राष्ट्रपती कार्यालय

गंगा, पर्यावरण आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन हा आपल्या देशाच्या विकासाचा पाया- राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Posted On: 15 MAR 2021 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 मार्च 2021
 

‘गंगा, पर्यावरण आणि संस्कृती’ यांचे जतन आणि संवर्धन हा आपल्या देशाच्या  विकासाचा पाया असल्याचे  राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. गंगा, पर्यावरण आणि संस्कृती या विषयावर  दैनिक जागरणने, वाराणसी इथे आयोजित केलेल्या जागरण फोरमच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. अशा मुद्यावर चर्चा आयोजित करणे महत्वाचे असून त्यामुळे लोक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी मदतही होते आणि  यातून  मानवजातीच्या कल्याणासाठी मार्ग  प्रशस्त होत असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

आपल्या जीवनात गंगेचे पावित्र्य सर्वाधिक आहे. आपले मन, वाणी  आणि आचरण गंगेप्रमाणे शुद्ध असले पाहिजे अशी शिकवण आपल्याला यातून मिळते. गंगेची स्वच्छता म्हणजे आपले अंतकरण शुद्ध असल्याचे द्योतक आहे. गंगेची चिरंतनता म्हणजे आपल्या जीवनातल्या  सातत्याचा संदेश देत असल्याचे ते म्हणाले.   

केवळ एक नदी म्हणून गंगेचा विचार करणे योग्य ठरणार नाही तर गंगा ही भारतीय संस्कृतीची जीवन वाहिनी आहे, आध्यात्म आणि श्रद्धा यांचा स्त्रोत आहे. भारतातल्या सर्व नद्यांच्या ठायी गंगा आहे असा आपला विश्वास आहे. अनेक भाविक भारतातून गंगाजल घेऊन परदेशातल्या नद्यांमध्ये ते अर्पण करतात यातून या नद्यांशी ते आपली श्रद्धा जोडतात. गंगा जगातल्या कोणत्याही भागातल्या भारतीयाला आपल्या मायभूमीशी, संस्कृतीशी आणि देशाच्या परंपरेशी जोडते.  म्हणूनच गंगा ही भारतीयांची ओळख असल्याचे राष्ट्रपती म्हणाले.

गंगा आणि पर्यावरण यांचे संरक्षण करण्यासाठी ‘नमामि गंगे’ हे   एकात्मिक ‘गंगा संवर्धन अभियान’ 2015 मध्ये हाती घेण्यात आले. याचे उत्तम परिणाम दिसून येत असल्याचे पाहून आनंदाची भावना त्यांनी व्यक्त केली. बनारस मधले घाट आता स्वच्छ झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक चिंतेच्या मुद्यांवर  या मंचाच्या माध्यमातून चर्चा घडवून समाजाला जबाबदारीचे भान आणण्याचा हा प्रयत्न अतिशय प्रशंसनीय असल्याचे  राष्ट्रपती म्हणाले.

राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी इथे क्लिक करा
 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704933) Visitor Counter : 226