राष्ट्रपती कार्यालय

आज, भारत केवळ बाजारपेठ नाही, परंतु संपूर्ण जगासाठी संरक्षण क्षेत्रासह अफाट संधींची भूमी आहे: राष्ट्रपती कोविंद


एरो इंडिया -21 च्या समारोप सोहोळ्यात राष्ट्रपतींचे संबोधन

Posted On: 05 FEB 2021 8:22PM by PIB Mumbai

 

आज भारत केवळ बाजारपेठ नाही तर संरक्षण क्षेत्रासह संपूर्ण जगासाठी संधींची भूमी असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते आज (5 फेब्रुवारी 2021) बेंगळुरू येथे एरो इंडिया -21 च्या समारोप सोहोळ्यात कार्यक्रमात बोलत होते. एरो इंडिया 2021 हा जागतिक स्तरावर संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील भारताच्या निरंतर वाढणार्‍या सामर्थ्याचा जिवंत पुरावा आहे असे राष्ट्रपती म्हणाले. भारताच्या क्षमतेवरील जागतिक आत्मविश्वास हळूहळू वाढत असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे.

राष्ट्रपती म्हणाले की, गेल्या सहा वर्षांत भारताने सुरू केलेल्या सुधारणांमुळे संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातील गुंतवणूकदार आणि खासगी कंपन्यांना अभूतपूर्व संधी उपलब्ध झाल्या आहेत. आम्ही आत्मनिर्भरता आणि निर्यात संवर्धनाची दोन उद्दीष्टे घेऊन संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला सर्वोच्च देशांमध्ये स्थान देण्याच्या उद्देशाने अनेक धोरणात्मक उपक्रम हाती घेतले आहेत.

राष्ट्रपती म्हणाले की, उत्पादकांना भारतात युनिट स्थापन करण्यास उत्तेजन देण्यासाठी व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन देण्यावर सरकारचा भर आहे. संरक्षण क्षेत्रातही स्थिर उदारीकरण होत आहे. बर्‍याच वस्तूंसाठी औद्योगिक परवान्यांची आवश्यकता दूर केली गेली आहे. औद्योगिक परवाना आणि निर्यात प्राधिकरणाच्या प्रक्रिया सुलभ करून त्या ऑनलाईन केल्या आहेत. संरक्षण उद्योगांची स्थापना सुलभ करण्यासाठी आणि एमएसएमईंना चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्यात दोन संरक्षण कॉरिडोर स्थापित करण्यात आले आहेत. या सर्व प्रयत्नांमुळे भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेताना देशात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

एरो इंडिया 2021 च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदी महासागरातील वर्धित शांतता, सुरक्षा आणि सहकार्य' या विषयावर हिंद महासागर प्रदेशातील संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेचा संदर्भ देताना राष्ट्रपती म्हणाले की, भारत नेहमीच वैश्विक शांतता आणि विकासाचा उत्कट समर्थक राहिला आहे. हिंद महासागर प्रदेश हा त्याच्या समृद्ध नैसर्गिक संसाधने आणि मोक्याच्या जागेमुळे एक महत्त्वपूर्ण प्रदेश आहे. हिंद महासागर प्रदेशातील सहकार्यास चालना देण्यासाठी आम्ही  प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास या भूमिकेतून सागरही कल्पना राबविली. हिंद महासागर प्रदेशातील देशांनी राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर भर दिला पाहिजे.

राष्ट्रपती म्हणाले की मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण योजनेत नियोजन व समन्वयासाठी भारत आपली कौशल्य व संसाधने सर्व हिंद महासागर प्रदेशातील राष्ट्रांशी सामायिक करण्यास सदैव तत्पर आहे. कोविड -19 च्या उद्रेकानंतर, सागर 1 अभियानातंर्गत आम्ही आमच्या शेजारील देशांमध्ये पोहोचलो आणि त्यांना वैद्यकीय पथके, औषधे तसेच चिकित्सा उपकरणे, व्हेंटिलेटर, मास्क, हातमोजे आणि इतर वैद्यकीय पुरवठा करण्यास मदत केली. कोविड -19 महामारी विरुद्धच्या लढ्यात संपूर्ण मानवतेला मदत करण्यासाठी लस उत्पादन आणि वितरण क्षमतेचा उपयोग करण्याच्या भारताच्या प्रतिबद्धतेचे अनुपालन करून आपल्या परदेशी मित्र देशांना अनुदान मदतीचा पुरवठा आधीच सुरू झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.

 

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

****

Jaydevi PS/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1695642) Visitor Counter : 169