19 चे संसर्गाचे प्रमाण शोधणाऱ्या सांडपाणी आणि हवा निगराणी  प्रणालीचे, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांना आज सादरीकरण करण्यात आले. संसदेत ही प्रणाली बसवावी असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ शेखर सी मांडे यांनी सुचवले असून त्यांनी या संदर्भात सादरीकरण केले. पेशी आणि अणु जीवशास्त्र केंद्राचे संचालक डॉ राकेश मिश्रा,भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ एस चंद्रशेखर, भारतीय रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे डॉ वेंकट मोहन त्यांच्या समवेत उपस्थित होते. सीएसआयआर च्या विविध प्रयोगशाळांमध्ये हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहितीही मांडे यांनी उप राष्ट्रपतींना दिली. सांडपाण्यावर नजर ठेवली असता त्या लोकसंख्येतल्या  बाधितांच्या संख्येचा दर्जात्मक  आणि परिमाणात्मक   अंदाज पुरवते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. जनतेसाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या शक्य नसल्यास कोविड-19 च्या फैलावाबाबत जाणून घेण्यासाठीही या   प्रणालीचा वापर करता येईल  असे त्यांनी सांगितले. समाजात या विषाणूचे संसर्गाचे प्रमाण पाहण्यासाठी हा उपाय आहे.

कोविड रुग्णाच्या मलामध्ये SAR-CoV- 2 आढळतो. लक्षणे असणाऱ्या आणि लक्षणे नसणाऱ्या पण बाधित असणाऱ्या  व्यक्तींच्या मलातही हा विषाणू दिसून येतो.

हैदराबाद, प्रयागराज (अलाहाबाद), दिल्ली, कोलकाता, मुंबई, नागपूर, पुद्दुचेरी आणि चेन्नई येथे संसर्गाचा कल जाणण्यासाठी सांडपाण्यावर लक्ष ठेवून  मिळाळेला डाटा त्यांनी यावेळी सादर केला. वैयक्तीक स्तरावर नमुना तपासणी करण्यात आली नसल्यामुळे आकड्यांबाबत निःपक्षपाती अंदाज प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. नियमित चाचण्याद्वारे प्राप्त होणारी संख्या ही, ज्या लोकानी चाचण्या केल्या आहेत त्यांच्या संख्येवरच अवलंबून असते.

विषाणूचे कण आणि संसर्गाचा संभाव्य धोका यावर लक्ष ठेवण्यासाठी हवा निगराणी  प्रणाली बसवण्याबाबतही त्यांनी सुचवले. वैज्ञानिकांनी केलेल्या कार्याची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. या प्रणाली संदर्भात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि सरकार यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 


* * *

Jaydevi PS/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1708455) Visitor Counter : 280