संरक्षण मंत्रालय

डीआरडीओ ने विकसित केलेल्या रणगाडा भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्र प्रणाली ‘हेलीना’ आणि ‘धृवास्त्र’ ची चाचणी यशस्वी

Posted On: 19 FEB 2021 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2021

 

हेलीना (लष्करासाठीची आवृत्ती) आणि धृवास्त्र (हवाई आवृत्ती) क्षेपणास्त्र प्रणालींच्या यशस्वी चाचण्या आज वाळवंटी प्रदेशातल्या अत्याधुनिक हलक्या वजनाच्या हेलिकॉप्टर प्लॅटफॉर्म वरून करण्यात आल्या. संरक्षण, संशोधन आणि विकास संघटना- डीआरडीओ ने या प्रणाली विकसित केल्या आहेत.

या क्षेपणास्त्रांची किमान आणि कमाल टप्प्यावरची क्षमता तपासण्यासाठी त्यांच्या पाच प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. ही क्षेपणास्त्रे आकाशात घिरट्या घालणाऱ्या लक्ष्यावर, तसेच विमानांमधून हलत्या आणि स्थिर लक्ष्यांवर नेम धरुन सोडण्यात आली. तर काही चाचण्या जुन्या, निरुपयोगी रणगाड्यांना लक्ष्य करुन करण्यात आल्या. तर एक चाचणी पुढे जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधून हवेतच हलत असलेल्या लक्ष्याचा वेध घेणारी होती.

हेलीना आणि ध्रुवास्त्र ही तिसऱ्या जनरेशनची, वापरण्यापूर्वीच लक्ष्य निश्चित केल्यानंतर त्याचा अचूक वेध घेणारी, रणगाडाभेदी क्षेपणास्त्र प्रणाली असून थेट मारा तसेच वरुन मारा केल्यावरही अचूक लक्ष्यभेद करण्याची त्यांची क्षमता आहे. सर्व ऋतूमध्ये, कोणत्याही हवामानात दिवसरात्र काम करण्यास सक्षम असलेली ही प्रणाली, पारंपारिक शस्त्रासांनी सज्ज असलेल्या तसेच स्फोटके असलेल्याही  रणगाड्यांचा पराभव करू शकते. हे जगातली सर्वात अत्याधुनिक असे रणगाडाभेदी क्षेपणास्त्र आहे. ही क्षेपणास्त्रे आता भारतीय लष्कराच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरओ, लष्कर आणि हवाई दलाचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. डीआरडीओ चे अध्यक्ष डॉ सतीश रेड्डी यांनीही या क्षेपणासत्र निर्मितीत आणि चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या संपूर्ण चमूच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1699417) Visitor Counter : 309