मंत्रिमंडळ

भारताच्या केंद्रीय लोकसेवा आयोग आणि अफगाणिस्तानच्या स्वतंत्र प्रशासकीय सुधारणा आणि नागरी सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 23 MAR 2021 4:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मार्च 2021

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील यूपीएससी अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोग आणि अफगाणिस्तानचा आयएआरसीएससी अर्थात स्वतंत्र प्रशासकीय सुधारणा आणि नागरी सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मंजुरी दिली आहे.

या सामंजस्य करारामुळे यूपीएससी आणि आयएआरसीएससी यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देशांमधील संबंधित संस्थांना विविध नेमणुका करताना येणारे अनुभव आणि विशेष ज्ञान यांचे परस्परांमध्ये आदानप्रदान सुलभतेने करता येईल.

सामंजस्य करारातील महत्त्वाचे मुद्दे:

  1. नागरी सेवा संबंधित निवड आणि भरती प्रक्रियेत विशेषतः यूपीएससी आणि आयएआरसीएससी यांच्या कामातील आधुनिक दृष्टिकोनाबाबतच्या अनुभवांचे आदानप्रदान
  2. पुस्तके, हस्तलिखिते यांच्यासह गोपनीय नसलेल्या अन्य माहिती साहित्याचे आणि विशेष ज्ञानाचे आदानप्रदान करणे.
  3. लेखी परीक्षेची तयारी करणे आणि संगणकावर आधारित भरती परीक्षा तसेच ऑनलाईन परीक्षा यांच्या परिचालनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना आवश्यक असलेल्या  विशेष नैपुण्याची माहिती एकमेकांना करून देणे.
  4. अर्जांची जलदगतीने छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी एक खिडकी यंत्रणा राबविल्यानंतर आलेल्या  अनुभवांचे एकमेकांशी आदानप्रदान करणे.
  5. परीक्षा पद्धतीमधील विविध प्रक्रिया कार्यान्वित होताना येणारे अनुभव आणि त्या कार्यान्वयनासाठी आवश्यक विशेष ज्ञान यांची माहिती परस्परांना देणे.
  6. अधिकाऱ्यांसाठी ओरशिक्षण सत्र आयोजित करणे.
  7. विविध सरकारी संस्थांनी त्यांना दिलेल्या क्षमतेच्या कार्यकक्षेत विविध पदांसाठी भरती करताना राबविलेल्या प्रक्रिया आणि पद्धती यांच्या निष्कर्षाच्या अनुभवांचे आदानप्रदान करणे.

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1706957) Visitor Counter : 236