मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
वसंतपंचमीचे औचित्य साधून प्राणीमित्र पुरस्कार आणि जीवदया पुरस्कार 2021 प्रदान
कॉर्पोरेट श्रेणीत मुंबईतील टाटा ट्रस्ट फाऊंडेशनने पटकावला प्राणीमित्र पुरस्कार
Posted On:
17 FEB 2021 2:55PM by PIB Mumbai
भारतीय पशुकल्याण मंडळ म्हणजे देशातील प्राण्यांचे कल्याण आणि संरक्षण करणारी शीर्ष संस्था असून तिची स्थापना, पशूंशी क्रौर्यतापूर्ण व्यवहार करण्यास प्रतिबंध घालणाऱ्या 1960 च्या कायद्यातील चौथ्या कलमांतर्गत झाली आहे. या संस्थेने वर्ष 2021 साठी 14 प्राणीमित्र आणि जीवदया पुरस्कार प्रदान केले. पशुकल्याणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि कॉर्पोरेट कंपन्यांना हे पुरस्कार देण्यात आले.
मासेमारी, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले. वसंतपंचमीचे औचित्य साधून आयोजित झालेल्या या कार्यक्रमात सिंग यांनी प्राणीप्रेमींना शुभेच्छाही दिल्या.
पशुकल्याणासाठी निःस्वार्थ वृत्तीने केलेल्या कामाबद्दल मंत्रीमहोदयांनी पुरस्कारविजेत्यांचे अभिनंदन केले. अशा पुरस्कारांमुळे प्राणीपक्ष्यांची अधिक काळजी घेण्याची व त्यांचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करण्याची प्रेरणा लोकांना मिळेल असा विश्वास, सिंग यांनी यावेळी व्यक्त केला. आपल्या मातृभूमीवरील प्रत्येक जीवाला इतरांबरोबर आनंदी, आरोग्यसंपन्न आणि समृद्ध आयुष्य जगता आले पाहिजे- हे भारतातील सर्वोच्च तत्त्वज्ञान त्यांनी अधोरेखित केले.
आत्यंतिक सेवाभावी वृत्तीने हजारो गायींची आणि त्यांच्या वंशाची काळजी घेणाऱ्या गोशाळांचे मंत्रिमहोदयांनी कौतुक केले. स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी गोशाळांनी अभिनव संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. सर्वसामान्य जनतेमध्ये करुणा, दया, पशुकल्याण या मूल्यांबद्दल जिव्हाळा आणि जागृती निर्माण करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले. तसेच प्राण्यांशी क्रौर्यपूर्ण व्यवहार करण्यास प्रतिबंध घालणाऱ्या कायद्याचे काटेकोर पालन होणे, ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राणीमित्र आणि जीवदया पुरस्कार विजेत्यांची क्षेत्रनिहाय आणि श्रेणीनिहाय नावे पुढीलप्रमाणे-:
- प्राणीमित्र पुरस्कार-वैयक्तिक-श्री.योगेन्द्र्कुमार,नवी दिल्ली, श्री.मनीष सक्सेना, जयपूर, राजस्थान आणि श्री.श्यामलाल चौबिसा, उदयपूर, राजस्थान.
- प्राणीमित्र पुरस्कार- शौर्य- श्री.अनिल गंदस, गुरुग्राम, हरियाणा, कै.श्रीम. कल्पना वासुदेवन, कोइंबतूर, तामिळनाडू.
- प्राणीमित्र पुरस्कार –आजीवन प्राणिसेवा- मेजर जनरल (निवृत्त) डॉ. आर.एम. खर्ब, AVSM, गुरुग्राम, हरियाणा, डॉ.एस.चिन्नी कृष्ण, चेन्नई, तामिळनाडू, आणि डॉ.एस.आर.सुंदरम, चेन्नई, तामिळनाडू.
- प्राणीमित्र पुरस्कार – पशुकल्याण संस्था/संघटना –वर्ल्ड संकीर्तन टूर ट्रस्ट, होडाल, हरियाणा, श्रीकरुणा फाउंडेशन ट्रस्ट, राजकोट, गुजरात आणि पीपल फॉर ऍनिमल्स, अहमदाबाद, गुजरात.
- प्राणीमित्र पुरस्कार – कॉर्पोरेट – टाटा ट्रस्ट फाउंडेशन, मुंबई, महाराष्ट्र.
- जीवदया पुरस्कार – पशुकल्याण संस्था/ संघटना – ध्यान फाउंडेशन, नवी दिल्ली आणि ऍनिमल एड चॅरिटेबल ट्रस्ट, उदयपूर, राजस्थान.
S.Tupe/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1698659)
Visitor Counter : 277