आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
दैनंदिन नव्या कोविड – 19 रुग्णांमध्ये अचानक वाढ आणि वाढती सक्रीय रुग्णसंख्या असणाऱ्या राज्यांना “चाचण्या, रुग्णांचा शोध आणि उपचार” या तत्वांची पूर्णत्वाने पुन्हा अंमलबजावणी करण्यास सांगितले
रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येच्या विशिष्ट गटांसाठीच्या लसीकरणाचा वेग वाढविण्याचे निर्देश
Posted On:
06 MAR 2021 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2021
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉ.विनोद के.पॉल यांनी आज हरियाणा, आंध्रप्रदेश, ओदिशा, गोवा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या तसेच दिल्ली आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभाग सचिवांशी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संवाद साधला.
या सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये गेल्या काही दिवसांत जास्त प्रमाणात नवे कोविड रुग्ण सापडत आहेत तसेच दैनंदिन पातळीवर कोविड रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झालेली दिसून आली आहे. या आठ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अचानक कोविड रुग्णसंख्येत झालेली वाढ आणि उच्च सक्रीय कोविड रुग्ण संख्या यांच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी सार्वजनिक आरोग्य सुविधांची उपयुक्तता तसेच कोविड रोगाचे नियंत्रण आणि रुग्णांचे व्यवस्थापन या बाबतीत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला.
या तपशीलवार चर्चेतून असे दिसून आले की, दिल्लीतील 9 जिल्हे, हरियाणातील 15 जिल्हे, आंध्रप्रदेशातील 10, ओदिशातील 10, हिमाचल प्रदेशातील 9, उत्तराखंड राज्यातील 7, गोव्यातील 2 तर चंदीगड मधील एका जिल्ह्यात होणाऱ्या एकूण कोविड चाचण्यांचे घसरते प्रमाण, RT-PCR चाचण्यांचा कमी सहभाग, नव्या रुग्णांची साप्ताहिक पातळीवरील वाढ आणि कोविड रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या शोधामध्ये कमतरता हे अत्यंत काळजीचे मुद्दे आहेत. या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून या राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शेजारील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड संसर्ग पसरण्याचा मोठा धोका आहे. या सर्व जिल्ह्यांमधील कोविड विषयक प्रतिसादाबाबत पुढील कार्यवाहीसाठी त्या त्या जिल्ह्यांना योग्य ते निर्देश दिले आहेत.
राज्यांनी विशेषत्वाने करावयाचे उपाय :
- कोविड महामारीने उच्चांक गाठलेला असताना परिणामकारक ठरलेली “चाचण्या, रुग्णांचा शोध आणि उपचार” नीती यापुढेही कठोरपणे अमलात आणणे.
- कोविड चाचण्यांचा वेग कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याची काळजी घेणे तसेच अॅन्टिजेन चाचण्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या जिल्ह्यांमध्ये RT-PCR चाचण्यांचे प्रमाण वाढविणे.
- समूहाने रुग्ण सापडणाऱ्या निवडक जिल्ह्यांमध्ये बारीक लक्ष ठेवून कडक नियंत्रण लागू करणे.
- प्रत्येक कोविड रुग्णाच्या संपर्कातील सरासरी किमान 20 व्यक्तींचा बारकाईने शोध घेणे.
- मृत्युदर जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय व्यवस्थापनाकडे लक्ष पुरविणे आणि त्यांच्या आरोग्यविषयक सुविधा जास्त अचूक करण्याकडे लक्ष केंद्रित करणे.
- जास्त रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील विशिष्ट प्राधान्य आवश्यक असलेल्या लोकसंख्येच्या गटाच्या लसीकरणाचे काम वेगाने हाती घेणे.
- उपलब्ध लसींच्या साठ्याचा जास्तीतजास्त उपयोग करून घेणे आणि अत्यंत आवश्यकता असलेया जिल्ह्यांना प्राधान्य देणे तसेच यासाठी एका वेळेस किमान 15 आणि कमाल 28 दिवसांच्या लसीकरण वेळापत्रकासाठी खासगी रुग्णालयांकडून सहकार्य मिळविणे.
- कोविड योग्य आचारसंहिता पाळण्यासाठी जनजागृती आणि सक्तीच्या उपाययोजना अमलात आणणे.
कोविड रोगाच्या जलद प्रसारणापासून वाचण्यासाठी सध्या घरीच विलगीकारणात असलेल्या कोविड रुग्णांचे तत्पर आणि योग्य प्रकारे विलगीकरण होत आहे हे सुनिश्चित करून त्यांना योग्य आरोग्य निरीक्षणाखाली ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच राज्य सरकारांनी या रोगाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने बारकाईने लक्ष ठेवावे आणि प्रसार रोखण्यासाठी करीत असलेल्या उत्तम उपाययोजनांची माहिती द्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702910)
Visitor Counter : 226