उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी भावनिक आणि सामाजिक कौशल्यांच्या महत्वावर जोर दिला
आयआयटी तिरुपती संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त उपराष्ट्रपतींनी संस्थेचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांशी साधला संवाद
Posted On:
04 MAR 2021 4:56PM by PIB Mumbai
अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक कौशल्यांसोबतच, भावनिक आणि सामाजिक कौशल्ये देखील तितकीच महत्वाची असल्याचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांनी जोर देऊन सांगितले. ही कौशल्ये विद्यार्थ्यांना वेगाने बदलणार्या जगाशी जुळवून घेण्यास सक्षम करतील असेही ते म्हणाले.
आयआयटी तिरुपतीच्या सहाव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उपराष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान सामाजिक प्रासंगिकतेशी जोडण्याचे आवाहन केले. “तुम्ही येथे तुमचे नशीब घडवाल आणि येथे संपादन केलेल्या ज्ञान आणि कौशल्याच्या आधारे राष्ट्रीय परिवर्तनात योगदान द्याल याची मला खात्री आहे,” असे ते विद्यार्थ्यांना म्हणाले.
देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाची प्रगती ही महत्त्वपूर्ण निर्णायक घटक असल्याचे सांगत नायडू यांनी तंत्रज्ञानात प्रगती करण्याच्या मार्गावर स्थिर आणि वेगाने पुढे जाण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्याचवेळी त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाने लोकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारली पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. तंत्रज्ञानाची प्रगती साधत असतानाच पर्यावरण आणि हवामान बदलांबाबत देखील जागरुक राहण्याचा इशारा उपराष्ट्रपतींनी दिला.
आयआयटी नवीन महत्वाकांक्षी भारताचा चेहरा असल्याचे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की, राष्ट्रांच्या समूहात आपले हक्काचे स्थान पुन्हा मिळवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे. “हे एक स्वप्न आहे जे आपली शिक्षण व्यवस्था सुधारल्यानंतरच साकार होऊ शकते,” असे ते म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरण हे एक उत्तम दस्तावेज असून हे धोरण त्वरित कार्यान्वित करण्याच्या गरजेवर नायडू यांनी भर दिला. मुलांचे प्रारंभिक शालेय शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
थर्मल एअर स्टरिलायझर, एन 95 समकक्ष पुन्हा वापरता येण्याजोगे मास्क आणि छातीच्या एक्स-रेच्या आधारे सामान्य, न्यूमोनिया आणि कोविड-19 रूग्णांचे वर्गीकरण करण्यासाठी सखोल शिक्षण-आधारित दृष्टीकोन यासारखे विविध तंत्रज्ञान विकसित करून कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात देशासोबत खांद्याला खांदा लावून लढल्याबाबत नायडू यांनी आयआयटी तिरुपतीचे कौतुक केले.
अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
****
M.Chopade/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1702468)
Visitor Counter : 196